सोलापूर : आई- वडील शेतमंजुर... वडीलांचा कामावर असतानाच विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा सर्व भार मोठ्या भावावर आला. अशा स्थितीतही त्याने खचून न जाता केवळ भावाच्या पाठबळाने त्याने अभ्यास केला अन् महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत तो राज्यात १० तर भटक्या विमुक्त प्रवर्गात राज्यात प्रथम आला. ही कहाणी आहे माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विठ्ठल गणपत हरळे यांची.
माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विठ्ठल हरळे हे महाराष्ट्रात १० व्या तर भटक्या- विमुक्त प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण उपळाईच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व अकरावी, बारावी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात झाले. उच्च माध्यमिक, बीफार्मसीचे शिक्षण कराड येथे तर एमएसफार्मसीचेही शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आईवडिल शेतमजुरी करून मुलांना शिक्षण देत होते. वडील कामावर असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा सारा भार मोठे बंधू बिरूदेव हराळे यांच्यावर पडला. विठ्ठल शिक्षणात हुशार असल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी बंधू बिरदेव यांनी स्वत:चे शिक्षण सोडून काबाडकष्ट करत कुटुंबाचा गाडा हाकत भावाला शिक्षण दिले. घरच्या परिस्थितीची जाण ठेवत विठ्ठल यांनीही चांगल्या गुणवत्तेने उच्चशिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली. परंतु कुटुंबाची इच्छा प्रशासकीय अधिकारी व्हावे, अशी होती.
त्यांनी 2015 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. काही वेळा यशाने हुलकावणी दिली, परंतु कष्ट चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळवले. हरळे म्हणाले, कष्ट केले आणि यश मिळाले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असं समजून वारंवार अपयश आले तरी मी अधिकारी होणार, अशी मनाशी खुणगाठ बांधून प्रयत्न करत राहिलो. कष्ट केले तर यश मिळते याचा अनुभव आला. एवढ्यावरच न थांबता पुढे या मोठ्या पदावर विराजमान व्हायचे आहे असा मानस त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.