पश्चिम महाराष्ट्र

गाव माझं वेगळंः लगीन जोरात तवा, मच्छिंद्रगडचा बॅण्ड वाजंल जवा..!

अजित झळके

’लगीन जोरात तवा, मच्छिंद्रगडचा बॅण्ड वाजंल जवा..!’ अशी आहे, किल्लेमच्छिंद्रगड गावच्या बॅण्डची हवा. सांगलीतील वाळवा तालुक्‍यातील मच्छिंद्रगड गावातला बॅण्ड असा सर्वांनाच हवा असतो. हे गावच बॅण्डवाल्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. इतरांचे आनंदाचे क्षण बॅण्ड वाजवून साजरे करणारे हे गोपाळ समाजातील बॅण्डवाले अजूनही जगण्यासाठी संघर्ष करत आहेत...

किल्लेमच्छिंद्रगड वाळवा-कराड तालुक्‍याच्या सीमेवरील गाव ‘बॅण्डवाल्यांचं गाव’ म्हणून ओळखलं जातं. या गावात नऊ बॅण्ड आणि दोन बॅंजो पथकं आहेत. अडीचशे ते तीनशे लोकांची यावर उपजीविका आहे. यांच्या तालावर पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक शहर, गावांतील लोक नाचतात.

वाळवा तालुका क्रांतिकारकांचा. किल्लेमच्छिंद्रगडलाही क्रांतीची परंपरा. गावात गोपाळ समाजातील पाच-सातशे लोकांची वस्ती आहे. त्यातील दिवंगत शंकर पवार यांचे सत्तरीच्या दशकात गाजलेले तमाशा मंडळ होते. ते, सोबत नवरंग बॅण्ड पथकही चालवायचे. पुढे तमाशाचे महत्त्व कमी झाले आणि बॅण्डला चांगले दिवस आले.

कुटुंबकबीला वाढला तशा बॅण्ड पथकाच्या शाखा वाढल्या. नवरंग, नॅशनल, न्यू नॅशनल, झंकार, सरस्वती, सागर आदी नावाने नवनवी बॅण्डपथके सुरू झाली. नव्या पिढीने आधुनिकता आणली. काहीजण बाहेर शिकून आले. उत्तम गायक,वादक झाले. त्यांनी गावात येऊन पुढच्या पिढीला शिकवले. मास्टर नीलेशकुमार आणि मच्छिंद्रनाथ अशी दोन बेंजो पथके तयार झाली. 

पूर्वी गोपाळ समाज तारेवरची कसरत करून जगायचा. मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या आणि नव्या तरुणांनी त्या आत्मसातही केल्या. आपल्या जगण्याचा मार्ग लोकांच्या मनोरंजनातून जातो, हे मात्र ते विसरले नाहीत. दारिद्रयात तर आजही हा समाज आहे. मात्र ते दुःख विसरून ते इतरांचा आनंद द्विगुणीत करतात. 

गावातील अडीचशे ते तीनशे कलाकारांचे वाजंत्रीवर पोट चालते. वाजंत्रीवाले गावोगाव पथकाच्या स्पेशल गाड्यांमधून जातात. खुराड्यातून कोंबड्या न्याव्यात तसा काहीसा प्रकार. तिथं गेल्यावर पुन्हा रात्रभर वाजवायचं. सलग आठ-दहा तास मिरवणूक, गाणं. मग कधी उत्तररात्री पोटात घास. गावात जवळपास ३० महिला गायक कलाकार आहेत. त्यांनी सरावानेच गायन आत्मसात केलेले. त्यासाठी ते कुणा गुरूकडे कधी गेले नाहीत.

स्वतःच स्वतःचा गुरू. आता मोबाईलसारखे साधन त्यांच्यासाठी वरदानचं. त्यावर त्या गाणी ऐकतात. अगदी घरी भाकरी थापतानाही त्याचं ऐकणं, गुणगुणणं सुरू असते. यातल्या काही महिला तर गायक आणि गायिका असा डबल रोल करतात. नामाकिंताची गाणी हुबेहूब साकारतात. काही पुरुष गायक महिलांच्या आवाजात गाणी गातात. त्यासाठी एकेका गाण्यावर दोन-अडीच दिवस सराव करावा लागतो, असं बॅण्ड मालक महेश जाधव सांगतात.

नॅशनल बॅण्डचे मालक उत्तम जाधव, न्यू नॅशनलचे शिवाजी जाधव, झंकार बॅण्डचे धर्मा पवार, नवरंग बॅण्डचे बाबूराव पवार, सरस्वती बॅण्डचे आनंदा पवार, नीलेशकुमार बेंजोचे विजय चव्हाण, मच्छिंद्रनाथ बेंजोचे उमेश पवार, सागर बॅण्डचे उत्तम जाधव, रॉयल बॅण्डचे अमोल चव्हाण, दरबार बॅण्डचे संजय पवार ही सारी मालक मंडळी पोशिंदेच आहेत. मच्छिंद्रगडच्या डोंगराखाली जंगलात उत्सवापूर्वी सूर कानी पडतात. शेतात आंब्याच्या झाडाखाली पथके सराव करताना दिसतात.

व्यवसायातली गुंतवणूक आता वाहनांसह बारा-पंधरा लाखांच्या घरात जाते. बॅंडची एक सुपारी सुमारे ४० ते ६० हजारांची असते. बॅंजो पथक ३० ते ४० हजार रुपये घेते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि लग्नसराई एवढ्यापुरताच हंगाम... इतर वेळी या लोकांवर शेतमजुरीची वेळ येते. ऊस तोडी जाण्याआधी सणासुदीचे दिवस असतात. ही पर्वणी साधताना त्यांना रोजच्या जगण्यातील संघर्षाचा विसर पडतो. इतरांच्या आयुष्यात संगीताचे सूर भरताना देहभान होणारे हे सारे कलावंत जगण्याची प्रेरणा देत राहतात.

किल्लेमच्छिंद्रगडचा बॅण्ड म्हणजे लोकांना हुरूप येतो. अनेक दशकांपासून ही परंपरा जपली आहे. पुढच्या पिढ्या शिकून त्यात नवनवे प्रयोग करताहेत. कलाक्षेत्राची आम्ही नेहमीच सेवा करत राहू, आम्ही कला दाखवून जगतो, मात्र आम्ही कलाकार आहोत की शेतमजूर? शासन दरबारी आमची कलाकार म्हणून नोंद व्हावी, अशी अपेक्षा आहे.
-उत्तम जाधव
, बॅण्ड मालक.

पोंगेही सांभाळतात
गोपाळ वस्तीचा एक नियम आहे. साऱ्यांनी साऱ्यांना सांभाळून न्यायचे. काही लोकांना वाजवता येत नाही, गाताही येत नाही; पण ती गर्दी करणे, ओझी उचलणे, काही स्थिर वाद्ये धरून उभे राहणे याकामी येतात. त्यांना ‘पोंगे’ म्हणतात. बॅंड मालक या लोकांना सांभाळून त्यांचेही कुटुंब जगवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT