Today Sangli district is 60 years old; Before that it was South Satara 
पश्चिम महाराष्ट्र

आज सांगली जिल्हा झाला ६० वर्षांचा; आधी होता दक्षिण सातारा

अजित झळके

सांगली : दक्षिण सातारा जिल्ह्याचे "सांगली' नामकरण 21 नोव्हेंबर 1960 रोजी झाले. सांगली जिल्हा उद्या (ता. 21) साठ वर्षांचा होतोय. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, सहकार, कला, क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रात गेल्या साठ वर्षांत जिल्ह्याने गतीने प्रगती करत राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे दुष्काळ, अशा टोकाच्या परिस्थितीवर मात करत विकास रथ पुढे हाकण्याचे काम सुरू आहे. दुष्काळमुक्तीसाठी प्रभावी काम, हे गेल्या साठ वर्षांतील सर्वात महत्त्वाचे काम ठरावे. 

दोनशे वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेले सांगली शहर जिल्ह्याचे केंद्र झाले. सांगली म्हणजे गणरायाची नगरी. 8 हजार 578 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, दहा तालुके, 30 लाखांवर लोकसंख्या, एक महापालिका, चार नगरपालिका, 709 ग्रामपंचायती, दोन लोकसभा, आठ विधानसभा क्षेत्रांचा हा जिल्हा. 

इतिहास अभ्यासक विजय बक्षी सांगतात, कृष्णाकाठची सांगली सहा गल्ल्यांची. ती आज महानगर झाली आहे. गेल्या साठ वर्षांत या जिल्ह्याने खूप उंची गाठली. देवराष्ट्रे आजोळ असलेले यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री. वसंतदादांनी चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले. लोकनेते राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, पतंगराव कदम अशा नेत्यांनी राज्याच्या राजकारणात सांगलीची चमक दाखवली. चांदोली धरणाची निर्मिती; टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे या सिंचन योजनांतून शेतीची प्रगती ही लक्षवेधीच राहिली. रोजगार हमी, स्वच्छता अभियान, पाणी अडवा-पाणी जिरवा, अशा योजना इथे जन्माला आल्या आणि त्या राज्याने, देशाने स्वीकारल्या. किर्लोस्कर उद्योग समूह, चितळे दूध, वालचंद महाविद्यालय अशी काही नावे राज्यात ब्रॅंड झाली. सांगलीची हळद, इथला बेदाणा, द्राक्ष; साखर

कारखानदारीतील वर्चस्व हे राज्यभरच नव्हे, तर देश आणि जगभर लौकिकास पात्र ठरले. हा प्रवास या साठ वर्षांतीलच. 

सेवा, उद्योग, व्यवसायांचे जाळे 
अठरा साखर कारखाने, 4 हजार 834 सहकारी संस्था, सात सूतगिरण्या, वाईन पार्क, दूध संघ असे जाळे पसरले. मिरज शहराची ओळख वैद्यकीय नगरी म्हणून झाली. देश-विदेशातील रुग्णांनी इथे उपचार घेतले. मिरज रेल्वे जंक्‍शनचा विकास या साठ वर्षांतील महत्त्वाचा भाग. देशाला जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचे जाळे येथे विणले गेले आहे. अलीकडे जिल्ह्यातून चार नवे राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. संपूर्ण जिल्हा आता महामार्गाशी जोडला जातोय. अगदीच अलीकडे अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी गौरव झाला. लोकचळवळीतील विकास मार्गाचा त्यानिमित्ताने गौरव झाला. सांगली जिल्हा साठीचा होत असताना हा गौरव अधिक महत्त्वाचा ठरतो. 

दक्षिण सातारा ते सांगली 
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून 1 ऑगस्ट 1949 रोजी सहा तालुक्‍यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आजच्या दिवशी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा झाले. या जिल्ह्यात 1965 साली कवठेमहांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले. पुढे पलूस तालुक्‍याची आणि 2002 रोजी कडेगाव तालुक्‍याची निर्मिती झाली. 

कर्मभूमी सांगली 
सांगलीत विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड हे सारेच सांगलीचे. महान कलावंत बालगंधर्व यांची कर्मभूमी सांगली जिल्हाच. कर्मवीर भाऊराव पाटील हे सांगलीचेच. बॅ. पी. जी. पाटील, ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर, ग. दि. माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे, कथाकार चारुता सागर, क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर अशी कित्येक दिग्गज माणसं या सांगलीची. 

ऐतिहासिक महत्त्व 
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी शिराळ्यामध्ये शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध पावला. मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT