सांगली : कवलापूर विमानतळाला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेत उद्योग मंत्रालयाने ही जागा महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे ठरले होते, मात्र हा प्रस्ताव कुठे अडकलाय, याचे कोडे उलगडलेले नाही.
जिल्हाधिकारी म्हणतात, आम्हाला याची कल्पना नाही. उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना हा प्रस्ताव रुचलाय की नाही, याची स्पष्टता नाही. त्यामुळे गत वर्षभरापासून यावर केवळ चर्चाच होताना दिसते आहे.
‘सकाळ’ने एक गुप्त व्यवहार उजेडात आणल्यामुळे कवलापूर विमानतळाची १६० एकर जागा वाचली. एका कंपनीच्या घशात ती घातली जात होती. तिचे तुकडे पाडून कोट्यवधी रुपयांच्या ‘कमाई’चा डाव आखला गेला होता. अनेक नामांकित व्यक्तींचा त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता, हे लपून राहिले नाही.
विमानतळ बचाव कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली, ‘सकाळ’ने तिला बळ दिले, सांगलीकरांनी एकजूट दाखवली, कवलापूर गावातूनही विरोध उभा राहिला आणि या जागेचा औद्योगिक विकास संस्थेसाठी व्यवहार करण्याचा डाव हाणून पाडला गेला.
आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी पुढाकार घेत या विषयाला उद्योग मंत्रालयात वाचा फोडली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत विषय लावून धरला.
त्यामुळे उद्योग मंत्रालयाला निर्णय घ्यावा लागला आणि पहिल्या बैठकीतच जागा विक्री व्यवहार रद्द करत ती विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला आला. मात्र दोन्ही बाजूंनी तो केंद्रस्थानी ठेवण्यात आला नाही.
कारण, अनेक राजकीय मंडळींचा त्यात स्वार्थ दडलेला आहे. विमानतळाचा विषय ‘जमीन कमी आहे,’ या कारणास्तव हाणून पाडण्याचे डावही आखले गेले आहेत. काही राजकीय नेत्यांना ‘सांगलीत विमानतळ चालेल का?’ असा प्रश्न पडला आहे.
ऊस नसताना साखर कारखाने काढणाऱ्यांना हा प्रश्न पडावा, याबद्दल लोकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केले. आता या सगळ्या गोंधळात जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव कुठे अडकून पडलाय आणि उद्योग मंत्रालयातील ‘त्या’ बैठकीचा इतिवृत्तांत कुठे आहे, याचा खोलात जाऊन शोध घेण्याची आवश्यकता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत कवलापूरचे विमानतळ कळीचा मुद्दा बनू पाहतोय. मिरजेतील मोहन वनखंडे यांनी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आणि त्यांनी पुढील महिन्यात जागा पाहण्याची ग्वाही दिली आहे. सांगलीतून आमदार सुधीर गाडगीळ सकारात्मक आहेतच, शिवाय पृथ्वीराज पवार हे देखील प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सांगली आणि मिरज या दोन मतदारसंघांवर प्रभाव टाकणारा हा मुद्दा राहणार आहे.
कवलापूर विमानतळाच्या जागेवर काही मंडळींचा डोळा आहे. त्यांच्या डोक्यातून जागा हडपण्याचा विषय गेलेला नाही. त्यामुळेच या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मागे ठेवला जातोय का, अशी शंका आम्हाला आहे. उद्योग मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील महिनाभरात जागा हस्तांतरणाचा निर्णय घ्यावा; अन्यथा विमानतळ बचाव कृती समिती रस्त्यावर उतरेल.
- पृथ्वीराज पवार, निमंत्रक, विमानतळ बचाव कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.