सोलापूर : एकेकाळी शंभर टक्के सुती चादर-टॉवेलच्या उत्पादनासाठी देशच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाने "प्युअर कॉटन'ची ओळख स्वतःहून पुसून काढली आहे. याचे कारण म्हणजे वाढते सूत दर आणि त्या तुलनेत पक्क्या मालाला न मिळणारा भाव.
सोलापुरात उत्पादित होणाऱ्या चादर, टॉवेलचे उत्पादन हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. उत्पादनपूर्व व नंतर विविध प्रक्रिया करून उत्पादने तयार केली जातात. शंभर टक्के सुती उत्पादनामुळे एकेकाळी सोलापूरच्या वस्त्रोद्योगाने दर्जाबाबत नावलौकिक निर्माण केला. ही बाब भूषणावह समजली जात होती. पण दहा-बारा वर्षांमध्ये सूत, कलर व केमिकल आदींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे वस्त्रोद्योगामध्ये फिलॅमेंट अर्थात कृत्रिम धाग्याचा वापर सुरू झाला. प्युअर सूत, फिलॅमेंट तसेच पॉलिस्टर कॉटनपासून बनलेल्या सुताचा वापर करून टॉवेलचे उत्पादन घेण्याचे प्रमाण वस्त्रोद्योगात वाढीस लागले आहे. सूत व अन्य कच्च्या मालाच्या दरात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत पक्क्या मालाला भाववाढ मिळत नसल्याने वस्त्रोद्योगाला नाइलाजास्तव फिलॅमेंटचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी 100 टक्के सुती उत्पादनाचे प्रमाण प्रचंड घटले आहे. कॉस्ट परवडत नसल्याने आजतागायत सुमारे चार हजार पारंपरिक यंत्रमाग बंद पडले आहेत. काही कारखानदारांनी कॉस्ट परवडण्यासाठी रॅपिअर लूम आणून आधुनिकतेची कास धरली आहे.
कोरोनाचाही अधिक फटका
गत तीन- चार महिन्यांत सूत दरवाढीमुळे वस्त्रोद्योगासमोर पेच निर्माण झाला. या दरवाढीच्या तुलनेत पक्क्या मालाला भाव वाढून मिळत नसल्याने जिल्हा यंत्रमागधारक संघाने दोन टप्प्यांत प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ केली. कच्च्या मालाची दरवाढ, मूलभूत सुविधांची वानवा, कोरोना आपत्ती आदींमुळे वस्त्रोद्योगाला फटका बसत आहे. नफा घटत चालल्याने हा उद्योग भावी काळात अंडरकॉस्टच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.
ठळक बाबी...
कॉस्ट परवडत नसल्याने शहरातील एकूण 16 हजार पारंपरिक यंत्रमागांची संख्या चार हजारांनी घटली आहे. काही कारखानदारांनी जवळपास 1200 अत्याधुनिक लूम्स आणले तर अन्य कारखानदारांनी या उद्योगातून अंग काढून घेत दुसरा पर्याय निवडला.
- पेंटप्पा गड्डम,
अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.