माचणूर येथे श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर राम, लक्ष्मण व हनुमानाचे शिल्प कोरलेले आहेत. मंदिराच्या प्रांगणात मल्लिकार्जुन मंदिर व जटाशंकर मंदिर आहे. ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक दर्शनाच्या निमित्ताने येतात. याशिवाय मंदिरास असलेली बुरूजयुक्त भव्य तटबंदी, काही शिल्पावशेष, भीमा नदीस असलेला विस्तीर्ण घाट विशेष लक्षवेधी आहे.
माचणूर गावाच्या मध्यवर्ती भागात श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी टोलेजंग महाद्वार दृष्टिपथास पडते. त्यामुळे मंदिराबद्दलची उत्सुकता वाढत जाते. श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी महाद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना आहे.
प्रवेशद्वाराच्या कमानीवर श्री राम, लक्ष्मण, हनुमान या देवदेवतांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या शिल्पांवर मराठा काळातील शिल्पशैलीचा प्रभाव दिसून येतो. प्रवेशद्वाराच्या वरील दोन्ही बाजूस मोठ्या आकाराचे व्यालशिल्प आहेत. आतील दोन्ही बाजूला पहारेकरांच्या खोल्या आहेत.
जवळच ओवऱ्यांची लांबलचक रांग दिसून येते. भक्तांच्या निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने ओवऱ्यांचा वापर करण्यात येतो. पुढे गेल्यानंतर मंदिराचे भव्य प्रांगण लागते. प्रांगणात असलेली दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते. तिच्या शेजारी श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिर वैशिष्ट्यपूर्ण व रेखीव आहे.
तेथून काही अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिर अनेक स्तंभांनी सुरक्षित केलेले आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात चारही बाजूस बसण्यासाठी कक्षासने आहेत. समोरील बाजूस सुमारे चार फूट उंचीचा रेखीव गणपती आहे. अंतराळ मात्र लहान आहे.
तेथून पुढे गेल्यानंतर गर्भगृह लागते. गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतात. मंदिराच्या समोर नंदी आहे. नंदीच्या मागे तुळशी वृंदावन आहे.
समोरील बाजूस अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज या मंदिरात वास्तव्यास असताना त्यांनी श्री दत्तात्रेयांच्या पादुका या ठिकाणी स्थापन केलेले आहे. मंदिराचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून, शिखरावर देवदेवतांचे आध्यात्मिक प्रसंग शिल्पांतून साकारण्यात आले आहेत. शिल्पांवर पेशवेकालीन शैलीचा प्रभाव आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा महाशिवरात्री दिवशी भरते. रात्रीच्या वेळी देवाची पालखी निघते. ग्रामस्थांच्या वतीने सुमारे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराच्या समोरील बाजूस भीमा नदीच्या किनाऱ्यावर भव्य विस्तीर्ण घाट आहे.
घाटाच्या अनेक पायऱ्या उतरून गेल्यानंतर जटाशंकर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर नदीच्या पात्रात असल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच मंदिरामध्ये प्रवेश करणे शक्य होते. जटाशंकर महादेव मंदिराच्या खालील बाजूस ओवऱ्या आहेत. त्यात हनुमानाची रेखीव मूर्ती आहे.
हे संपूर्ण मंदिर समूह निसर्गसौंदर्याने बहरलेले आहे. याच मंदिराच्या बाहेरील बाजूस श्री संत बाबा महाराज आर्वीकर यांचे समाधी स्थान आहे. अशा प्रकारे नदी किनाऱ्यावरील मंदिर समूह तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे, विस्तीर्ण घाट भाविकांचे लक्ष वेधून घेतात.
सिद्धेश्वर मंदिरामुळे माचणूर परिसरास आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. महाशिवरात्र तसेच श्रावण महिन्यात भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे दर्शनाच्या निमित्ताने येतात.
आमच्या गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान आहे. उचेठाण येथील डोंगरातून मंदिरातील देवाच्या पूजेसाठी भस्म आणला जातो. याच मंदिरात श्री स्वामी समर्थ व शंकर महाराज यांनी काही काळ वास्तव्य केले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी गावची यात्रा भरते. तेथून पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी तसेच पाण्यातील जटाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक दररोज येतात. त्यामुळे गावातील धार्मिक पर्यटनास चालना मिळाली आहे.
- मनोज पुजारी, माजी सरपंच, माचणूर
-नितीन अणवेकर
इतिहास अभ्यासक, सोलापूर
मो. ९४२३३२६५३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.