सुर्डीकरांनी दिला गरजवंतांना मदतीचा हात
वैराग (जि. सोलापूर), ता. 16 ः गोरगरीब व गरजवंताना धान्य देऊन सुर्डी (ता. बार्शी) येथील कष्टकरी ग्रामस्थांनी सामजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना संचारबंदीत मोलमजुरी करणाऱ्या गरजू व गरीब कुटुंबीयांच्या मदतीसाठी सुर्डीकर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. येथील रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबाकरिता गहू, तांदूळ व ज्वारी असे धान्य गावातील कुटुंबाकडून संकलन करून आज वाटप केले. देशात व राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून शासनाने संचारबंदी व लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवले आहे. ग्रामीण भागातील मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबीयावर त्याचा परिणाम होत आहे. दिवसेंदिवस संचारबंदी अधिक कडक करण्यात येत आहे. ग्रामस्थांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले असून रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासकीय सेवेतून उपलब्ध सोयीसुविधा या मजूर ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी विनायक डोईफोडे, मधुकर डोईफोडे, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था प्रकल्प अधिकारी राहुल पाटील, ग्रामसेवक पांडुरंग कागदे, तलाठी महेश जाधव, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन मजूर ग्रामस्थांना धान्य वाटप केले. सुर्डीकरांच्या सामाजिक उपक्रमाचे अन्य गावांतून कौतुक होत आहे.
बहुरुपी , गोसावी, जडीबुटीवाल्यांना दिला आधार
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) ः कोरोनामुळे लाॕकडाऊन जाहीर झाला आणि अनेक कुंटुंबाची उदरनिर्वाहासाठी ससेहोलपट होत होती. हाताला काम नाही आणि दाम नाही. यामुळे मजूर भटक्या समाजातील कुटुंबांची गैरसोय होऊ नये म्हणून मजूर , बहुरुपी कलाकार जडीबुटीवाले , गोसावी समाजातील लोकांना उपासमार होऊ नये म्हणून वडाळा येथे जि.प. चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या पुढाकारातून किराणा वस्तुंचे व धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. वडाळाकरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. यामुळे अनेक कुटुंबाना आधार मिळाला आहे. तसेच सध्या वडाळ्यात 20 हजार लोकवर्गणी जमा झाली आहे आणखी 30 हजार लोकवर्गणी जमा करणार असून 50 हजार रुपयांचा किराणा वस्तु खरेदी करुन वडाळा परिसरातील गोरगरीब व हातावरील पोट असणाऱ्या मजूरांना लाॕकडाऊन काळात उपासमार होऊ नये यासाठी वाटप करणार आहे आसे काका साठे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले .
रानमसलेत शालेय पोषण आहाराचे वाटप
वडाळा : रानमसले येथील जिल्हा परिषदेतील इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळींचे वाटप करण्यात आहे. यावेळी मुख्याध्यापक परमेश्वर जमादार, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष राजाराम गरड, बालाजी गरड आदी उपस्थित होते. रानमसले येथील ब्रह्मगायत्री विद्यामंदिर येथील प्रशालेतही मुख्याध्यापक एम. एन. गवळी, पोलिस पाटील तानाजी गोरे, शिक्षक विष्णू पाटील यांनी "सोशल डिस्टन्स'चे पालन करत इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहाराचे तांदूळ व डाळींचे वाटप केले.
कुलकर्णी ट्रस्टकडून मदत
बेगमपूर (ता. मोहोळ) : अंकोली (ता. मोहोळ) येथील डॉ. रवींद्र श्रीपाद कुलकर्णी मदतनिधी ट्रस्टच्यावतीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अडीच लाख रकमेच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती विश्वस्त डॉ. सुनील कुलकर्णी यांनी दिली.
येथील माळरानावर ट्रस्टच्या वतीने लोकसेवा रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा उद्घाटन कार्यक्रमही रद्द केला आहे. या लोकसेवा रुग्णालयात पंचकर्म, आयुर्वेद चिकित्सा, नेत्रचिकित्सा आदी सेवा उपलब्ध होणार आहेत. येथे महिन्यातून एकदा वंध्यत्व निवारण शिबिर घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी म्हणून ट्रस्टच्यावतीने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी दीड लाख व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख, असे अडीच लाखांचे धनादेश विश्वस्त डॉ. सुनील कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. यावेळी विश्वस्त नीता कुलकर्णी उपस्थित होत्या.
अखिल भारतीय सेनेतर्फे धान्य वाटप
कुर्डू (ता. माढा) : कोरोनामुळे सध्या युवक वर्गात वाढदिवस साजरा करण्यावर परिणाम झाला असून संस्थेत असणाऱ्या मुला-मुलींसाठी अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी अखिल भारतीय सेना माढा तालुक्याच्या वतीने उमीद या संस्थेला गहू, तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, अखिल भारतीय सेना माढा तालुकाध्यक्ष गणेश नलवडे, ऍड. कल्याण वाळूजकर, दत्ता बागल, अक्षय भराडे, संभाजी चव्हाण, बाजीराव नलवडे, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
विघ्नहर्ताच्या वतीने किराणा साहित्य वाटप
कुर्डू : येथील विघ्नहर्ता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गावातील निराधार 20 कुटुंबांना पाच किलो तांदूळ, एक किलो गोडेतेल, एक किलो साखर, एक किलो शेंगदाणे, चहा पावडर, साबण, कोलगेट आदी किराणा साहित्य मोफत वाटप केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भारत कापरे, उपसरपंच शिवाजी कापरे, नितीन जगताप, गणेश गोंडगिरे, राम भानवसे, तानाजी हांडे, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.
मनस्वीने सीएम फंडसाठी
दिले दोन हजार 995 रुपये
अक्कलकोट : अक्कलकोट येथील मनस्वी मंजुनाथ सक्करगी या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीने स्वतः गोळा केलेले दोन हजार 995 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. मनस्वीने मनाचा मोठेपणा दाखविल्याने तिचे कौतुक होत आहे.
अक्कलकोट शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात राहणारी मनस्वी ही आमदार सचिन कल्याणशेट्टी अध्यक्ष असलेल्या गिरीजामाता प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकते. तिने बचतीचा आवड म्हणून वर्षभर रक्कम गोळा केली आहे. पण आता कोरोना पार्श्वभूमीवर शासनाला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदत व्हावी म्हणून आज तहसीलदार अंजली मरोड यांची भेट घेऊन आपण सीएम फंडास मदत करत असल्याची चिठ्ठी दिली. ही संपूर्ण रक्कम नाणी स्वरूपात आहे. यावेळी श्री. मरोड यांनी तिचे या चांगल्या कामाची शाबासकी देऊन कौतुक केले. कोरोना पार्श्वभूमीवर या शालेय चिमुरडीने घेतलेला निर्णय इतरांना प्रेरणादायी ठरला आहे.
आशामंत'कडून 90 कुटुंबांना मदत
माढा : महाराष्ट्र राज्य महा एनजीओ फेडरेशन व दारफळ (ता. माढा) येथील आशामंत फाउंडेशनने माढ्यातील गरजू लोकांना किराणा मालाचे 90 किटचे वाटप केले. महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र प्रमुख शेखर मुंदडा, विजय वरूडकर, मुकुंद शिंदे यांच्या सहकार्याने दारफळ येथील आशामंत फाउंडेशनचे अध्यक्ष हणमंत बारबोले यांनी मानेगाव, विठ्ठलवाडी, माढा येथील भटक्या समाजातील कुटुंबांची लॉकडाउनमुळे गैरसोय होऊ नये म्हणून किराणा मालाचे किट वाटप केले. यासाठी आशामंत फाउंडेशन सचिव दत्ता थोरात, विजय शिंदे, महादेव कांबळे, शुभम बारबोले, बाबा शेळके, बाबा पारडे, मालोजी देवकुळे, बापूराव शिंदे, रघुनाथ उबाळे यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.