सोलापूर : जिल्हा बॅंकेच्या ३० हजार ५८७ नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकारकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण, साडेतीन वर्षांपासून प्रोत्साहनपर अनुदानाची शेतकऱ्यांनी वाट पाहिली. तरीदेखील जिल्हा बॅंकेच्या पाच हजार ४६१ शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालाच नाही. दुसरीकडे, अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या भरपाईचे १७३ कोटी रुपये शासनाकडून मिळालेले नाहीत.
राज्यातील नियमित शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्यानुसार सुमारे १४ लाख ५७ हजार शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. त्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी संबंधितांनी आधार अपडेशन (बॅंक खात्याला आधार जोडणी) करणे बंधनकारक केले. त्यानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आधार अपडेशन करून २४ हजार ४६६ शेतकऱ्यांची यादी सरकारला पाठविली. पण, त्यापैकी दोन हजार ९९ शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. दुसरीकडे, आधार अपडेशन प्रक्रिया बंद असल्याने तीन हजार ३६२ शेतकऱ्यांचा लाभ थांबला आहे. आतापर्यंत जिल्हा बॅंकेच्या २१ हजार १०४ नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ९७ कोटी ७२ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
चौघांचे १.८६ लाख रुपये परत गेले
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला २१ हजार १०८ नियमित कर्जदारांसाठी ९१ कोटी ७३ लाख ९० हजार ३२५ रुपयांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले होते. त्यातील चार पात्र कर्जदारांची बॅंक खाती सद्य:स्थितीत बंद होती. त्यांचे एक लाख ८६ हजार रुपये शासनाने पुन्हा परत घेतले आहेत.
अतिवृष्टीचे १७३ कोटीही मिळाले नाहीत
सप्टेंबरमधील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला ३६ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहेत. तसेच ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांचे जवळपास १३७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमधील भरपाईपोटी जिल्ह्याला अजून १७३ कोटी रुपये मिळावेत, असा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीपोटी दक्षिण सोलापूर ९.०७ कोटी, माढा ५५.२९ कोटी, करमाळा ३४.०६ कोटी, मंगळवेढ्यासाठी १.९१ कोटी व सांगोल्यासाठी १० कोटी २२ लाख रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.