तासगाव (जि. सांगली) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजय पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील सावर्डेचे सरपंच प्रदीप माने यांच्यासह तिघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. आज मुंबईत हा प्रवेश झाला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील एक गट बाहेर पडणार अशी चर्चा होती. मात्र कोणत्या पक्षात हा गट जाणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र आज अचानक या गटाने शिवसेनेत प्रवेश केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. तासगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, कवठेएकंदचे माजी पंचायत समिती सदस्य जयंत माळी आणि सावर्डेचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने या तिघांनी मुंबई येथे झालेल्या छोट्या समारंभात शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांना पक्षात घेतले. यावेळी मिलिंद नार्वेकर, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, नितीन बानूगडे पाटील, शिवसेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते, तालुक्यातील शिवसेनेचे नेते अरुण खरमाटे उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश केलेले तिघेही खासदार संजय पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. अविनाश पाटील हे तासगाव पालिकेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष ही होते. तर सावर्डेचे सरपंच प्रदीप माने हे महाराष्ट्र सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारीही आहेत. प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अविनाश पाटील यांनी खासदार पाटील यांच्या तडजोडीच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
निवडणुकीतच प्रवेश
तासगाव तालुक्यात 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या जानेवारी महिन्यात होणार आहेत. यासाठी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असता हे तीन प्रवेश म्हणजे खासदार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी साहेबराव पाटील आणि अरुण खरमाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने खासदारांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.