केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तालुक्यात आतापर्यंत तीन बळी गेले आहेत. मात्र बिबट्याची संख्या किती? हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. 3 व 5 व 7 डिसेबर असे तीन दिवसांत तिघांचा जीव गेल्याने करमाळा तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे. तर कोरोनाच्या सावटाखाली काही प्रमाणात सुरू झालेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी वर्गावर याचा परिणाम झाला असून, वरचेवर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली दिसून येत आहे.
3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी येथील युवा शेतकरी कल्याण फुंदे (वय 40) आपल्या शेतात पाणी सोडण्यासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास गेले असता बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले. दोनच दिवसांनी अंजनडोह येथील जयश्री शिंदे या आपल्या शेतात गावडे वस्तीवर लिंबे तोडण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या दोघांचेही शीर बिबट्याने धडावेगळे केले होते. या दोन घटनेपाठोपाठ चिखलठाण येथील केडगाव-शेटफळ या गावाच्या सीमेवर राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात ऊसतोड मजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी फुलाबाई हरिश्चंद्र कोठले (वय 8) हिला बिबट्याने फरफटत नेले. वेळीच ऊसतोड मजुरांनी आरडाओरड करून बिबट्याला विरोध केल्याने मुलीला तिथेच टाकून बिबट्या पळून गेला. पण अत्यवस्थ अवस्थेत मुलीला करमाळा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अमोल डुकरे यांनी तिला मृत घोषित केले.
एक दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांत प्रचंड भीती पसरली असून, करमाळा तालुक्यातील अनेक गावांत कोरोनापेक्षा बिबट्याची भीती पसरली आहे. विशेषत: वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून नित्याची कामे करणे भाग पडत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी व ठार करण्यासाठी वनविभाग व पोलिस प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करीत असतानाही बिबट्या मात्र या सर्वांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी होत आहे.
केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालयात पारेवाडी, वाशिंबे, राजुरी, दिवेगव्हाण, पोमलवाडी, गुलमोहोरवाडी, केत्तूर-1, भगतवाडी, गोयेगाव, कुंभारगाव या परिसरातील विद्यार्थी व नागरिक ये-जा करतात. या सर्वांवर बिबट्याची भीती व दहशत बसली आहे.
आम्ही दोन दिवसांपासून कोरोनामुळे नव्हे तर बिबट्याच्या भीतीने मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे केत्तूर-1 येथील पालक सदाशिव राऊत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. यांच्यासारखेच अनेक पालकांनी आपले मत व्यक्त केले.
परिसरात भिलारवाडी येथे सुरवातीला बिबट्यासदृश प्राण्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले होते तर गाईला जखमी केले होते. त्यानंतर रोजच आज येथे तर उद्या तिथे बिबट्या दिसला, अशा बातम्या येत असल्याने पालकवर्गही चिंतेत सापडला आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे धाडस करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटली आहे.
- सुभाष सामंत, शिक्षक
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.