सांगली : यावर्षी मेअखेरीस पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने नियमाप्रमाणे कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातील बर्गे काढून टाकल्याने सांगली व कुपवाडच्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दोन्ही शहरांच्या नियमित पाणीपुरवठ्यावर १५ ते २५ टक्के पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने आणखी आठ दिवसांची ओढ दिली आहे. त्याआधीच म्हणजे बंधाऱ्याचे बर्गे काढून टाकले आहेत. अचानक पाऊस झाला की बर्गे तसेच राहतात आणि पावसाळाभर ते पाण्यातच राहतात. त्याचा परिणाम पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याच्या निचऱ्यावर होतो. २०१९ आणि २०२२ च्या महापुरामध्ये बर्गे पाण्यातच राहिल्याने जलसंपदा विभागावर आक्षेप घेण्यात आले होते. नियमाप्रमाणे कार्यवाही न केल्याची टीका होत होती. हा अनुभव जमेत घेता यावेळी जलसंपदा विभागाने पावसाळ्याआधीच बर्गे काढले आहेत. त्यात पावसाने काहीसी ओढ दिल्यानंतर सांगलीजवळ कृष्णेची पाणी पातळी चांगलीच खालावली आहे. कार्यकारी अभियंता सुनील पाटील म्हणाले,‘‘सांगली शहराला अधिक पाणीटंचाई जाणवणार नाही, मात्र कुपवाड शहराला सुमारे पंचवीस टक्के इतका कमी पाणीपुरवठा होणार आहे. कारण औद्योगिक विकास महामंडळाकडून कुपवाड परिसराला काही प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. महामंडळाच्या पाणी उपसा विहिरीच्या तीनपैकी दोन स्ट्रेनरची पाणी पातळी खालावली आहे. त्याचा परिणाम महामंडळाच्या योजनेवर पर्यायाने कुपवाड परिसराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.’’
जलसंपदा विभागाने यावर्षी वेळीच बंधाऱ्याचे बर्गे काढले असून, ते योग्यच आहे. त्यामुळे पात्रातील साचलेल्या गाळाचा चांगला निचरा होणार आहे. उपसा विहिरींजवळ निम्न पातळीला पाणी राहू शकेल अशा व्यवस्था करण्याची जबाबदारी पाणी परवाना ज्यांच्या नावे आहे त्यांचीच आहे. कोयना धरणातून तत्काळ पाणी सोडले जाणार नाही कारण जून ते ऑक्टोबर या काळात पाणी सोडण्याची परवानगी सचिव स्तरावरून दिली जाते. निदान पुढील वर्षी तरी अशी वेळ येऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी महापालिकेने घ्यावी.
- विजयकुमार दिवाण,महापूर नियंत्रण कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.