Story of Dr. Jabbar Patel 
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. जब्बार पटेल यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! 

रजनीश जोशी

सोलापूर : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरच्या डॉ. जब्बार पटेल यांची सन्मानाने निवड झाली आहे. सोलापूरकरांसाठी ही अत्यानंदाची घटना आहे. मराठी रंगभूमीवर अनेक महत्त्वाचे मानदंड निर्माण करणाऱ्या या दिग्दर्शकाविषयी... "अशी पाखरे येती' या नाटकातील अरुणची भूमिका सादर करणाऱ्या डॉ. जब्बार पटेलांनी संवाद आणि आत्मसंवाद कसे असावेत याचा वस्तुपाठ घालून दिला. असं म्हटलं जातं की विजयाबाई मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणाऱ्या सगळ्या अभिनेत्री जर वृद्धेची भूमिका करीत असतील तर त्यांची उठण्या-बसण्याची "स्टाईल' थेट बाईंनी सांगितल्याप्रमाणे असणार. म्हणजे; वृद्धेची भूमिका करणारी कलावंत हालचाली कशी करते, त्यावरून ती बाईंच्या तालमीत तयार झालीय हे कळते. अगदी तसेच; "अशी पाखरे'नंतर कोणत्याही नाटकात सादर होणारे सूत्रधार, निवेदक आजतागायत डॉ. पटेल यांच्या अरुणची नक्कल करतात. सूत्रधाराचा "ट्रेंड' डॉक्‍टरांनी "सेट' केला. तीच गोष्ट त्यांनी दिग्दर्शित केलेल्या "घाशीराम कोतवाल'मधील मानवी भिंतीची. "घाशीराम'नंतर जी समूहनाट्ये प्रायोगिक रंगभूमीवर आली, त्यातील समूहदृश्‍यात मानवी भिंतीचा आवर्जून वापर केला गेला तो थेट "घाशीराम'प्रमाणेच. हीदेखील डॉक्‍टरांचीच कमाल. 

हेही वाचा : "यांच्या'मुळेच घडली ही रत्ने 
त्यांचं रहस्य 

डॉ. पटेलांच्या चतुरस्त्रतेचं एक उदाहरण मुद्दाम सांगण्याजोगं आहे. "घाशीराम कोतवाल' या नाटकाचं संगीत दिग्दर्शन करीत होते भास्कर चंदावरकर. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलांनी माणसाच्या भिंतीचा पदन्यास बसवलेला. "पुण्याचे बामणहरी...'सारख्या गीतांना चाली देण्याचे काम चाललेलं. एका वाद्याच्या वापरावरून डॉ. पटेल आणि चंदावरकरांत एकमत होत नव्हतं. डॉ. पटेलांना सनईऐवजी वेगळं वाद्य हवं होतं. चंदावरकरांनी अनेक वाद्यांचा पर्याय त्यांना सुचवला. पण सुषिर वाद्यच हवं असा डॉक्‍टरांचा आग्रह होता. अचानक त्यांना सोलापूर आठवले...आणि एका भल्या सकाळी चंदावरकरांसह ते सोलापुरात आले. ख्यातनाम सुंद्रीवादक सिद्रामप्पा जाधवांच्या छोट्या घरी दोघेही पोचले. सिद्रामप्पांना पटेलांनी सुंद्रीवर तो विशिष्ट राग वाजवायला सांगितला. जाधवांची तयारी पाहून चंदावरकर थक्क झाले. त्यांनी तो तुकडा आपल्या संगीतात वापरला. गीताला चाल दिल्यानंतर विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वाद्यच असायला हवं ही जाणकारी डॉ. जब्बार पटेलांकडं आली कुठून? त्याचं रहस्य आहे त्यांच्या सोलापुरातल्या प्रा. श्रीराम पुजारी यांच्या घरातल्या वास्तव्यात. 

म्हणजे डॉ. पटेलांचा मोठा वाटा
डॉ. पटेल मूळचे पंढरपूरचे. पंढरपुरातून ते सोलापुरात शिकायला आले. काही दिवसांनी ते प्रा. पुजारी यांच्याकडं राहायला गेले. तिथं होणारी साहित्य-नाट्य-संगीताची चर्चा त्यांच्या कानावर पडे. त्यातून ते घडत गेले. मग "वेड्याचं घर उन्हात'सारखं नाटक त्यांनी स्वतः भूमिका करून दिग्दर्शित केलं. पुढं ह. दे. प्रशालेतून पुण्यात "बी. जे. मेडिकल'मध्ये गेल्यानंतर तर त्यांच्यातील नाट्यदिग्दर्शकाला धुमारे फुटले. "बळी'सारख्या एकांकिकेने त्यांचं कौशल्य सिद्ध झालंच होतं. विजय तेंडुलकरांच्या "घाशीराम कोतवाल'मुळे "थिएटर ऍकॅडमी'ची स्थापना झाली. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुखांसारख्या जाणत्या समीक्षकाने "घाशीराम'च्या यशाचे रहस्य त्याच्या प्रयोगात आहे, संहिता अंगावर येत नाही, प्रयोग येतो, असे लिहून पटेलांचीही प्रशंसा केली आहे. सरदेशमुखांनी संहितेच्या अंगाने या नाटकाची समीक्षा मांडली असली तरी प्रयोगाशिवाय कोणत्याही नाटकाला पूर्णत्व येत नाही याविषयी ते ठाम होते. त्यामुळेच "घाशीराम'च्या यशात प्रयोगाचा; म्हणजे डॉ. पटेलांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नोंदवले आहे. 

हेही वाचा : हमाल करतोय मुलीच्या स्वप्नावर सगळा पगार खर्च 
संघर्षाला रहस्याची डुब 

पु. ल. देशपांडेंच्या "तीन पैशांचा तमाशा' या रूपांतरालाही त्यांनी योग्य न्याय दिला. त्यातही पुन्हा संगीताचा वेगळा विचार मांडला आहे. पुढं नाटकातून सिनेमाकडं ते वळले. दिग्दर्शकाला लागणारी चौफेर दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यांच्यात एक कवी दडलेला आहेच. सर्वसामान्य घटनेकडे पाहण्याची वेगळी दृष्टी लाभलेला प्रतिभावान असे त्यांना म्हणावे लागेल. म्हणूनच "सामना' चित्रपटात त्यांनी "राया, असे झोंबू नका अंगाला'सारख्या लावणीचा तुकडाही लिहिला. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांनी केलेल्या भूमिका तर अजरामर ठरल्याच, पण दिग्दर्शक म्हणून पटेलांचा वकुबही सिद्ध झाला. "सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गीत आणि लष्करातील जवान असलेल्या मोहन आगाशे यांची दृश्‍ये यातून त्यांनी संघर्षाला रहस्याची डुब दिली आहे. त्यांच्यातील नाट्य दिग्दर्शकाचे कसब म्हणता येईल. 

हेही वाचा : मराठीत प्रार्थना होणारे होली इव्हॅनजोलिस्ट चर्च... 
व्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटाने ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले. मामूटीसारख्या लोकप्रिय नटाची बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी निवड करण्यात "रिस्क' होती. तथापि, डॉ. पटेलांनी या चित्रपटाला वेगळीच उंची दिली. "मुक्ता', "जैत रे जैत' ते "एक होता विदूषक'पर्यंतची त्यांची कामगिरी उत्तमतेच्या ध्यासाचीच आहे. मराठी रंगभूमीवर आता खूप बदल झाले आहेत. तंत्राचा वापर सोपा आणि माकूल झाला आहे. लेखन-दिग्दर्शन आणि नाटकाच्या आशय-विषयाच्या अनुषंगाने नव्या पिढीला मार्गदर्शन होईल, असे विचार त्यांच्याकडून नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून ऐकायला मिळतीलच. त्यांच्याशी सहज, साधं बोलणं हेदेखील समृद्ध करणारं असतं. सोलापुरातल्या एका भेटीत त्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना हॉलिवूडच्या चित्रपटांतील नायकांच्या हालचाली संवाद "म्यूट' करून पाहिल्या तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असे सांगितले होते. अनेक वर्षांच्या त्यांच्या अनुभवसिद्ध रंगकार्यातून रसिकांसह नव्या पिढीतील कलावंतांनाही नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. नाट्यसंमेलनाचा शतकोत्सव सोलापूरकरांसाठी आनंददायी आहे, यात शंका नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

Latest Marathi News Updates Live : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PAK vs OMN : पाकिस्तानच्या दुबळ्या ओमानविरुद्ध रडले, फलंदाजांनी माना टाकल्या; भारताविरुद्ध निघणार यांची हवा...

Chhagan Bhujbal: ''मराठ्यांना EWS अन् SEBC आरक्षण नकोय का? उत्तर द्या'' छगन भुजबळांचा समाजाला प्रश्न

SCROLL FOR NEXT