‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करा
खासदार शाहू महाराज ः वाकी घोल रस्ता सुधारणेतील अडसर दूर होणार
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. ७ ः खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी वाकी घोल रस्ता सुधारणाविषयी विशेष प्रयत्न सुरू केल्याने आगामी काळात या रस्त्याच्या सुधारणेतील वन्यजीव कायद्यातील अडसर दूर होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर खासदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. वन्यजीव विभागाच्या परवानगीसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करा, आपण त्यात जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.
वाकी घोलातील १४ हून अधिक खेड्यांना राधानगरीला जोडणारा वळण रस्ता २७ कि.मी.चा आहे. नऊ कि.मी.चा रस्ता वन्यजीव विभागाच्या क्षेत्रातून जातो. अभयारण्य क्षेत्रातील रस्ता वगळता डांबरीकरण झाला आहे. तो बारमाही वाहतुकसाठी योग्य आहे. मात्र, अभयारण्य क्षेत्रातील रस्ता डांबरीकरणाभावी बारमाही वाहतुकीयोग्य राहिला नाही. खडीकरण आणि मजबुतीकरण झाले आहे. मात्र, डांबरीकरणास वन्यजीव विभागाने हरकत घेतल्याने हा रस्ता वर्षांनुवर्षे रखडला आहे. वन्यजीव विभागाच्या परवानगीचा मुद्दा कळीचा ठरला आहे. परवानगीअभावी दोन दशकांहून अधिक काळ डांबरीकरण रखडले आहे. वन्यजीव विभाग परवानगीचा प्रस्ताव केवळ चर्चेत राहिला. वन्यजीव कायद्यातील तरतुदीनुसर रीतसर परवानगीच्या प्रस्तावाची कार्यवाही झालेली नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याआधी वन्यजीव विभागाला प्रस्ताव देण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश केले होते. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने तोडगा दृष्टिपथात आला नाही. आता पुन्हा नव्याने अभयारण्य क्षेत्रातील रस्ता सुधारणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अखंड पाठपुरावा आणि शासकीय, प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ यातून हा प्रलंबित गुंता सुटणार आहे.
वाकी घोलातील गावांना राधानगरीला जोडणारा मूळ रस्ता काळम्मावाडी जलाशयात गेला. वाकी घोलातील काही गावे विस्थापित झाली. उर्वरित गावांच्या दळणवळणासाठी धरण जलाशायाच्या पूर्व बाजूने पर्यायी रिंगरोड प्रस्तावित झाला. त्याचे काम पूर्णत्वास येण्याआधीच १९८५ ला विस्तारित वन्यजीव विभागाची घोषणा झाली. २७ कि.मी. लांबीच्या वळण रस्त्यापैकी साडेनऊ किलोमीटर रस्ता वन्यजीव क्षेत्रात समाविष्ठ झाला. त्यापासून तीन दशकांहून अधिक काळ साडेनऊ कि.मी.चा रस्ता वन्यजीव विभागाच्या कचाट्यात अडकून पडला. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात प्रवास अधिकच खडतर असतो. वाहतूक व्यवस्था खंडित होते.
.....
चौकट :
पावसाळ्यात दुप्पट फेरा वाचणार
राधानगरीला जोडणारा जवळचा आणि किफायतदार वाकी घोल रस्त्याचे डांबीकरण झाल्यास हा रस्ता बारमाही दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. राजापूर ते चाफोडीपर्यंतच्या रस्त्याची डांबरीकरणाअभावी अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात २७ कि.मी. अंतरावर राधानगरीला येण्यासाठी गारगोटीमार्गे जवळपास ६० कि.मी.चा फेरा काढून यावे लागते. हा रस्ता झाल्यास अंतर निम्म्याने कमी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.