कोल्हापूर : येथील आर. के. नगर परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. रात्री अपरात्री पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांना ती रात्र जागूनच काढावी लागते. पाणी साठवण्याची क्षमता अपुरी असल्याने ग्रामपंचायतही काही करू शकत नाही.
आर. के. नगर मोरेवाडी या परिसराला दोन दशकांपूर्वी कळंबा तलावातून पाणीपुरवठा होत होता. येथील उपनगरांची संख्या वाढल्यावर 13 गावांची स्वतंत्र पाणी योजना केली. दूधगंगा नदीमधून थेट पाणी आणले. शासकीय योजनेतील निकषांप्रमाणे यासाठी तेथील नागरिकांनी वर्गणी काढून पाईपलाईन बसवल्या. ही योजना झाली की रोज नियमितपणे पाणीपुरवठा होईल. सर्वांना समान पाणी मिळेल, असे चित्र रंगवले; पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. आजही इथे एक दिवसआड पाणी येते.
पाणी साठवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे दोन टाक्या आहेत. यातील एक टाकी दीड लाख लिटरची तर दुसरी अडीच लाख लिटरची आहे. पूर्वी पाणी पुरवठ्यासाठी या टाक्या योग्य होत्या. मात्र आता वस्ती वाढल्याने पाणी साठवण्याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने टाक्यांची क्षमता वाढवण्याचा प्रस्तावही संबंधित विभागाकडे दिला. मात्र, त्यानंतरही काही झाले नाही. त्यामुळे नदीतील पाणी आल्यानंतर ते तसेच पुढे सोडले जाते. बाकीच्या गावांना पाणीपुरवठा केल्यानंतर पाणी आर. के. नगर व त्या परिसरात दिले जाते. त्यामुळे ते रात्री-अपरात्री येते. 10 ते 12 लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता असणाऱ्या टाक्या बसवल्या, तर पाणी साठवून ठेवून पाणी सोडण्याचे एक वेळापत्रक बनवता येईल. यासाठी या दोन टाक्यांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.
हवेमुळे फक्त मीटरच फिरते
बहुतांशी घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी मोठ्या टाक्या आहेत. या टाकीच्या पाईपचा नळ पाण्यासाठी सुरू करून ठेवला जातो. जेणेकरून पाणी आले तर ते टाकीत पडत राहावे; पण बरेच वेळा पाणी उशिरा येते आणि पाइपमधील हवेमुळे मीटर फिरत राहते. पर्यायाने काही वेळा वाढीव बिलही येते.
आर. के. नगर आणि मोरेवाडी परिसरातील पाणीप्रश्न जुनाच आहे. त्यावर किमान उपाय म्हणून पाणी साठवण्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. यासाठी येथील टाक्यांची क्षमता वाढवावी. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.
- किरण नाडगोडा, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.