पश्चिम महाराष्ट्र

भाजपला जुनेच कारभारी का हवेत?

शेखर जोशी

भाजपला महापालिकेचा चेहरामोहरा बदलण्याची एक नैसर्गिक संधी होती; ती ते गमावत आहेत, असे वाटते. अर्थात आयात मालाची सवय लागली की असे होते !  सांगलीची महानगरपालिका मिळाली काय आणि नसली काय, त्याचा फार काही फरक भाजपला होणार नाही. कारण ती ताब्यात नसतानाही दोन आमदार त्यांच्याकडे आहेत. पण ज्यांना लोक कंटाळलेत, बहुदा त्यांचे जुने पक्षही कंटाळले असावेत, अशांना प्रवेश देऊन भाजप काय  संदेश देऊ पाहते आहे... अर्थात काँग्रेसचे जहाज बुडू लागले आहे हे दाखविण्यासाठी हा खटाटोप आहे काय?

बरेच दिवस गाजत होते ते एकदा पार पडले... चंद्रकांतदादा म्हणाले होते दोन्ही काँग्रेसमधील २२ नगरसेवक आमच्याकडे येत आहेत. यापैकी आठ आजी-माजी नगरसेवकांसह एक मोठी फौज भाजपमध्ये दाखल झाली आहे. आता उर्वरित पलटन कधी? असे पत्रकार नेत्यांना विचारतील. या प्रश्‍नावर कॉलर उडवत नेते म्हणतील पुन्हा वाट पाहा... अर्थात घोटाळेबाजांना घेणार नाही, असेही सांगतील. मग घोटाळेबाजांना बोलावतील आणि म्हणतील ‘‘तुझे हे घोटाळे आहेत, फाईल काढू का आमच्याकडे येतोस?’’ अशा गमतीही करतील. यापैकी काहींचा घोटाळ्याशी संबंध नसला तरी काहीजण मात्र काँग्रेसच्या कारकिर्दीत जे घोटाळे चर्चेत आले त्यांच्याशी थेट संबंधित आहेतच. आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे मिरवणाऱ्या भाजपचा हा मुद्दा निकालात निघाला आहे. 

आता मागचेच चेहरे  घ्यायचे म्हटले तर चांगल्या चारित्र्याचे उमेदवार कोठून मिळणार? शेवटी महाआघाडीतही अशा अनेकांची ॲडजेस्टमेंट त्यावेळी जयंत पाटलांनी केली होतीच. अगदी नामचिन गुंडांनाही सामावून घेण्याचं औदार्य दाखवलं होतं. ज्या नगरसेवकांनी प्रवेश केले त्यातील दोन-तीन नावे दिग्गज आहेत. त्यापैकी सुरेश आवटी हे मिरजेतील मोठं प्रस्थ आहे. महाआघाडीवेळी या आवटींनीच काँग्रेसला मोठे खिंडार पाडले आणि पुन्हा त्याच राष्ट्रवादीलाही खिंडार पाडणारे हेच होते. यावेळी आवटींचा रोल बदलला आहे. त्यांनी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या नावाने चांगभलं केलं आहे. अर्थात जिकडे आवटी तिकडे सत्ता असे समीकरण आताही कायम राहते का हे काळच ठरवेल. मिरजकर नगरसेवकांचे सगळे वेगळे आहे. ते सर्वचजण पार्टीपासूनच डिफरन्ट असतात, फक्‍त नावाला लेबल घेतात. ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे साटेलोटे कायम असते. मिरज पॅटर्न हे राजकारणातलं  इथल्या नगरसेवकांनी निर्माण केलेलं पेटंट आहे. त्यामुळे येथे जे होईल ते जगात अशक्‍य आहे. आता माजी महापौर विवेक कांबळे हे आरपीआय या पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक आणि महापौर पण होते. आता ते आरपीआयचे प्रदेश सचिव आहेत म्हणे आणि तरीही ते भाजप चिन्हावर लढणार म्हणतात. अशा अनेक गमती जमती होत राहतील आणि त्याचे समर्थन सारेच करत राहतील.

मूळ मुद्दा असा आहे की, भाजप या सर्वच जुन्या  जाणत्या चेहऱ्यांनाच संधी देणार आहे का?  कारण गेल्या पाच वर्षांच्या काँग्रेसच्या कारभारावर लोक किती समाधानी आहेत ते दिसतेच पण नगरसेवकही समाधानी नाहीत हे प्रत्येक महासभेच्या बातम्यांतून पुढे आले  आहे. पाच वर्षांतील पन्नासभर सभा झाल्या त्यातील एक तरी सभा दंगा, राडा, आरोप-प्रत्यांरोपांशिवाय झाली असे ठामपणे काँग्रेसच्या नेत्यांना सांगता येईल काय?  काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनीच काँग्रेसचे महापालिकेतील कारभारी बदला आणि नव्यांना संधी द्या, अशी मागणी केली होती. आणि भाजप नेमके उलटे काय करतंय हे लोकांना कळेना झालंय.

अर्थात निवडणुकीचे मैदान म्हटले की, नुसते स्वच्छ चेहरे नाही तर विनिंग मेरीटही लागते हे खरे आहे. पण भाजपने दोन वर्षे याची तयारी करायला हवी होती. निवडणुका तोंडावर आल्यावर उमेदवार शोधू लागले तर तयार मालच घ्यावा लागणार आहे. सध्या भाजपची गोची ही आहे की, ते कोरी पाटी असल्याने त्यांना लोक संधी देतील आणि काँग्रेसला सत्ता असण्याचा तोटा सोसावा लागेल असे वाटणे साहजिक आहे पण यासाठी उमेदवारांची उसणवारी ज्या  कारभाऱ्यांना लोक वैतागलेत तेच असतील तर लोकांसमोर प्रश्‍न असा राहणार की, यातील कोणाला निवडायचे? भाजपने लोकांसमोर निवडीचा पर्यायच ठेवलेला नाही.

सांगली-मिरज ही शहरे अन्य विकसित शहरांच्या तुलनेत मागे पडली आहेत. इथले प्रश्‍न मोठे आहेत. १५ वर्षे मंत्री असलेल्यांनीही या शहरासाठी  भरीव असा कोणताही विकास आणलेला नाही. पालिकेचे कारभारी शहराचे लचके तोडत आहेत. हे शहर वेळीच सावरले नाही तर शहराची तरुणाईच संपेल आणि निवृत्तांची शहरे अशी अवस्था होईल. त्यामुळे भाजपला चार आमदार एक खासदार असे भरभरून दिले आहे. जिल्हा परिषदही त्यांच्याकडे आहे. एवढ्यावर कोणताही पक्ष समाधानी होईल. आता महापालिकेचे काय होईल ते लवकरच कळेल पण काहीही करून महापालिका ताब्यात घेण्याची घाई भाजपला महागात पडू शकते. भाजपचा महापालिका ताब्यात घेण्याचा उद्देश सत्तेची हाव किती आणि विकासाची इच्छाशक्‍ती खरीच आहे काय, हे जनता जाणू इच्छीते. त्यामुळे पालिका जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या भाजपच्या पालकमंत्र्यांसह सर्व महंतांनी लोकमताचाही कानोसा घ्यावा.

खाडेंची करामत
काल ज्या नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला, त्याचे श्रेय अर्थातच आमदार सुरेश खाडे यांचे... पण यातील काही जण त्यांच्या पक्षाचे नसले तरी त्यांच्या समवेत अनेकदा असायचे. मुळात मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक आणि खाडे यांचे पक्षाच्या पलीकडचे नाते आहे, हे मिरजकरांना माहीत आहे. यातीलच काहींना त्यांनी पक्षाच्या झेंड्याखाली आणले एवढेच! 

shekhar.vjosh@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT