पश्चिम महाराष्ट्र

पानिपतचा होमकुंड जागता ठेवा : विश्वास पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव (जि. सातारा) : बुऱ्हाडी घाटातील युद्धात "क्‍यू पटेल और लडोगे?' या नजीबाच्या प्रश्नावर कण्हेरखेडच्या दत्ताजी शिंदे यांनी दोन्ही हातांच्या मुठीत वाळू घेऊन "क्‍यू नही? बचेंगे तो और भी लडेंगे,' असे त्वेषपूर्ण उत्तर दिल्याचा अंगावर शहारे निर्माण करणारा प्रसंग सांगत पानिपतकार विश्वास पाटील यांनी पानिपतचा रणसंग्राम उभा केला. "पानिपतमध्ये लढणारे कण्हेरखेडसारखे दुसरे मर्दांचे गाव नाही, त्यामुळे पानिपतचा होमकुंड असाच जागता ठेवा,' असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
 
पानिपतच्या युद्धाच्या आठवणी जागवणाऱ्या पानिपत शौर्य दिवस कार्यक्रमानिमित्त कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संजय शिंदे होते. याप्रसंगी ग्वाल्हेर येथील शिंदे घराण्याचे वंशज हर्षजित शिंदे, इंद्रजित शिंदे, सुदर्शन शिंदे, फैजल खान, अभिनेते आनंद काळे, आमदार महेश शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, सुनील खत्री, केशव शिंदे, दत्ता पवार, समीर शिंदे, दीपक शिंदे, धनाजी भोसले, गणपत शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा -  विश्वास पानिपतात (खरंच) गेला?
 
पानिपत हे पुण्यपत आहे, असे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, ""राष्ट्राच्या जागरणासाठी केलेली ही लढाई आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या या लढाईत मराठ्यांना निसर्गाचीही साथ मिळाली नव्हती. अत्यंत कमी तापमानात अक्षरशः पाण्याचा बर्फ झाल्यासारख्या स्थितीतही दत्ताजी शिंदे व त्यांच्या मराठा बहाद्दर सहकाऱ्यांनी यमुना नदीतून घोडे पार केले.

पानिपतसारखे रणमैदान व असा पराक्रम दुसरा कोठेही झाला नाही. त्यामुळे पानिपतचा होमकुंड असाच जागता ठेवला पाहिजे.'' या वेळी सुदर्शन शिंदे, आमदार शिंदे, अभिनेते काळे यांचीही भाषणे झाली. प्रा. डॉ. संग्राम शिंदे यांनी प्रास्ताविक व एन. एल. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विजयसिंह शिंदे यांनी आभार मानले. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी सातारा येथून निघालेल्या रॅलीचे कण्हेरखेडमध्ये आगमन झाले. त्यानंतर अतीत येथील युवकांनी दांडपट्टा, तलवारबाजी, अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.


हिंदुस्थानच्या सरसेनापतींचे गाव : कण्हेरखेड 


कधी काळी महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपतींचा अवमान करू पाहणाऱ्या दिल्लीच्या बादशहाची सर्व सूत्रे एका मराठा वीराने आपल्या हाती घेत सबंध हिंदुस्थानवर आपला अधिकार गाजवला, त्या दिल्ली दिग्विजय वीर महादजी शिंदे सरकार यांचे गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरेगावजवळ असणारे कण्हेरखेड... या गावाचा इतिहास आणि ऐतिहासिक वास्तू आजही युवा पिढीला प्रेरणा देत आहेत... 

-  सुहास शिंदे 

सातारा जिल्ह्यातील अनेक पराक्रमी सेनानींच्या नावाची खूप मोठी यादी समोर येते. यामध्ये प्रामुख्याने शिंदे घराण्यातील अनेक वीर आपल्या समोर येतात. नेसरी युद्धात प्रतापराव गुजर यांच्यासोबत पराक्रम गाजवणारे विठोजी शिंदे, माळवा प्रांतात सर्वप्रथम मराठ्यांचे वर्चस्व वाढवणारे नेमाजी शिंदे आणि त्यांच्यानंतर इतिहासात एक नाव येते ते म्हणजे कण्हेरखेडचे राणोजी शिंदे यांचे. अखंड शौर्याची आणि पराक्रमाची परंपरा असणारे हे घराणे आपल्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने पुढे आले आणि शाहू छत्रपतींच्या आदेशाने राणोजी उत्तर भारतातील माळवा प्रांतावर आपला अधिकार गाजवू लागले.
 
या गावाचा उल्लेख सर्वप्रथम छत्रपतींच्या घराण्याशी सोयरसंबंध झाल्यानंतर येतो. तो असा, की साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा पहिला विवाह कण्हेरखेडच्या शिंदे सरकारांच्या अंबिकाबाई नावाच्या मुलीशी झाला होता. खुद्द छत्रपतींच्या घराण्याबरोबर संबंध झाल्यानंतर या गावचा आणि शिंदे घराण्याचा नावलौकिक त्याकाळी किती मोठा असेल याचा आपल्याला अंदाज येतो. त्यानंतर मात्र कण्हेरखेड गावाच्या भूमिपुत्रांनी आपल्या शौर्याने दाही दिशा उजळवल्या. शाहू महाराजांचे निष्ठावंत सरदार माळवा प्रांताचे सुभेदार राणोजीबाबा शिंदे यांचा दरार उत्तर हिंदुस्थानातील तत्कालीन सर्वच मातब्बर घराण्यांनी अनुभवला. दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली आणण्यात या बहाद्दर सेनानीचा मोलाचा वाटा होता. याच कण्हेरखेड गावातील सरदार साबाजीराव शिंदे यांची अटक स्वारी इतिहासात चांगलीच गाजली. अफगाणिस्थानच्या सरहद्दीवर असणारा हा किल्ला साबाजीराव शिंदे यांनी अगदी अल्प फौजेच्या साह्याने वर्षभर मराठ्यांच्या अंमलात ठेवला होता. त्यांचा मुलगा बयाजीराव शिंदे यांचाही पराक्रम अनेक मोहिमात दिसून येतो.

नक्की वाचा -  दुष्‍काळात येथे पिकंतय पाणी

राणोजीबाबांचे पाच पुत्र म्हणजे मराठ्यांचे पाच पांडवच जणू. जयाप्पा, दत्ताजी, जोतिबा, तुकोजी आणि महादजी यांच्या पराक्रमाच्या कथा आजही महाराष्ट्राला व मराठी माणसाला प्रेरणा देत आल्या आहेत. या पाच पांडवांची मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक वेगळीच प्रतिमा आहे. प्रत्येकाचा पराक्रम आणि शौर्य अद्वितीय आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी हे पाच बंधू सदैव तत्पर होते. हिंदुस्थानच्या सर्व संपन्न बादशाहीच्या राजकारणात थेट प्रवेश करून मराठ्यांचा दरार प्रस्थापित करणारे जयाप्पा शिंदे असोत वा बुराडी घाटावर परकीय शत्रूला आव्हान देणारे दत्ताजी किंव्हा पानिपत युद्धात जीवाची पर्वा न करता शेवटपर्यंत लढणारे तुकोजी शिंदे म्हणजे शौर्याचे जणू पुतळेच. याच युद्धात सुभेदार जनकोजीराव शिंदे यांच्या हौतात्म्याला विसरून चालणार नाहीच. असे अनेक वीर पुरुष निर्माण करणारी ही भूमी म्हणजे कण्हेरखेड. याच मातीत जन्म घेणारे श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांची हिंदुस्थानच्या बादशहा शहा आलम याने केलेली काव्यमय विनवणी वाचल्यानंतर महादजींचे मोठेपण आपल्याला समजते.

नक्की वाचा -  पैलवान असाच घडत न्हाय..! 

या काव्यमय विनवणीमध्ये बादशहा महादजीना म्हणतात, की "राजपाठ सब त्यजके आये तुम्हारे बस, अब ऐसी किज्यो महादो की होवे तुम्हरे जस.' सर्व राजकारणाचा त्याग करून मी तुम्हाला शरण आलो आहे आता तुमच्या हाताला यश येईल, असे राजकारण तुम्ही करावे आणि हिंदुस्थानचा कारभार तुम्ही पाहावा, ही काव्यमय विनवणी पाहिल्यावर आपल्याला महादजी शिंदे यांचा तत्कालीन राजकारणात असणारा दबदबा आपणास समजतो. महाराजाधिराज आणि वकील ए मुत्तल्लक पदवी म्हणजेच बादशहाचे सर्व अधिकार महादजींना मिळाल्यानंतर महादजींनी हिंदुस्थानभर अंमल गाजवून मराठा साम्राज्याची कीर्ती आशिया खंडात पसरविली, वाढवली. त्यांच्यासोबत होते साबाजी शिंदे यांचे नातू सरदार धारराव शिंदे. दिल्ली मोहीम असो वा जाटांचा बंदोबस्त धाररावांनी महादजींना साथ केली. हे धाररावही कन्हेरखेडचेच. त्याच कालखंडात मानाजीराव शिंदे फाकडे हे सरदार पुणे, सातारा भागात आपला अंमल गाजवत होते. याच घराण्यातील आनंदराव, दौलतराव, केदारजी, रवलोजी, संभाजी, नरसिंगराव यांची नाव इतिहासात येतात. एकंदरीतच कन्हेरखेड म्हणजे पराक्रमी सेनानी निर्माण करणारा कारखानाच म्हणावा लागेल. आपल्या अतुलणीय पराक्रमाने शौर्याने आणि राजनीतीने या गावातील रणबहाद्दर व्यक्तींनी मराठा साम्राज्याच्या निर्माणासाठी आपले योगदान दिले. 

हेही वाचा - शिवरायांशी तुलना झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले हाेते...

लोकशाहीमध्ये सुद्धा या घराण्यातील ग्वाल्हेरचे महाराज (कै.) माधवराव शिंदे, राजमाता विजयाराजे शिंदे, माजी खासदार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, यशोधराराजे शिंदे यांनी आपले अस्तित्व अबाधित राखले आहे. गावात या घराण्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पराक्रमाची साक्ष देत तग धरून उभ्या आहेत. राणोजी शिंदे यांनी बांधलेले शेकडो वर्षांपूर्वीचे कान्हेरेश्वर मंदिर, त्यांचा ऐतिहासिक वाडा, दौलतराव शिंदे यांच्या महाराणी बायजाबाई यांची छत्री (समाधी) आणि विशेष म्हणजे पानिपत युद्धात हुतात्मा झालेल्या शिंदे बंधूंचे 16 खांबी स्मारक या गावात पाहायला मिळते. आपल्या निर्भिड आणि हट्टी स्वभावाने इतिहासात एक वेगळी ओळख असणारे सरदार मानाजी शिंदे (फाकडे बहाद्दर) यांचा वाडाही आज पडीक अवस्थेत आपल्याला या गावात पाहायला मिळतो. एकंदरीतच सातारा जिल्ह्यातील हे छोट गाव आपल्या स्वकर्तृत्वाने हिंदुस्थानच्या इतिहासात प्रसिद्ध झाले आणि नावाजले गेले. अशा या गावातील या ऐतिहासिक वास्तू प्रत्येकाने पाहाव्यात आणि त्यावर अभ्यास करावा अशाच आहेत.

नक्की वाचा -  सैन्य दलातील जवानांसाठी आपुलकीचा गाेडवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT