उजनीच्या कालव्यांचा व वितरिकांचा वापर सुमारे 40 वर्षांपासून सुरू आहे.
सोलापूर : तब्बल वजा 22 टक्क्यांवर गेलेल्या उजनी धरणाची (Ujani Dam) आता कुठे प्लसमध्ये वाटचाल सुरू झाली आहे. मागील तीन-चार वर्षात उजनी धरण सलग 100 टक्के भरले. त्यामुळे लाभक्षेत्रातील सर्वच घटक समाधानी झाले. शेती उत्पादन विशेषतः ऊस क्षेत्रात भरपूर वाढ होऊन जिल्ह्यातील जवळपास सर्वच साखर कारखाने (Sugar Mills) पूर्ण क्षमतेने गाळप करू शकले. साखर आयुक्तांकडील आकडेवारीनुसार 2018 ते 21 या कालावधीत दोन हजार 510.46 लाख टन उसाचे गाळप होऊन दोन हजार 746.29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उपपदार्थापासूनचे मिळणारे उत्पादन वेगळेच. 117 टीएमसी पाण्यापैकी नैसर्गिक कारणाने होणारी घट वजा केली अन् 50 टक्के शेतीसाठी व 10 टक्के औद्योगिक व नागरी वापरासाठी पाणी वापर होतो असे गृहीत धरले तरी साधारण दरवर्षी विभागास पाण्यापोटी सुमारे 100 ते 125 कोटी महसूल मिळत असावा. (Forty years later, the Ujani dam has been neglected by the government-ssd73)
उजनीच्या कालव्यांचा व वितरिकांचा वापर सुमारे 40 वर्षांपासून सुरू आहे. सततच्या वापराने दोन्ही कालव्यांचे सुरवातीचे अंदाजे 100 किमीमधील भराव, बांधकामे, लोखंडी दारांची काही अंशी नक्कीच झीज झाली आहे. पुढील भागातील कालव्यांची कामे सलगपणे पूर्ण न झाल्याने हे कालवे पाण्याची वाट बघून-बघून विनावापर राहिले. शिवाय नैसर्गिक परिस्थिती व स्थानिक लोकांनी केलेला गैरवापर यामुळे जमीनदोस्तही झाले. मधल्या काळात सिंचन प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याच्या चर्चा असायच्या. त्यामुळे वेगवेगळ्या शासकीय योजनेअंतर्गत कालवा स्वच्छता मोहीम राबविली गेली. परंतु त्यामध्ये अपेक्षित यश किंवा सातत्य नसल्याने परिणामकारकता आली नसावी. जलसंपदा विभागाचे (Department of Water Resources) प्रशासकीय प्रमुख म्हणून या जिल्ह्याला फार मोठी संधी मिळाली. शिरापूर, आष्टी, एकरूख, दहिगाव, बार्शी, सीना-माढा उपसा तर भीमा-सीना जोड कालवा या योजनांसाठी काही अधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे. यासाठी त्या त्या काळात लोकप्रतिनिधींनीसुद्धा सत्तेचा मोह बाजूला ठेवून त्यागी भूमिकेतून सहकार्य केले. मंगळवेढा उपसा सिंचनासाठी न्यायालय, राज्यपाल, एमडब्ल्यूआरआरए (MWRRA) यांच्याकडे सततचा पाठपुरावा झाला. म्हणूनच जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो ही वस्तुस्थिती आहे.
यांत्रिकी संघटनेच्या यंत्रसामुग्रीचा परिणामकारक वापराचे नियोजन, सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी होण्यास कसलीही अडचण नसते, मात्र प्रशासकीय यंत्रणेची सकारात्मकता महत्त्वाची असते. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास, सिंचन योजना, कालवा, स्वच्छता, देखभाल दुरुस्ती किंवा परिचालन असो याची अनेक उदाहरणे आहेत. आर्थिक अधिकार नसलेला उपअभियंता दर्जाचा सर्वात शेवटचा अधिकारी उपलब्ध साधनसामुग्रीचा कौशल्याने वापर करून महिनाभराच्या काळात उजनी प्रकल्पाच्या कालव्याच्या शेवटच्या भागातील चार डिपकट, तीन बोगदे, 60 किमी कालवे व वितरण प्रणालीची किती चांगल्याप्रकारे देखभाल व दुरुस्तीची अल्पखर्चात करू शकतो हे 2018चे उदाहरण या जिल्ह्यातच आहे. मनापासून प्रकल्पाप्रती असणाऱ्या आपलेपणाच्या भावनेतूनच हे शक्य होते.
उजनीचा डावा कालवा सुमारे 130 किमी, जवळपास तेवढ्याच लांबीचा उजवा कालवा, 160 किमी लांबीची शाखा कालवे आणि दोन्ही कालव्याची मिळून सुमारे प्रत्येकी 50 वितरिका सरासरी पाच किमी लांबी असा एकूण 940 किमीची एकाचवेळी देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य आहे. यातून पाणी वापरात होणारी बचत, कालवा वहनात कमी होणारा कालावधी, मनुष्यबळावरील कामाचा कमी करता येणारा ताण, प्रवास भत्ता खर्चात होणारी बचत, इंधनावरील वापरातही होणारी बचत याबाबीही महत्त्वाच्या ठरतील. तसेच कालव्याची झीज कमी होऊ शकेल. याशिवाय बचतीच्या पाण्यातून जादा पाणीपाळी देणेसुद्धा शक्य होईल. आज आपण दरवर्षी वजा 30 टक्क्यांपर्यंतचे पाणी वापरतो. त्याऐवजी वजा 15 ते 20 टक्क्यांमधेच भागू शकते. परिणामी पुढीलवर्षी धरण लवकरच भरण्यास मदत होईल. वितरण प्रणाली सुस्थितीत राहिल्याने पूर्ण क्षमतेने कालवे चालून शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती वाटेल. खऱ्या अर्थाने परिणामकारक वापराने सामन्यायी वापराचे धोरण मूर्त स्वरूप येईल. नव्याने पाणीसाठा निर्माण करण्यातील मर्यादा पाहता उपलब्ध साठ्याचा परिणामकारक वापर करून अधिक क्षेत्र ओलिताखाली आणणे किंवा संकल्पित क्षेत्रातील प्रति हेक्टरी उत्पादन वाढीसाठी सुरळीत गरजेप्रमाणे पाणीपुरवठा करणे हे सुद्धा नवीन साठा वाढविण्याइतकेच महत्त्वाचे ठरेल.
नियोजन कसे करता येईल?
पावसाळ्यात काम नसलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून कालव्यांची स्वच्छता करता येईल
विविध शासकीय विभागाची सेवा उपयोगात आणून सर्व कालवे सुस्थितीत करता येतील
निवृत्त झालेल्यांचा स्वेच्छेने सहभाग नोंदवल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल
कालव्याचा भराव झाडेझुडपे व गाळ काढण्यासाठी उपयुक्त अशा कोकणातील मशिनरीचा उपयोग होईल
लाभक्षेत्रातील साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, सीएसआर, लोकसहभागातून काम करता येईल
सामाजिक बांधिलकीतून कार्य
पाणीसाठा वाढावा व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट व्हावेत या उद्देशाने दैनिक सकाळ सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी पाझर तलावातील गाळ काढते. नदी प्रदूषणाबाबत जनजागृतीवर भर असतो. निसर्ग व पर्यावरणासोबतच पर्यटन आणि विकासात्मक विचार मांडले जातात. उजनी प्रकल्प या जिल्ह्याचे वैभव आहे. श्री विठ्ठलाची चंद्रभागा अशी सोलापूरची पवित्र ओळख. उजनी प्रकल्पामुळे झालेली हरितक्रांती, धवलक्रांती, प्रमुख साखर उत्पादक जिल्हा म्हणून आता नवीन ओळख मिळाली. या प्रकल्पाविषयी प्रत्येक पिढीत व जिल्हावासियांच्या मनामध्ये कायम आपलेपणा, ममत्वाची भावना रुजली जावी म्हणून 2018 मध्ये "सकाळ'ने "माझी उजनी' हे अभियान राबविले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.