पश्चिम महाराष्ट्र

भाजपचा "कटोरा' भरणार? 

संतोष सिरसट

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची निवडणूक नुकतीच झाली. पुरेसे संख्याबळ असल्याचा कांगावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या हाती काहीच लागले नाही. जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांनी 2017 व आताच्या निवडणुकीतही भाजपचा केवळ सोईसाठी वापर करून घेतला आहे. दुसऱ्याच्या दुःखात आपले सुख शोधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. चांगली सदस्यसंख्या असूनही भाजपचा कटोरा रिकामाच आहे. असे असले तरी महाविकास आघाडीला सत्ता मिळू न देणे यावरच भाजपने "समाधान' मानले आहे. समित्या निवडीमध्ये तरी भाजपचा "कटोरा' भरणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

अडीच वर्षांपूर्वी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ताब्यात जिल्हा परिषदेची सत्ता जाऊ नये, यासाठी अनेकांनी अट्टहास केला. त्यात ते यशस्वीही झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांना "बळ' मिळाल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे भाकीत वर्तविले गेले होते. त्यादृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयारीही सुरू केली होती. निवडणुकीपूर्वी शेवटच्या एक-दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निवडीमध्ये लक्ष घातल्याची चर्चा राजकीय पटलावर ऐकायला मिळाली. दोन्ही पवारांनी लक्ष घालूनही जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी भाजपच्या मदतीने मिळविण्यात समविचारी आघाडी यशस्वी झाली. माजी आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेने आमदारकीचे तिकीट दिले नाही. तरीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मोहिते-पाटील समर्थक असलेल्या माजी आमदार पाटील यांनी आपलाही स्वार्थ साधत जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोहिते-पाटलांना "बळ' देण्यासाठी मोलाची साथ दिल्याचे स्पष्ट झाले. 

जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांपैकी भाजपचे 14 सदस्य आहेत. 2017 मध्ये केवळ मोहिते-पाटील गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचारींच्या काही नेत्यांनी भाजपच्या सहकार्याने सत्ता हस्तगत केली. त्यावेळीही भाजपच्या हाती काहीच लागले नाही. तीन सदस्य असणाऱ्या स्थानिक आघाड्यांना सभापतिपदाची संधी मिळाली. एक सदस्य असणाऱ्या अपक्षांना उपाध्यक्षपदाची लॉटरी लागली. मात्र, 14 सदस्य असूनही भाजपचा कटोरा रिकामाच राहिला. केवळ राष्ट्रवादीला सत्तेत येऊ द्यायचे नाही यावरच 2017 मध्येही भाजपने समाधान मानले. तीच स्थिती यंदाच्या सभापती निवडीच्यावेळी होणार का? याबाबतही उत्सुकता आहे. अध्यक्षपद माजी आमदार पाटील यांच्या समर्थकाला दिले आहे. उपाध्यक्षपद मंगळवेढ्याच्या दामाजी कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या समाधान आवताडेंच्या समर्थकाला दिले आहे. आता उरलेल्या चार पदांमध्ये कोणाचा नंबर लागणार, याबाबतही कुतूहल आहे. चार पदांपैकी एक समिती मोहोळ, एक समिती पंढरपूर, एक समिती सांगोला तर उर्वरित एक समिती कोणत्या तालुक्‍याला द्यायची, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. उर्वरित एक समिती बार्शी, माळशिरस, अक्कलकोट की दक्षिण सोलापूरला द्यायची, यावर अद्यापही भाजप-समविचारी आघाडीचे एकमत झालेले नाही. 

अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे जरी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले तरी ते आपल्या विचाराचे असल्याचे समाधान मोहिते-पाटील यांना मिळाले आहे. 2017 मध्ये पुरती निराशा हाती लागलेल्या मोहिते-पाटील यांना यंदाच्या निवडणुकीने बळ मिळाले आहे. हे बळ देण्यासाठी भाजपसह आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे यांचेही मोलाचे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नवे अध्यक्ष कांबळे यांचे नेते माजी आमदार पाटील हे जरी मोहिते-पाटलांच्या विचाराचे असले तरी प्रत्यक्षात मोहिते-पाटील यांना अद्यापही काहीच मिळाले नाही. सभापती निवडीत त्यांच्या पदरात काही पडते का? हे पाहणे गरजेचे आहे. 

समित्या निवडीत एकी टिकणार का? 
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्यावेळी भाजप-समविचारी आघाडीने अतिशय शांतपणे सूत्रे हलवीत सत्ता मिळविली आहे. पुढील 10-12 दिवसांमध्ये होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीतही अशीच एकी टिकविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. पराभव झाल्याने खवळून उठलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समित्यांवर आपले वर्चस्व मिळविण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे भाजप-समविचारी आघाडीला सावध राहावे लागणार आहे, हे मात्र नक्की. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT