जत - दुष्काळी भागात असणाऱ्या जत शहरावर वर्चस्व मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चढाओढ लागली आहे. थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपलाच यावा, यासाठी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत व नेते सुरेश शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंत्री, आमदार आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उठवल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
रविवारी पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेले दहा दिवस शहरात निवडणूकीची रणधुमाळी आहे. थेट नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदासाठी निवडणूक लागली आहे. प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत आहे. यासाठी तिन्ही पक्षात चढाओढ आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने पालिकेवर आपलेच वर्चस्व निर्माण करण्यासाठी तालुक्यातील नेतेमंडळी आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
थेट नगराध्यक्ष पदाची लढत चुरशीची आहे. या पदासाठी भाजपकडून डॉ. रेणुका आरळी, काँग्रेसच्या शुभांगी बनेनवर व राष्ट्रवादीकडून शबाना इनामदार यांना रिंगणात उतरविले आहे. नगराध्यक्ष आपलाच व्हावा यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. दुष्काळी भागात असणाऱ्या या शहरावर आपले वर्चस्व निर्माण व्हावे, यासाठी राज्यपातळीवरील नेतेमंडळी ठाण मांडून आहेत. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार व नीता केळकर यांच्या सभेने भारतीय जनता पक्षाने शहर भाजपमय करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने माजी मंत्री पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, युवक नेते विश्वजित कदम यांच्या सभा विक्रम सावंत यांनी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादीची भिस्त आमदार जयंत पाटील यांच्यावरच राहिली. नेते सुरेश शिंदे यांनी प्रत्येक प्रभागात कोपरा सभा घेऊन भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचा पाढा वाचला.
सत्ताधाऱ्यांनी दिलेले ना हरकत दाखले, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय या योजनेचा घोटाळा, ठेकेदार नगरसेवक, विविध विकास कामात झालेला घोळ व राजकीय कुरघोड्या हे प्रचाराचे मुख्य मुद्दे होते.
शेवटच्या टप्प्यात निवडणूक अटीतटीची बनली आहे. भाजपची शहरात आपली ताकद आजमावत आहे. त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर असणाऱ्या व लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या रेणुका आरळी यांना उमेदवारी देऊन काँग्रेस व राष्ट्रवादी पुढे आव्हान उभे केले आहे. सुरेश शिंदे गटाचे नगरसेवक काँग्रेसमध्ये आल्याने ताकद वाढली आहे. त्यांनी नगरसेविका व प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या सौ. शुभांगी बनेनवर यांना संधी देऊन राष्ट्रवादी व भाजपपुढे आव्हान टाकले आहे. सगळेच विश्वासू कार्यकर्ते सोडून गेल्याने नव्या मावळ्यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पालिकेचा गड सर करण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी सौ. शबाना इनामदार या सामान्य महिला कार्यकर्तीला नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे.
सत्तेसाठी जोरदार संघर्ष
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. विशेषता राष्ट्रवादीला विविध निवडणुकीत होत असलेली आपली घसरण थांबविण्यासाठी येथे सर्व ताकद लावावी लागणार आहे. त्यांच्यासमोर भाजप व काँग्रेसचे कडवे आव्हान असल्याने जोरदार संघर्ष आहे. थेट नगराध्यक्ष कोणाचा होणार? कोणत्या प्रभागात कोण निवडून येईल, जातीची समीकरणे काय होतील, कोणाचे वर्चस्व निर्माण होईल, याची चर्चा चौकाचौकांत रंगू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.