Mulegaon
Mulegaon 
सोलापूर

लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले "स्मार्ट ग्राम'! 75 वर्षे ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुका 

सुदर्शन सुतार

सोलापूर : सोलापूरपासून दहा किलोमीटरवर दक्षिण सोलापुरातील मुळेगाव हे 3800 लोकसंख्येचं गाव. सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर गाव असल्याने गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा, गावकऱ्यांचा संपर्क शहराशी अधिक आहे. असे असले, तरी शेती ही गावाची प्रमुख ओळख आहे. गावाचे शिवार 700 हेक्‍टरपर्यंत आहे. त्यापैकी बहुतांश जिरायत आहे. पण बागायत क्षेत्र कमी असले, तरी सोलापूरची बाजारपेठ जवळ असल्याने भाजीपाला, कांदा यांसारखी पिके घेण्यात गावाची आघाडी आहे.

विशेषतः भाजीपाला सर्वाधिक होतो. मूळ गाव छोटं असलं, तरी परिसरात गावच्या अखत्यारित 52 छोट्या-मोठ्या वस्त्या, नगरे आहेत. त्यामुळे विकासकामांचा असा विस्तृत आराखडा गावाला आखावा लागतो आहे. पण त्यातूनही सरपंच ब्रह्मनाथ पाटील, उपसरपंच राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत सदस्य अशोक काकडे, मल्लप्पा म्हेत्रे, माणिक चव्हाण, संगीता नागटिळक, सविता भोसले, कांताबाई बंडगर, मंगल खरात, माधुरी बनसोडे, जुलैखा शेख यांच्यासह ग्रामविकास अधिकारी नागसेन कांबळे यांनी आखीव-रेखीव काम उभारले आहे. 

पाणी शुद्धीकरण प्रकल्प 
गावच्या पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना आहे. शिवाय नव्याने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनाही सुरू होत आहे. तीन वर्षांपूर्वी गावात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प (आरओ) सुरू करण्यात आला आहे. 2000 लिटर क्षमतेच्या या प्रकल्पातून एटीएम पद्धतीने पाच रुपयाला घागरभर पाणी ग्रामस्थांना दिले जाते. याशिवाय पाण्याच्या दोन टाक्‍या आहेत. गावात सात ठिकाणी सार्वजनिक विहिरी आहेत. तसेच 40 हातपंप आहेत. त्याद्वारेही वापरण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो आहे. 

सिमेंट रस्ते, घंटागाडी, भूमिगत गटार 
गावातील प्रमुख सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटने तयार केले आहेत. तसेच गावातील कुठेही गटार उघडी ठेवण्यात आलेली नाही. संपूर्ण गावातून भूमिगत गटार तयार केली आहे. तसेच या गटारातील पाणी गावाच्या ओढ्याला सोडण्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छ आणि चांगल्या रस्त्यासह अस्वच्छता कमी आहे. त्याशिवाय गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. त्यावर एक स्पीकरही बसवला आहे. त्यातून विविध संदेश, दवंडीही लोकांना देण्यात येते. 

हायमास्टसह सौर पथदिवेही 
गावातील प्रमुख दोन चौकांत हायमास्ट बसवण्यात आले आहेत. तसेच गावातील काही चौकांत आणि वाड्या- वस्त्यांवर सौर पथदिवेही आवर्जून लावण्यात आले आहेत. जवळपास 96 सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे वीजबचतीसह कायमस्वरूपी वीजपुरवठा या भागाला होतो आहे. 

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत; 75 वर्षे बिनविरोध निवडणुका 
मुळेगावची ग्रामपंचायत ब्रिटिशकाळात 1920 मध्ये स्थापली गेली आहे. त्याकाळात ज्वारीची बाजारपेठही इथे होती. 1934-35 मध्ये त्या काळात मुंबई इलाख्यामध्ये ब्रिटिशांनी ग्रामसुधारणा चळवळ सुरू केली होती. त्यावेळी मुळेगावने पहिला क्रमांक मिळवला होता. गावकऱ्यांची ही चिकाटी पाहून गावात ब्रिटिशांनी शेती अवजारे बॅंकही स्थापली होती. तसेच नालाबांध, कंपार्टमेंट बंडिंग अशी विविध कामे त्या काळात करण्यात आली. गावकऱ्यांच्या या सहभागामुळेच 1933 मध्ये कोरडवाहू कृषी संशोधन केंद्रही इथे स्थापले गेले. पहिल्यापासूनच गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग हे गावाचे वैशिष्ट्य राहिले आहे. तेव्हापासून आतापर्यंत काही किरकोळ अपवाद वगळता गावची ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडते आहे. 

संगणकीकृत कामकाज 
ग्रामपंचायतीची स्वतःची सुसज्ज अशी इमारत असून, याच ठिकाणी तलाठी, कृषी कार्यालयाचे कामकाज चालते. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड आहे. तसेच कार्यालयाचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे. गावकऱ्यांना रहिवासी, उत्पन्न वा अन्य प्रकारचे सर्व दाखले संगणकीकृत मिळतात. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायतीचे सात कर्मचारी इथले कामकाज पाहतात. 

ओढ्याचे खोलीकरण, वृक्षलागवडीची चळवळ 
गावाने दोन वर्षांपूर्वी गावच्या बाजूने वाहणाऱ्या कुंभारी ते मुळेगाव या दोन किलोमीटरच्या ओढ्याचे खोलीकरण, सरळीकरण केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींसह गावातील विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे ओढा दुथडी भरून वाहतो आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पाणी पातळी वाढण्यासह टिकून राहणार आहे. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील रस्ते, स्माशनभूमी आणि मोकळ्या जागांवर एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. केवळ लागवडच नव्हे, तर त्याची जोपासनाही केली आहे. 

लॉकडाउनमधला अनोखा उपक्रम 
कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर झाला. या काळात केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानावर लोकांना तांदळाचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. पण गावातील चांगली परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांनी हा तांदूळ गरजूंना देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. त्यानुसार ग्रामपंचायतीने या लोकांकडून असा सुमारे 80 पोती तांदूळ गोळा केला आणि तोच गावातील गरीब, गरजूंना वाटप केला. त्यात आणखी गहू आणि भाजीपालाही जमवत जवळपास 300 कुटुंबांना हे साहित्य वाटप केले. 

विविध पुरस्कारांवर मोहोर 
ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात लोकांचा सक्रिय सहभाग हे वैशिष्ट्य राहिले आहे. एकीचे बळ कायमच गावाला पुढे नेण्यात अग्रेसर ठरले आहे. त्यामुळेच गावाने आतापर्यंत 2010 मध्ये तंटामुक्त गाव स्पर्धेत पहिला क्रमांक, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात 2012 मध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक, स्वच्छ भारत मिशनमध्ये 2013 मध्ये पहिला क्रमांक आणि 2017-18 मध्ये स्मार्टग्राम म्हणूनही बहुमान मिळवला आहे. 

गावावर सीसीटिव्हीची नजर 
गावातील प्रमुख चौकांसह परिसरातील वस्त्यांवर ग्रामपंचातीने सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचे संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून होते. आतापर्यंत 8 ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. आणखीन तेवढेच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे गावाच्या सुरक्षिततेलाही ग्रामपंचायतीने प्राधान्य दिल्याचं दिसतं. 

आयएसओ मानांकन 
ग्रामविकासाच्या कामाबरोबरच ग्रामपंचायतीने पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सोईसुविधांवर लक्ष केंद्रित करत कामे केलीच; पण आरोग्यसेवा, शुद्ध पाणीपुरवठा, संगणकीकृत कामकाज, जलयुक्त शिवार, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवण्यासह स्मार्टकामे केली आहेत. या सर्व कामांची दखल म्हणून ग्रामपंचायतीच्या ग्रामविकासाच्या या मॉडेलला आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

"ऍग्रोवन'च्या सरंपच परिषदेतून मिळाली शिदोरी 
"सकाळ- ऍग्रोवन'च्या वतीने राज्यातील सरपंचांसाठी दरवर्षी दोनदिवसीय खास सरपंच परिषद भरवली जाते. ग्रामविकासाच्या कामाविषयी मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञ, मान्यवरांशी चर्चेची ही परिषद सरपंचांसाठी माहितीपूर्ण आणि ज्ञानाची शिदोरी देणारी असते. मुळेगावचे सरपंच ब्रह्मनाथ पाटील हेही त्यात सहभागी झाले होते. त्यांनी सरपंच परिषदेतून मला बरीच माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याचा उल्लेख आवर्जून केला. 

सक्रिय लोकसहभाग हेच आमच्या गावचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच शासनाच्या प्रत्येक स्पर्धेत आम्ही सहभाग घेऊ शकतो. त्यांच्याच सहकार्यावर गावची विकासकामेही झाली, तसेच विविध बक्षिसेही मिळवली. गावातील काम कोणा एकट्याचं नाही; गावाचं, गावातील प्रत्येकाचं आहे. 
- ब्रह्मनाथ पाटील, 
सरपंच, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर 

लोकांच्या गरजा ओळखून काम केलं. सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. अगदी रस्ते, वीज, पाणीपुरवठ्यासह मूलभूत सुविधांवर अधिक भर दिला. 
- राहुल बनसोडे, 
उपसरपंच, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर 

शासनाच्या सर्वच स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेतला आणि त्यात यशस्वीही झालो. लोकसहभागाचं उत्तम उदाहरण गावाने घालून दिले आहे, याचं श्रेय लोकांनाच आहे. 
- नागसेन कांबळे, 
ग्रामविकास अधिकारी, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT