तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूरच्या रंगभवन चौकातून सात रस्त्याकडे ७१ वर्षीय आजीबाई रिक्षातून प्रवास करीत होत्या. त्यावेळी चार अनोळखी महिला देखील प्रवासाच्या निमित्ताने रिक्षात बसल्या होत्या. त्या चौघींनी आजीबाईंना दाटी करून त्यांच्याकडील एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यातील तीन महिलांना सदर बझार पोलिसांनी अटक केली असून चौथीचाही शोध लागला आहे.
बाळे येथील कमलेश नगरातील शोभा जयकुमार जबडे (वय ७१) या २० ऑक्टोबरला रिक्षात बसल्या होत्या. रंगभवन चौकातून त्या सात रस्त्याकडे येत होत्या. त्या रिक्षात प्रवासी म्हणून चार अनोळखी महिलाही बसलेल्या होत्या. आजीबाईंच्या बाजूला असलेल्या दोन्हीकडील महिलांनी हालचाल सुरू केली. रिक्षातील गर्दीमुळे आजीबाईचे लक्ष व्यवस्थित बसण्याकडेच अधिक होते. आजीबाईंचे लक्ष स्वत:कडील हॅण्डबॅगकडे नव्हते. ही संधी साधून चारपैकी एका महिलेने संगनमताने आजीबाईच्या हॅण्डबॅगेत हात घातला.
त्यातील छोटी कापडी पिशवी काढून घेतली. त्या पिशवीत रोकड, १० ग्रॅमचे मनोरमा बॅंकेचे चांदीचे नाणे व समर्थ बॅंकेच्या लॉकरची चावी व कपाटाची चावी होती. त्या महिलांनी आजीबाईंकडील ऐवज लंपास केला. रिक्षातून खाली उतरल्यावर त्यांनी पिशवीत पाहिले तर रोकड, दागिने असलेली छोटी पिशवी नव्हती. त्यानंतर त्यांनी सदर बझार पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी खबऱ्यांना अलर्ट केले, सीसीटीव्ही फुटेज पडताळले आणि संशयित महिलांना जेरबंद केले. चौघीही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध पूर्वीचे पाच-सहा गुन्हे असल्याची बाब तपासात समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष पापडे यांनी केला.
समर्थ बॅंकेच्या लॉकरमधील रक्कम दुसरीकडे ठेवायला जाताना चोरी
फिर्यादी शोभा जबडे यांचे समर्थ बॅंकेतील लॉकरमध्ये एक लाखापेक्षा जास्त रुपये होते. २० ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवसही होता. समर्थ बॅंक सध्या अडचणीत आल्याने लॉकरमधील रक्कम काढून दुसरीकडे ठेवण्यासाठी शोभा जबडे या सोलापुरात आल्या होत्या. पण, वाटेतच त्यांची रोकड लंपास झाली. पोलिसांनी मेहनत घेऊन आजीबाईंचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.