सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर आता त्यांच्या कुटुंबात अंतर्गत कलह वाढला आहे. सून डॉ. शोनाली या वळसंगकर हॉस्पिटलमधील घरी राहायला गेल्या आहेत. तर त्याला डॉ. वळसंगकर यांचे जावई सुजय फडके विरोध करीत आहेत. यावरून दोघांनीही एकमेकांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात अर्ज दिले आहेत. फडके यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत डॉ. शोनाली बुधवारी (ता. २४) सदर बझार पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. तर डॉ. अश्विन व डॉ. उमा वळसंगकर यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. शोनाली या, ‘सून म्हणून माझा या घरात राहण्याचा हक्क आहे,’ असे सांगून तेथे राहायला गेल्या. गुरुवारी (ता. १८) डॉ. शोनाली यांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना वळसंगकरांचे जावई सुजय फडके व सून डॉ. शोनाली यांच्यात झटापट झाली. यात माझ्या हाताला जखम झाली असून फडके यांनी विनयभंग केल्याचे डॉ. शोनाली यांचे म्हणणे आहे. तर डॉ. शोनाली यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फडके यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्यातील मूळ वाद ‘दिवाणी’ प्रकारचा असल्याने पोलिसांनी त्यांना एकत्र बोलावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते.
त्यानुसार आज (मंगळवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डॉ. शोनाली यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण, फडके आले नसल्याने डॉ. शोनाली यांना परत जावे लागले. फडके यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासंदर्भात डॉ. शोनाली यांनी १५ पानांचा तक्रार अर्जदेखील पोलिसांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांनाही ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. आता पोलिस काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचा विषय मागे
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. काही महिन्यांनी डॉ. शोनाली यांना घरातून बाहेर हाकलण्यात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत आपले म्हणणे मांडले. मात्र, कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयातील घरी राहायला येऊ दिले नव्हते. त्यावेळीदेखील हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला होता. तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वांना समजावले होते. आता काही दिवसांपूर्वी डॉ. शोनाली रुग्णालयातील घरात राहायला गेल्या आणि त्यांच्या कुटुंबातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. मृत वळसंगकरांची सून, मुलगा, पत्नी व जावई यांच्या कौटुंबिक वादात डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचा विषयच मागे पडल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.