Faltan-Koregaon-Vidhansabha
Faltan-Koregaon-Vidhansabha 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी

व्यंकटेश देशपांडे

फलटण - माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि दमदार विरोधी पक्ष भाजपचा उमेदवार निश्‍चित झाला नसल्याने त्याबाबतची उत्सुकता फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिगेला पोचली आहे. उमेदवारांच्या नावांच्या घोषणेनंतरच विविध पातळ्यांवर मतांच्या आकडेवारीचे राजकारण होत राहील. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची कसोटीच लागणार, हे आजचे चित्र आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे राजकीय वर्चस्व आहे.

२००९ पासून या मतदारसंघात झालेली जलसिंचनाची कामे, उभारलेले उद्योगविश्‍व, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा, जोडीला दळणवळण या प्रमुख बाबी जमेच्या राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघावर सगळीच मदार आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील निवडून आले असले तरी त्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ११०४ चे मताधिक्‍य घेतले होते. विशेषत: तालुक्‍यातील बागायती पट्ट्यात खोत यांची ‘शिट्टी’ जोरात वाजली होती.

परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहिते-पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वलय असले तरी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचा सवतासुभा आहे. त्यातच काँग्रेसने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सहकार्य किंवा मदत न करण्याची जाहीरपणे वाच्यता केली आहे. त्यापुढे जाऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढामधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. एकूण फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही काँग्रेसमध्ये एकविचार नाही. त्यातच एकेकाळचे काँग्रेसचे नेते व रणजितसिंह निंबाळकरांचे उजवे हात असलेले दिगंबर आगवणे यांनी मध्यंतरी उपोषणादरम्यान घडलेल्या घडामोडीनंतर काँग्रेसला रामराम ठोकला असून, शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे. तशीच थोडीफार स्थिती भाजप-शिवसेना युतीची आहे. मागील निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार तासगावकर यांना केवळ १२ हजार मते मिळाली होती. त्यांच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते फारसे दिसत नव्हते. परिणामी येत्या विधानसभा निवडणुकीत कमी- जास्त प्रमाणात यापेक्षा फारसे वेगळे चित्र दिसेल, याची आज शक्‍यता नाही. मात्र, त्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढविलेले श्री. आगवणे यांना चांगली मते मिळालेली होती. त्यांचाही कोरेगावमध्ये चांगला संपर्क आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातील येणारी निवडणूक ही फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीची नांदी असली तरी आजचा विचार करता फलटणमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तथापि युवा पिढी काही प्रमाणात युतीकडे झुकल्याचे चित्र आहे. एकूणच माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील व संजय शिंदे यांच्या नावाची चर्चा असली तरी श्री. शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याही पुढे जाऊन इतक्‍या दिवसांच्या चाचपणीनंतर राष्ट्रवादीला भाजपला ‘फाइट’ देण्यासाठी सक्षम उमेदवार मिळाला नसल्याने विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी घेण्याबाबत आग्रह होताना दिसत असल्याचे राजकीय वर्तुळातून दिसून येत आहे. मात्र, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने भाजप उमेदवाराला झगडावे लागेल. त्यातच भाजपचे चर्चित उमेदवार सुभाषराव देशमुख यांचा आजचा माण- खटाव आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संपर्क दौरा त्यांच्या उमेदवारीचे संकेत देणारा आहे, असे मानावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT