सर्विस गेट अत्याधुनिकीकरण लांबणीवर
राधानगरी धरण ः स्वतंत्र प्रस्तावऐवजी एकत्रित प्रस्ताव आता मंजुरीसाठी सादर
राधानगरी ता. 17 : स्वतंत्र प्रस्तावऐवजी एकत्रित प्रस्तावामुळे राधानगरी धरणाच्या सर्विस गेटच्या अत्याधुनिकीकरणाची योजना आणखीनच लांबणीवर गेली आहे. या आधी सर्विस गेट अत्याधुनिकीकरणाचा स्वतंत्र प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र, या प्रस्तावाला बगल देऊन मुख्य अभियंत्यांनी धरणाला वक्राकार दरवाजे आणि सर्विस गेट अत्याधुनिकरणाचा एकत्रित प्रस्तावाचे निर्देश दिले. तसा प्रस्ताव आता मंजुरीसाठी सादर झाला आहे. मंजुरी प्रक्रियेचे अनेक टप्पे पार करावे लागणार असल्याने कदाचित पुढील दोन वर्षे लागतील. प्रत्यक्ष काम सुरू होण्यास 2024 साल उजाडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे अतिवृष्टी काळात स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर बिकट पूरस्थितीचे सावट कायम राहणार आहे.
या धरणाला वक्राकार दरवाजे बसवण्याची योजना एक दशकापासून प्रस्तावित आहे. ही योजना दीर्घकालीन असल्याने दरम्यानच्या काळात सर्विस गेटच्या अत्याधुनिकीकरण प्रस्तावित झाले. वर्षभरापूर्वी सर्विस गेट आपोआप उघडल्याने हा विषय ऐरणीवर आला. तीनपैकी एका सर्विस गेटचे तातडीने अत्याधुनिकीकरणाचा प्रस्ताव तयार झाला. प्रस्ताव मंजुरीला गेल्यानंतर दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्तावाची मेख मारली गेली. त्यामुळे सर्विस गेट अत्याधुनिकीकरणाचा स्वतंत्र प्रस्ताव मंजुरीआधीच बाजूला पडला आहे. अल्पकाळात मंजुरी आणि कमी खर्चाचा असल्याने पुढील पावसाळ्यापूर्वी अत्याधुनिकीकरण योजना साकार होणे शक्य होते. वक्राकार दरवाजे आणि सर्विस गेट अत्याधुनिकीकरण योजना जवळपास 130 कोटी रुपये खर्चाची आहे. त्यामुळे एकत्रित प्रस्ताव सर्विस गेट अत्याधुनिकीकरण लांबणीचे कारण ठरणार आहे.
चौकट
तातडीच्या योजनेला खीळ
हे धरण पूर्ण भरल्यानंतरच स्वयंचलित दरवाजे खुले होतात. त्यातून पूरस्थिती उद्भवते. धरणात टप्प्याटप्प्याने पाणीसाठा आणि धरण पूर्ण भरण्यापूर्वी विसर्गाची व्यवस्था किमान एका सर्विस गेटच्या अत्याधुनिकीकरणातून ती निर्माण होणार होती. एकत्रित प्रस्तावामुळे पाणीसाठा आणि पूर नियंत्रणाच्या तातडीच्या योजनेला खीळ बसली आहे. त्यामुळे प्राधान्याने सर्विस गेट अत्याधुनिकीकरणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.