व्याकूळ झालेल्या प्राण्यांची तहान शमणार
राधानगरी-दाजीपूर अभयारण्यात पाणवठ्यांची ‘वन्यजीव’ची उपाययोजना
मोहन नेवडे ः सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. १० : राधानगरी-दाजीपूर अभयारण्यातील वन्यजीवांना उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची कमतरता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात मुबलक पाणीसाठा राहणाऱ्या बोरवेल पाणवठ्यांची उपाययोजना आखली आहे. ऐन उन्हाळ्यात तहानेने व्याकूळ झालेल्या प्राण्यांना हे पाणवठे वन्यजीवांसाठी आधारवडच ठरणार आहेत.
पहिल्या टप्प्यात अभयारण्यक्षेत्रात वन्यजीवांच्या अधिवासानुसार ११ पाणवठे निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील सात पाणवठे तयार झाले आहेत. या पाणवठ्यांत कायम मुबलक पाणीसाठा राहण्यासाठी पाणवठ्यालगत कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कूपनलिकांना सौरवीजेवरील मोटरपंप जोडले आहेत. कूपनलिकेतील पाणी उपशासाठी मोटरपंप ऑटो असल्याने मोबाईल यंत्रणेद्वारे तो सुरू करता येतो. त्यातून पाणवठ्यात थेट पाणी सोडले जाते. आवश्यकतेनुसार पाणवठ्यात अखंडितपणे पाणीसाठा सुरू करण्यास कूपनलिकांची व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरली आहे.
आता वन्यजीव या पाणवठ्यांवरच तहान भागविणार आहेत. वन्यप्राण्यांना उन्हाळ्यातही पाण्याची मुबलकता राहणार आहे. तसेच वन्यजीवांचा पाण्याचा शोधार्थ अभयारण्यक्षेत्राबाहेर होणार वावर कमी होणार आहे. उन्हाळ्यात अभयारण्यक्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतील पाणीसाठा संपुष्टात येतो. त्या काळात वन्यजीव पाण्यासाठी राधानगरी धरण जलाशयाकडे धाव घेतात. वन्यजीव पाण्यासाठी अभयारण्यक्षेत्राबाहेर पडतात. अपवादात्मक स्थितीत वन्यजीव आणि मानव संघर्ष घडतात. या बाबी पाणवठ्याच्या उपायोजनेतून टळणार आहेत. अधिवासानुसार पाणवठे निर्माण करण्यात येत असल्याने आगामी काळात वन्यजीवांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जवळपास संपुष्टात येणार आहे. विस्तारित अभयारण्याच्या मांजरखिंड हद्दीपासून पूर्ण अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास अभ्यासून पाणवठ्याची ठिकाणे निश्चित केली आहेत.
........
कोट...
पहिल्या टप्प्यातील ११ पाणवठे निर्माण करण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच पाणवठे प्रस्तावित आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. निधीची तरतूद होताच वन्यजीवांच्या अधिवासानुसार निश्चित केलेल्या ठिकाणी पाणवठे निर्माण केले जातील. जेणेकरून उन्हाळ्यात वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ अभयारण्य क्षेत्राबाहेर पडणार नाहीत. पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या हालचालीवर देखरेख करणे शक्य होणार आहे.
- सुहास पाटील, वन्यजीव अधिकारी, राधानगरी अभयारण्य
............
दृष्टिक्षेपात...
वन्यजीवांच्या अधिवासानुसार पाणवठ्यांची ठिकाणे निश्चित
पहिल्या टप्प्यात ११ पाणवठे प्रस्तावित
पैकी सात पाणवठे तयार
पाणवठ्यालगत कूपनलिकांची खोदाई
कूपनलिकांना सौरऊर्जेवरील मोटरपंपाची जोडणी
ऑटो यंत्रणेमुळे मोबाईलद्वारे पाणी उपसा करणे शक्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.