Amruta Gosavi 
सोलापूर

लेकींच्या हंबरड्याने हळहळली चव्हाणवाडी ! मुली शिकून मोठ्या व्हाव्यात यासाठी परिस्थितीशी झगडणाऱ्या मातेवर काळाचा घाला 

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : नापीक जमिनीसह अनंत अडचणींना तोंड देत पाच मुली व एका मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या माऊलीचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. मुलींनी शिकून खूप मोठे व्हावे, यासाठी परिस्थितीशी कायम झगडणारी आईच आपल्याला सोडून गेल्याने पाच मुलींनी फोडलेला हंबरडा पाहून दगडालाही पाझर फुटावा व त्यानेही अश्रू गाळावेत अशीच काहीशी परिस्थिती महूद (ता. सांगोला) अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. 

सांगोला तालुक्‍यातील महूद अंतर्गत असणाऱ्या चव्हाणवाडी येथे राहणाऱ्या संतोष लक्ष्मण गोसावी यांच्या दुचाकीला परिते (ता. माढा) येथे मंगळवारी (ता. 16) दुपारी अपघात झाला. या अपघातात संतोष यांची पत्नी अमृता गोसावी (वय 42) यांचे निधन झाले. संतोष व अमृता गोसावी यांचा सहा वर्षांचा मुलगा सिद्धार्थ हा आपल्या आत्याकडे शिराळ (ता. माढा) येथे गेला होता. त्याला महूदला परत आणण्याकरिता गोसावी पती-पत्नी आपल्या दुचाकीवर शिराळला गेले होते. त्याला सोबत घेऊन महूदकडे येण्यासाठी काहीच किलोमीटर अंतर ते परिते शिवारात आले होते. तेव्हा मंगळवारी दुपारी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात हे तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी पंढरपूरला आणत असताना अमृता गोसावी यांचा मृत्यू झाला. 

गोसावी कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. केवळ एक एकर जमीन व तीही नापीक. पोटी पाच मुली व एक मुलगा असा परिवार आहे. यातील सुप्रिया बारावीत, वैष्णवी अकरावीत, भक्ती नववीत, समृद्धी पाचवीत तर अंकिता तिसरीत शिक्षण घेत आहे. सिद्धार्थचे वय सहा वर्षे आहे. संतोष गोसावी हे मसाले विक्री, शेळीपालन, कुक्‍कुटपालन आदी व्यवसाय करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. मोठ्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारताना त्यांची होणारी दमछाक पाहून पत्नी अमृताही त्यांना या कामी मोठी मदत करत होती. अमृता गोसावी यांना मुलींनी खूप शिकावे आणि नाव कमवावे असे नेहमी वाटायचे. मुलींच्या शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. शिक्षणाबरोबरच मुलींनी सर्व कलांमध्ये पारंगत असावे असे त्यांना वाटे. त्यामुळे त्यांनी मुलींना तायक्वांदो प्रशिक्षणही सुरू केले होते. त्यासाठी चव्हाणवाडी येथील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजवणे व अत्यल्प मानधनामध्ये आशा स्वयंसेवक म्हणून काम करणे ही कामे त्या करत होत्या. सत्कर्मात जगण्याचे मर्म शोधताना कोरोनाच्या राक्षसी उद्रेकातही रणरागिणी बनून त्यांनी कोरोना सर्वेक्षण, तपासणीत सहकार्य व रुग्णसेवा म्हणून काम केले होते. 

मुलींच्या शिक्षणामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी या माऊलीची अखंड धडपड चालू होती. परिस्थितीमुळे शिक्षणासाठी लागणारा खर्च उचलण्यासाठी त्या अखंड परिश्रम करत होत्या. वस्तीपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व वाड्या-वस्त्या यामधील अनेक दशक किलोमीटरचा प्रवास त्या अनेकवेळा पायी करत. रिकाम्या वेळात शिलाई काम करणे, कुक्‍कुटपालन, शेळीपालन यामध्ये सहकार्य करणे व उरलेल्या वेळात रोजंदारीवर मजूर म्हणून कामाला जाणे अशी कामे करून ही माऊली कुटुंबाला हातभार लावत होती. 

"संघर्षालाही घाम फुटावा, कष्टाचाही श्वास गुदमरावा, अगदी साध्या गरजांना स्वप्न मानून जीवनाचा अर्थ शोधताना जगण्याचाच अंत व्हावा' अगदी अशीच स्थिती अमृता गोसावी यांच्याबाबत घडली आहे. आई म्हणून कर्तव्यात कोणतीही कसर राहू नये या जिद्दीने त्या सतत कार्यमग्न राहात होत्या. 

भल्या सकाळी सर्व कामांचे नियोजन करून व मुलींना घरी ठेवून भावाला आणण्यासाठी गेलेली आई घरी परतलीच नाही, या विचाराने पाचही मुलींच्या जिवाचा थरकाप उडाला. शब्दही गोठले आणि आईची अवस्था पाहून मुलींनी हंबरडा फोडला. मंगळवारी मध्यरात्री उशिरा अमृता गोसावी यांच्या पार्थिवावर थोरली मुलगी सुप्रिया हिने अंत्यसंस्कार केले. या वेळी अपघातात जखमी झालेले वडील व भाऊ मात्र उपस्थित नव्हते. ते सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. संतोष गोसावी यांच्या उपचारावरील खर्च मोठा असल्याने त्यांच्या मित्रमंडळींनी वर्गणी गोळा करून मदत करण्याचा निश्‍चय केला आहे. परिस्थितीलाही आपल्या कष्टाने, संघर्षाने अनुकूल बनवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या अमृता गोसावी मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न डोळ्यात ठेवून अनंतात विलीन झाल्या. 

अमृता गोसावी या आशा स्वयंसेविका म्हणून काम पाहात होत्या. त्यांनी आपल्या परिस्थितीचे, गरिबीचे कधीही भांडवल केले नाही. सदैव हसतमुख असणाऱ्या गोसावी यांचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. कोरोना उद्रेकाच्या काळात त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने एक चांगला स्टाफ गमावला आहे. 
- डॉ. दत्तात्रय साळुंखे, 
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, महूद 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT