करमाळा (सोलापूर) : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 3) सायंकाळी फुंदेवाडी (ता. करमाळा) येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण देविदास फुंदे (40) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कल्याण फुंदे यांनी आज दिवसभर जनावरे चारून घरी बांधली व त्यानंतर वीजपुरवठा सुरू झाल्याने ते ज्वारीला पाणी देण्यासाठी शेतात गेले. सायकांळी साडेसहाच्या सुमारास ज्वारीला पाणी देत असताना बिबट्याने कल्याण फुंदे यांच्यावर हल्ला केला. यावेळी ते मोठ्याने ओरडले. कल्याण फुंदे का ओरडत आहेत, म्हणून फुंदेवस्तीवरील लोकांनी जाऊन पाहिले असता त्याठिकाणी कल्याण फुंदे यांच्या चप्पल पडलेल्या व रक्त सांडलेले दिसले. तसेच या ठिकाणी बिबट्याच्या पावलांच्या खुणा दिसल्या. यावरून त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन कल्याण फुंदे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जवळील एका चिंचेच्या झाडाखाली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळला.
बिबट्याचा आठवड्यापासून वावर
करमाळा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी भिलारवाडी येथे वासरावर बिबट्याने हल्ला केला केल्याची घटना घडली आहे. तर मागील आठवड्यात खडकी या ठिकाणीही बिबट्या दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. याशिवाय आज आळजापूर येथील घनशाभ पवार यांच्या वस्तीवर देखील बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
संपादन : वैभव गाढवे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.