सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने "ब्रेक द चेन'अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार महिनाभर दुकाने बंद करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे फेरविचार करून निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी सांगली शहर सराफ असोसिएशन आणि सांगली जिल्हा सराफ समितीने केली.
शहर संघटनेचे अध्यक्ष रणजित जोग, सचिव राहुल आरवाडे, समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडुरकर, सचिव पंढरीनाथ म्हणाले, ""2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे सराफ पेठेचे मोठे नुकसान झाले. त्यातून सराफ व्यावसायिक सावरत असतानाच गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे सराफांची दुकाने बंद राहून पुन्हा मोठे नुकसान झाले.
लॉकडाउन संपल्यानंतर बाजारात आलेल्या मंदीमुळे सर्व व्यवहार जेमतेम सुरू आहेत. तसेच लॉकडाउन काळात झालेल्या नुकसानीनंतर शासनाने कोणतीही मदत केली नाही. सर्व प्रकारचे कर, कर्जाचे हप्ते, वीज बिल यात कोणतीही सवलत मिळाली नाही. व्यापाऱ्यांनी नुकसान सहन करून सर्व कर व देणी भागवली आहेत.''
ते म्हणाले, ""सध्या शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून आम्ही दुकाने व व्यापार सुरू केला होता. एप्रिलपासून सणासुदीचे दिवस, लग्नसराई सुरू आहे. पाडवा आणि अक्षय्य तृतीया जवळ आली आहे. अशा वेळी कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने "ब्रेक द चेन'अंतर्गत एप्रिलअखेर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तग धरून राहिलेला व्यापार संपून जाण्याची भीती आहे. वीकेंड लॉकडाउनला विरोध नाही; परंतु महिनाभर दुकाने बंद ठेवण्यास विरोध आहे. दुकाने बंद ठेवण्याऐवजी सराफ पेठेला सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत व्यवसायाची परवानगी द्यावी.''
सराफ व्यापारी हरिष लालन, पापालाल सारडा, शाम सारडा, रवींद्र पाटील, जिग्नेश शहा, कृष्णा सोमानी आदी उपस्थित होते.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.