सांगली ः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली. वडील, माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या आकस्मित निधनानंतर वय लहान असल्याच्या कारणाने आणि त्यानंतर कधी बंधूप्रेम; तर कधी पक्षाच्या अडचणीमुळे संग्रामसिंह यांना राज्य पातळीवरील निवडणूक आखाड्यापासून दूर रहावे लागले होते. अखेर त्यांची इच्छापूर्ती झाली आहे. विधानसभेसाठी कसून तयारी केलेल्या संग्रामसिंह यांच्यासाठी पाच जिल्ह्यांचा अवाढव्य मतदारसंघ हे मुख्य आव्हान असेल. भाजप आणि संघाचे नेटवर्क, पश्चिम महाराष्ट्रातील विविध पक्षांतील हितसंबंध आणि प्रामाणिक राजकारणी ही प्रतिमा या जोरावर ते या मतदार संघात आपले नशीब आजमावतील.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रीन पॉवर शुगर या गोपुज (जि. सातारा) येथील साखर कारखान्याचे संस्थापक अशी संग्रामसिंह यांची ओळख आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांना पदवीधरसाठी तयारीला लागा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या काळात कोरोनाचे संकट असतानाच पदवीधरसाठी मोर्चे बांधणी करावी लागली आहे. भाजपने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास किती सार्थ टळतो ते आता दिसेल. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या चारी जिल्ह्यांशी देशमुख यांचा थेट कनेक्ट आहे.
संग्रामसिंह देशमुख यांना राजकीय वारसा आहे, मात्र त्यांना सतत राज्याच्या निवडणूक आखाड्याने चकवा दिला. त्यांचे वडील दिवंगत संपतराव देशमुख हे 1995 च्या युती शासनाच्या काळात आमदार होते. त्यांनी कॉंग्रेसचे बलाढ्य नेते पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर वर्षभरात त्यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत संग्रामसिंह यांना संधी मिळाली असती, मात्र त्यांचे वय लहान होते. चुलतबंधू पृथ्वीराज देशमुख पोटनिवडणुकीत आमदार झाले. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर देशमुख गटाने हाती घड्याळ बांधले. तेथून पृथ्वीराज यांनीच विधानसभा निवडणुका लढल्या. सन 2014 ला देशमुख भाजपमध्ये गेले. पुढच्याच वर्षी संग्रामसिंह यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढली, जिंकली आणि तीन वर्षे ते अध्यक्षही राहिले. जिल्हा बॅंकेत ते सलग पाच वर्षे उपाध्यक्षपदावर आहेत.
पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी संग्रामसिंह यांचे नाव भाजपने जाहीर केले. त्यांनी अर्जही भरला, मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याला भाजपने होकार दिला आणि संग्रामसिंह यांना पुन्हा माघार घ्यावी लागली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तेच झाले. त्यांनी जोरदार तयारी केली होती, मात्र युतीत पलूस-कडेगाव शिवसेनेच्या वाट्याला गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत या आणि लढा, अशी ऑफर दिली होती. भाजपच्या वरिष्ठ केडरमधूनही त्याला संमती होती. त्यांनी त्याला नकार देत भाजपसोबतच राहण्याची ठाम भूमिका घेतली. आता या संधीमुळे त्यांना पक्ष न सोडण्याचे फळ मिळाले, असे म्हणता येईल.
निवडणुकीत आम्ही बाजी मारू
पुणे पदवीधर मतदारसंघातून मला उमेदवारी देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आहे. ही संधी नक्कीच मी यशस्वी करून दाखवेन. भाजपचे नेटवर्क, इथले काम मोठे आहे. त्यामुळे निवडणुकीत आम्ही बाजी मारू. चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश जावडेकर यांच्याप्रमाणे भविष्यात चांगले काम करून लक्षवेधी केलेल्या या मतदारसंघातून मला लढण्याची संधी मिळते आहे, याचा आनंद मोठा आहे.
- संग्रामसिंह देशमुख
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.