सोलापूर : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या निवासस्थानातील चंदनाची तीन झाडे तोडून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांची दुचाकी फौजदार चावडी पोलिसांनी पकडली. जवळपास दहा हजारांचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. पण, सराईत चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली असून बंगल्याच्या कंपाउंडवरील झाडाच्या फांद्यावरून चोरटे आत शिरल्याचा संशय पोलिसांना आहे.
होटगी रोडवरील विकास नगर परिसरात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा निलगिरी बंगला (निवासस्थान) आहे. त्यालगत शहर पोलिस उपायुक्तांचे बंगले आहेत. चंदनचोरांनी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यातील चंदनाच्या झाडांवर पाळत ठेवून बंगल्यातील तीन झाडे तोडून चोरीचा प्रयत्न केला. शनिवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यामागील दाट झाडीचा फायदा घेऊन आत प्रवेश केला. करवतीने चंदनाची झाडे तोडली आणि मुद्देमाल घेऊन जाताना पहाटेच्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फौजदार चावडी पोलिसांनी त्या दुचाकीला अडवले.
त्यावेळी दुचाकी व मुद्देमाल तेथेच टाकून दोन तरुण चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या तावडीतून निसटले. त्यानंतर बस स्टॅण्ड व रेल्वे स्थानक आणि महामार्गावरून ते जातील म्हणून पोलिसांनी त्याठिकाणी पाहणी केली. मात्र, चोरटे मिळून आले नाहीत. आता चोरट्यांकडील दुचाकीवरून पोलिसांनी मूळ मालकाचा शोध सुरु केला असून त्यासंदर्भात आरटीओकडून माहिती घेतली आहे. दरम्यान, एसपींच्या बंगल्यामागे मोकळी जागा मोठी असून त्याठिकाणी झाडे खूप आहेत. चंदन चोरीनंतर आता त्याठिकाणी साफसफाई केली जात आहे.
दुचाकीचा नंबर श्रीगोंद्याचा...
पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यातील चंदनाची चोरी करणाऱ्या चोरट्यांकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही दुचाकी चोरीची असल्याचा पोलिसांना संशय आहे. पण, दुचाकीचा नंबर श्रीगोंद्याचा निघाला आहे. आता सदर बझार पोलिसांनी दुचाकीच्या इंजिन क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध सुरु केला आहे.
रेस्ट हाऊसमधील चोरी गुलदस्त्यातच
सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहातील चंदनाची चोरी काही महिन्यांपूर्वी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तथा महापालिकेची कोणतीही परवानगी नसतानाही चंदनाची झाडे तोडली गेली. त्यानंतर ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांनी महापालिका व सदर बझार पोलिसांना त्यासंदर्भात कळविले होते. पण, झाडे तोडली कोणी, याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.