Waari
Waari Canva
सोलापूर

रिंगण सोहळ्यातील स्वर्गीय सुखाला मुकलो! पुरंदावडेतील मैदान सुनेसुने

सुनील राऊत

लाखो वारकरी आपले देहभान विसरून "माउली - माउली'चा जयघोष करत हा अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवतात. यंदा मात्र, हे मैदान सुनेसुने दिसत आहे.

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते मुक्कामानंतर पहाटे माउलींचा सोहळा माळशिरस (Malshiras) मुक्कामासाठी मार्गस्थ होतो. मांडवे ओढ्यावर सोहळा विसावतो. तेथे न्याहारी, भोजन होऊन पुरंदावडे हद्दीत पहिल्या गोल रिंगणासाठी दुपारी एक वाजता माउलीच्या रथाचे आगमन होते. माउलींची पालखी खांद्यावर घेऊन वारकरी संपूर्ण मैदानातून नाचवत "माउली... माउली'च्या जयघोषात मैदानाच्या मधोमध आणून स्टॅंडवर ठेवतात. या ठिकाणी भव्य अशी देखणी रांगोळी काढण्यात येते. पालखी ठेवल्यानंतर पताकाधारी, हंडेवाले, तुळशीवाल्या महिला वारकरी, जनसमुदाय, रिंगणाची जागा तेथे अश्व धावतात. जनसमुदाय, दिंडी क्रमाने आपापल्या जागा निश्‍चित करतात. लाखो वारकरी आपले देहभान विसरून "माउली - माउली'चा जयघोष करत हा अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवतात. यंदा मात्र, हे मैदान सुनेसुने दिसत आहे. (This year, devotees missed the heavenly bliss of the arena ceremony at Purandawade-ssd73)

रिंगण सोहळ्यात माउलींच्या अश्वांचे, स्वारांच्या अश्वांचे व माउलींचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर भोपळे दिंडीतील जरीपटकाधारी वारकरी मैदानाला एक फेरी मारतो. त्यानंतर स्वाराचा अश्व व नंतर माउलींचा अश्‍व रिंगणात सोडले जातात. तीन ते चार फेऱ्या होऊन माउलींचा अश्व स्वराच्या अश्वाला स्पर्श करत रिंगण सोहळा पूर्ण करतो. उपस्थित लाखो वारकरी आपले देहभान विसरून "माउली... माउली'चा जयघोष करीत असतात. "जीव शिवाचा हा खेळ, लक्ष लक्ष डोळ्यांनी आज पाहिले रिंगण' अशी अवस्था लाखो उपस्थितांची झालेली असते. यंदा मात्र हा सोहळा होत नसल्याने वारकऱ्यांना हुरहूर लागून राहिली आहे. हा क्षण टिपण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचे कॅमेरे सज्ज असतात. संपूर्ण पालखी सोहळ्यातील नेटके शिस्तबद्ध गोल रिंगण येथे होत असल्याने अनेक वृत्तवाहिन्या, मालिकांचे, चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक येथील चित्रीकरण करण्यासाठी येत असतात. अश्व धावण्याचे थांबल्यानंतर माउलींच्या टाचाखालील माती घेण्यासाठी मोठी झुंबड उडते. ही झुंबड हटविण्यासाठी पोलिस व स्थानिक स्वयंसेवक प्रयत्न करतात.

गोल रिगणानंतर संत खेळ सुरू होतात. नंतर उडीसाठी चोपदार सर्वांना निमंत्रित करतात. चोपदारांच्या इशाऱ्यावर भजन सुरू होते. या उडीमध्ये चोपदार बंधू, वासकर, बंडातात्या कराडकर अग्रभागी असतात. उडीचा सोहळा अवर्णनीय असतो. एक ताल, एक सूर, टाळ-मृदंग, वीणा यांच्या आवाजाने संपूर्ण आसमंत भारावलेला असतो.

यानंतर पुरंदावडे गावालगत दुपारचा विसावा होऊन सायंकाळी सहाच्या सुमारास माळशिरसला मुक्कामासाठी पालखी सोहळा पोचतो. येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर आरती होऊन देवस्थानाच्या मालकीच्या संपूर्ण पालखी महामार्गावरील या एकमेव तळावर पालखी सोहळा विसावतो. या ठिकाणी पंचवाघ परिवाराच्या वतीने महानैवेद्य होतो. पालखीचे पहाटे वेळापूरकडे प्रयाण होते. वाटेत खुडूस येथे सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण होत असते. यंदा या सर्व सोहळ्यांना वारकरी मुकले आहेत. तरीही माउली आपल्या गावी आले असल्याचा भास मार्गांवरील गावांना होत असून, अनेक जण रिंगण सोहळ्याच्या आठवणीत डुबून जात आहेत.

वारी व पालखी आगळावेगळा सोहळा असतो. यामधून प्रेरणा मिळते. आजचे अध्यात्म हे वारीमुळेच टिकून आहे. वारीमध्ये नामस्मरण घडते. वारी ज्या गावातून जाते त्या गावाला एक प्रेरणा मिळते. गावांमध्ये सात्त्विकता निर्माण होते. खरे पाहता, अत्यंत कमी संख्येत कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी वारी होऊ शकत होती. परंतु, ते शक्‍य झाले नाही. पुढील वर्षी तरी त्याच जल्लोषात उत्साहात पायी वारी व्हावी, ही इच्छा.

- मुकुंद कुलकर्णी, माळशिरस

माउलींच्या रिंगणातील टाळ-मृदंगाचा घोष ऐकून स्वर्गीय सुखाचा लाभ होतो. न कल्पना केलेला आनंद रिंगण सोहळ्यात मिळतो.

- पांडुरंग सालगुडे-पाटील, सदाशिवनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT