Blind Sakshi and Suraj Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : मुलगा-मुलगी अंध : पत्नीच्या किडन्या निकामी; आभाळ फाटलं अन् डोक्यावर छत नाही

शत्रूच्या वाट्याला देखील येऊ नयेत, अशा यातना एरंडोली (ता. मिरज) येथील कणसे कुटुंब सहन करत आहे.

अजित झळके

सांगली - शत्रूच्या वाट्याला देखील येऊ नयेत, अशा यातना एरंडोली (ता. मिरज) येथील कणसे कुटुंब सहन करत आहे. अठरा वर्षांची मुलगी व चौदा वर्षांचा मुलगा पूर्णतः अंध आहेत. अकरावीत शिकणारा धडधाकट मुलगा हीच आधाराची काठी. चंदू व सारिका हे पती-पत्नी त्यांना घेऊन रोज जगण्‍याशी लढत होते.

तोच एक आकस्मिक बातमी आली... पत्नी सारिकाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि आधार कोलमडला. ती आता डायलिसिसवर आहे. आभाळ फाटलंय अन् डोक्यावर छत नाही अशी स्थिती. पत्र्याचे शेड, भोवती ग्रीन हाऊसच्या प्लास्टिक कागदाच्या पडद्याचा कूड, सारवलेली जमीन...रोज रडायचं अन् रोज लढायचं, असा जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

ग्रीन हाऊसचा कामगार असलेला चंदू कणसे धिटाईनं लढतोय, हात-पाय मारतोय. पत्नीला वाचवण्यासाठी संघर्ष करतोय. अंध मुलगा व मुलगी भावाचा आधार घेऊन कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत नियमित जातात. भविष्यासाठी सोनेरी किरणं शोधतात. कितीही दगड मनाचा माणूस असला तरी चंदूच्या कुटुंबाचा हा संघर्ष पाहून त्याच्याही मनाला पाझर फुटेल... चंदू कोलमडून पडण्याची भीती त्याच्या मित्रांना नेहमी वाटते.

ते जमेल तसा त्याला आधार देतात. सारिका मृत्यूशी झुंज देतेय, अशावेळी या कुटुंबाला हक्काचं छत, मुलांना शिक्षणासाठी आधार हवाय. चंद्रावर पोहोचलेल्या भारतात चंदूसारख्यांच्या संघर्षकथा काही कमी नाहीत; पण चंदूसाठी सगळं आभाळ फाटलंय... टाके घालायचे कुठे आणि किती?

चंदू कणसे एरंडोलीत लिंगनूर रस्त्यावरील पाटील-कणसे वस्तीवर राहतो. त्याचं ना घर आहे, ना झोपडी, ना शेड. सारिका शिवणकाम करायची. त्यातून चार पैसे मिळायचे. चंदू नित्यनेमाने ग्रीन हाऊस उभारणीच्या कामाला जायचा. शेताचा छोटा तुकडा, तो कसून एक-दोन जनावरं केली. दोन अंध मुलांना नेटानं शिकवलं.

सारिका मुलांना हाताला धरून अडीच किलोमीटर पायी शाळेत सोडायची व न्यायला यायची. संघर्ष होता, तो त्यांनी जिद्दीनं केला. किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात आठवड्यातून एकदा डायलिसिस करण्याची वेळ आली.

आता काम करणे

अशक्य झाले. मात्र या मुलांनी कधी गरिबी, संघर्षापुढे हार मानली नाही. सदैव चेहऱ्यावर हसू. गरिबी अन् श्रीमंतीतला फरक त्यांना दिसणार कसा? आई-बापाची माया हीच श्रीमंती! आईनं लेकीला चपाती, भाकरी, भाजी करायला शिकवलं. आज तीच अंध मुलगी साक्षी चपाती लाटते, भाजी बनवते, कपडे धुते.

पोळपाटाभोवती पिठाची रांगोळी पडते. बिचारा बाप, भाऊ जमेल तसं तिला साथ देतात. पोटाचे खळगे भरायचेय, तर सांगणार कुणाला? मिरजेपासून पूर्वेला १४ किलोमीटरवर एरंडोली आहे. चंदूच्या कुटुंबाला आधार द्यायला एक पाऊल उचलूया...

घराच्या यादीत नाव; पण अवकाश...

शासनाच्या आवास योजनेच्या यादीत चंदू कणसेचं नाव आहे; पण स्वप्नपूर्तीला खूप अवकाश आहे. प्रतिवर्षी कोटा मंजूर होतो. त्या हिशेबाने चंदूचा नंबर यायला आणखी दोन पिढ्या जातील. अंध साक्षीची बारावी संपल्यानंतर काय...? गावात पुढे शिक्षणाची सोय नाही.

अकरावीत शिकणाऱ्या हर्षदवर जबाबदारी पडलीय. दोघा अंध भावंडांना सोडून त्यानं करिअर तर कसं करायचं? सूरज नववीत आहे. चंदूपुढे अशा प्रश्‍नांचे काहूर माजलेय. त्याला उत्तर शोधून देण्यासाठी थोड्या सहाय्याची आवश्‍यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची गुप्त भेट; पडद्यामागे घडताएत मोठ्या घडामोडी

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Tirupati Balaji: ‘तिरुपती’चे चार कर्मचारी धर्मावरुन निलंबित; देवस्थानचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT