सांगली ः वारणाली की कुपवाडमध्ये या वादात मंजूर असलेले महापालिकेचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आता न्यायालयीन वादात अडकल्याने आता महापालिकेतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी स्वतंत्र हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने 40 बेडच्या सुसज्ज स्वतंत्र हॉस्पिटलचा साडेतीन कोटी रुपयांच्या आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच तो प्रशासनाकडे सादर होणार आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेला दहा आरोग्य केंद्रे आणि कुपवाडसाठी 50 बेडचे सर्वोपचार रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र जागेच्या वादात रखडले होते. त्यामुळे हॉस्पिटलसाठी मंजूर 5 कोटी रुपयांचा शासन निधी पडून होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी मात्र वारणालीतच हॉस्पिटल झाले पाहिजे असा अट्टहास धरला होता. दुसरीकडे भाजपचे गजानन मगदूम यांच्यासह सदस्यांनी ते कुपवाडमध्ये वाघमोडेनगरमध्ये व्हावे यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.
भाजपने वाघमोडेनगर येथे जागा नव्याने विकत घेऊन तेथे सर्वोपचार हॉस्पिटल उभारणीचा ठराव महासभेत तसा केला होता. जागेचा वाद सुरू असतानाच आयुक्त कापडणीस यांनी हॉस्पिटलसाठी 4 कोटी 45 लाख 61 हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह कुपवाड संघर्ष समितीने प्रक्रियेला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सध्या हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, कुपवाड मधील नगरसेवक शेडजी मोहिते, नगरसेविका रईसा रंगरेज, कॉंग्रेसच्या पद्मश्री पाटील यांच्यासह काहीजणांनी कुपवाडला स्वतंत्र हॉस्पिटल द्यावे असा पवित्रा घेतला. त्यासाठी जयंत पाटील यांना भेटून साकडे घातले होते. जयंत पाटील यांनी त्यासाठी महापालिकेची जागा निश्चित करून प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार कापडणीस यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी कुपवाडमधील सर्व्हे क्र. 459 मध्ये सुमारे दीड एकर महापालिकेची आरक्षित जागा निश्चित केली असून त्यासाठीची प्रशासकीय तयारी आता सुरू झाली आहे. त्याच्या मंजुरीची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत तो प्रस्ताव लवकर आरोग्य विभागाकडे सादर केला जाईल.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.