सोलापूर : सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग नसल्याने अनेक विमान कंपन्या सोलापूरला यायला धजावत नाहीत. तसेच अनेक महत्त्वाच्या विमानतळावर स्लॉटही मिळत नाहीत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न सुरू केले असून लवकरच वन विभागाच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना दिली.
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या बोरामणी विमानतळाच्या उभारणीला अखेर राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अपडेट जाणून घेतले आहेत.
सोलापूर विमानतळावरून सध्या गोवा- सोलापूर विमानसेवा सुरू झाली असली तरी येथे नाईटलॅंडिगची सुविधा नाही. सध्याच्या होटगी रोड येथील विमानतळावरील अतिक्रमणे आहेत. याबाबत व इतर काही अडचणीही लवकर दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. होटगी रोड येथील सोलापूर विमानतळाच्या डागडुजीसाठी तब्बल ६५ कोटी रुपये खर्चून सोलापूर-गोवा ही सेवा सुरू केली आहे.
दरम्यान, होटगी रोड येथील विमानतळ परिसरात असलेली अतिक्रमणे तसेच येथे नव्याने भूसंपादन करून विमानतळाचा विस्तार करणे खर्चिक आहे. नाईट लँडिंगसाठी होटगी रस्त्यावरील विमानतळाचा विकास करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेत शासनाने बोरामणी विमानतळाचा विषय पुन्हा पुढे आणला आहे.
‘बोरामणी’ रखडण्याची कारणे....
बोरामणी विमानतळासाठी १२५ कोटी रुपये खर्च करून १४३७ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र, या जमिनीमध्ये असलेल्या वन विभागाच्या ३३ हेक्टर जमिनीची अगोदर भूसंपादन न करता शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. दीड हजार एकर जमिनीच्या संपादनानंतर ३३ हेक्टर जमिनीच्या निर्वनीकरणासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, ही जमीन दुर्मिळ होत जाणाऱ्या माळढोक पक्षासाठी राखीव असल्याने वन विभागाने निर्वनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.
ठळक बाबी...
बोरामणी विमानतळासाठी भूसंपादनावर १२५ कोटी रुपयांचा खर्च
२००९ च्या डीपीआरनुसार या प्रकल्पाची किंमत ६२५ कोटी
१६ वर्षांनंतर या प्रकल्पाची किंमत अनेक पटींनी वाढणार
बोरामणी विमानतळ सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय विमानसेवा शक्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.