सांगोला (सोलापूर) : राज्यात रक्तदानाच्या बाबतीत सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून येत आहे. शासन तसेच रक्तपेढ्यांनी आवाहन केल्यानंतर काही युवकांनी स्वयंस्फूर्तपणे ब्लड बॅंकेत जाऊन रक्तदान करण्याची मोहीम चालवली आहे.
आजघडीला जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये तुरळक प्रमाणात रक्तसाठा असल्याने रक्तदात्यांनी आणि आयोजकांनी रक्तदान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सोलापूर जिल्हा ब्लड बॅंक असोसिएशनचे अध्यक्ष व रेवनील ब्लड बॅंकेचे अध्यक्ष, नगरसेवक सोमेश यावलकर यांनी केले आहे.
कोव्हिड लसीकरण मोहिमेंतर्गत 45 वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करण्यास सुरवात झाली आहे. ज्यांनी लस घेतली अशांना एक महिन्यापर्यंत रक्तदान करता येत नसल्याने त्याचाही परिणाम रक्त संकलनावर होऊ लागला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा जिल्ह्यातील प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध आहे.
मार्च महिन्यामध्ये जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते स्वत:हून रक्तदान करण्यास टाळत असल्याचे दिसत आहेत. शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेण्यात येत असल्याने काही प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा जास्त दिवस पुरणार नाही. त्यामुळे अधिकाधिक शिबिरे घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांतही रक्ताचा तुटवडा आहे. दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत असून, रक्तसाठा मात्र मर्यादित आहे.
पुढील चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या रक्तपेढ्यांमध्ये आहे. कोरोनाची दुसरी लाट, उन्हाळा, शाळा व महाविद्यालये बंद असणे, कार्यालयात मर्यादित उपस्थिती याचा थेट परिणाम रक्तदानावर होत असून, यामुळे रक्ताचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीत रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प आहे. महाविद्यालये बंद असल्याने शिबिरे खूप कमी प्रमाणात आयोजित होत आहेत. सुरवातीला कोरोना त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला लसीकरणानंतर एक महिना रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यानंतरच लस घ्यावी, असे आवाहन श्री. यावलकर यांनी केले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्या रक्तसाठा कमी पडू लागला आहे. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी तालुक्यातील रक्तदात्यांनी आणि रक्तदान शिबिर आयोजकांनी पुढाकार घेऊन रक्तसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत
- शहाजी पाटील,
आमदार, सांगोला
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.