moveable spot puncture garage in kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

कसं सुरु झालं हे ‘हाैस’ स्पॉट पंक्‍चर गॅरेज..?

संदिप खांडेकर

कोल्हापूर - आई हौसाबाई व वडील सदाशिव मोटे मोलमजुरीवर कुटुंबाचा गाडा हाकत होते. पदरातल्या पाच मुलांना सांभाळणं सोपं नव्हतं. त्यांच्या कष्टाचा रोजचा धडा मुलांसमोर होता. मुलांनी शिक्षणात कसूर केली नाही. एकाच गणवेशावर वर्ष काढलं. गडहिंग्लज तालुक्‍यातील करंबळी गावातल्या मोटे कुटुंबीयांचं जगणं महाग होतं. कोल्हापुरात आलेल्या रमेश मोटे यांच्या वाट्याला केएमटी बसचालकाची नोकरी आली. फावल्या वेळेत ‘हौस स्पॉट पंक्‍चर’चं त्यांचं काम झोकात सुरू आहे. टू व्हिलरलाच हवा भरण्याचा कॉम्प्रेसर त्यांनी इर्शाद मुजावर व रवी कोरवी यांच्या मदतीने बनवून घेतलाय. त्यांचं फिरत पंक्‍चर गॅरेज चर्चेचं ठरलंय.

रमेशरावांची कुस्ती सुटली अन् 

हौसाबाई व सदाशिव यांची मिळकत कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. भैरू थोरले असल्याने त्यांच्या खांद्यावर परिस्थितीचं ओझं पडलं. आनंद, रमेश, संजय, श्रावण यांनी शाळेला आपलंस केलं. शिक्षणातलं भविष्य त्यांच्यासमोर होतं. रमेशरावांनी पाचवी ते दहावीचं गावातल्या विद्यामंदिरात, तर आठवी ते दहावीचं शिक्षण अत्याळच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये घेतलं. कबड्डीत चढाईत व पकडीत त्यांचं कसब होतं. गावातल्या हनुमान तालमीत दहावीपर्यंत त्यांनी अंग मोडलं होतं. मिलिटरीमन वस्ताद सदाशिव पाटील यांच्या बेरक्‍या नजरेतून त्यांची सुटका नव्हती. मेहनतीतला चुकारपणा केला तर पाठीवर वळ उठायचा. रमेशरावांना इच्छा नसतानाही कुस्ती सोडावी लागली. ऊस ओढण्यासाठी ट्रॅक्‍टरवर ड्रायव्हरचं काम त्यांनी सुरू केलं. उसाच्या हंमामापुरतंच ते काम होतं. ट्रक ड्रायव्हरच्या कामातही त्यांनी स्वत:ला अजमावलं. लांब पल्ल्याचा प्रवास सुरक्षितपणे करण्यात त्यांचा आत्मविश्वास उंचावला.

असं सुरु झालं फिरतं पंक्‍चर गॅरेज

गाव सोडून ते कोल्हापुरात राजारामपुरी चौदाव्या गल्लीत स्थायिक झाले. केएमटीच्या चालक परीक्षेत पास झाले. घराचं आडं आर्थिकदृष्ट्या मजबूत झालं. बाकीच्या भावांचं शिक्षण पदवीपर्यंत पोचलं. नोकरीत प्रत्येकानं जम बसवला. मोटे कुटुंब स्थिरस्थावर झालं. रमेशरावांनी ड्रायव्हरच्या कामात हयगय केली नाही. ड्यूटी इमान इतबारे करण्याला त्यांनी महत्त्व दिलं. गुणवंत चालक म्हणून त्यांचा दोन वेळा सत्कार झाला.
नोकरीची वेळ ठरलेली असल्याने फावल्या वेळेचं गणित त्यांच्या डोक्‍यात होतं. फिरतं पंक्‍चर गॅरेज काढण्याची कल्पना त्यांच्या डोक्‍यात संचारली. त्याचं वेळापत्रक पक्क झालं. पंक्‍चर काढण्याच्या साहित्याची खरेदी झाली. या कामाला पत्नी शोभा यांनी ग्रीन सिग्नल दिला. आई हौसाबाई व वडील सदाशिव यांच्या नावातली पहिली अक्षरं जुळवून ‘हौस’ स्पॉट पंक्‍चर गॅरेजचं नामकरण झालं.पंक्‍चर काढल्यावर हवा भरण्याची अडचण फूट पंपने दूर केली. पाच वर्षे सिंगल पाईपने हवा भरण्याचे काम झाले. बदल म्हणून डब्बल फूट पंप त्यांनी उपयोगात आणला. हवा भरण्याचं काम अधिकाधिक सोपं झालं पाहिजे, यावर ते ठाम होते. त्यांच्या डोक्‍यात त्याची चक्रं फिरत होती. कॉम्प्रेसर बनविण्याचं भूत डोक्‍यातून हटत नव्हतं. इर्शाद मुजावर व रवी कोरवी यांच्या तांत्रिक ज्ञानातून कॉम्प्रेसर तयार झाला. गाडी पंक्‍चर झालेल्या ठिकाणी पोचण्याची त्यांची खासियत आहे. 

पंक्‍चर काढण्याच्या कामात कसलाच कमीपणा नाही

नोकरीची २७ वर्षे त्यांनी पूर्ण केली आहेत. पाच वर्षे नोकरी बाकी आहे. पंक्‍चर काढण्याच्या कामात त्यांना कमीपणा वाटत नाही. एका कॉलवर ते अवघ्या दहा मिनिटांत पोचतात. त्यांच्या कामाचं राजारामपुरी चौदाव्या गल्लीला कौतुक आहे. त्यांचा मुलगा रजत हा राजाराम महाविद्यालयात शिकतो आहे. तो वडिलांच्या वेळेच्या सदुपयोगावर खूश आहे. मुलगी श्रृतिका पदवीपर्यंत शिकली असून, शिवाजी विद्यापीठात कंत्राटी कामावर आहे. रमेशरावांनी गावाची नाळ अजून तोडलेली नाही. वडिलांनी वयाची ऐशी ओलांडली आहे. त्यांच्या ख्यालीखुशालीसाठी गावाकडे त्यांची पावले आपसूकच वळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला ११ कोटींचा दंड, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनीच मोडला नियम

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

Kolhapur 60 kg Silver Robbery : थरारक! आरामबसवर दरोडा, ६० किलो चांदी लुटली; कोल्हापुरातील घटना, बस थेट पोलिस ठाण्यात...

Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी नववर्षात भूसंपादन; जमीन परतावा, दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर 'वंचित'ची नजर; '200 उमेदवार उतरवणार रिंगणात'; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT