पश्चिम महाराष्ट्र

कुरळपला आश्रमशाळेत आठ मुलींवर अत्याचार

सकाळवृत्तसेवा

कुरळप - येथील मिनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज (बुधवार) शाळेतील अल्पवयीन आठ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली.

प्राथमिक तपासात त्याच्यावर आठ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका ठेवला असून या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. कुरळप पोलिसांनी निनावी पत्राची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा छडा लावला. नराधम पवार याला या घृणास्पद कृत्यात मदत करणाऱ्या स्वयंपाकीण मनीषा शशिकांत कांबळे (वय ४५, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. 

काही वर्षांपासून आश्रमशाळांच्या गैरकारभाराचे वाभाडे निघत असताना या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्राला पुरता काळिमा फासला गेला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना काल (ता. २५) मिळाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना साध्या वेशात शाळेत पाठवून पडताळणी करण्यास सांगितले. त्यांनी शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधला. त्यांना विश्‍वासात घेतल्यानंतर मुलींनी संस्थापक पवार याच्या कृत्याचा पाढा वाचला. आज सकाळी पोलिस उपाधीक्षक किशोर काळे यांनी पवार याला ताब्यात घेतले.

त्यानंतर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा पवार, निर्भया पथकाच्या कोमल पवार, वाळवा पंचायत समितीचे बाल प्रकल्प अधिकारी सुहास बुधावले यांच्यासह आश्रमशाळेवर छापा टाकला. पवार याच्या शाळेतील खोलीत तसेच आवारातील निवासी खोलीची झडती घेतली. संस्थेचे कार्यालय व दप्तर सील केले. त्यावेळी अश्‍लील सीडी, उत्तेजक औषधे, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. पोलिसांनी पीडित आठ मुलींना घेऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांना या प्रकाराची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलींची वैद्यकीय तपासणी सुरू होती. 

दरम्यान या प्रकरणाचा सुगावा अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना लागला होता. दबक्‍या आवाजात त्याची चर्चा सुरू होती. पवारच्या लैंगिक अत्याचाराकडे शाळेतील शिक्षकांकडून दुर्लक्ष झाले. काल निनावी पत्राने या निंदनीय कृत्याला वाचा फुटली. पवारने मुलींना मारहाण करून लैंगिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्याने पीडित मुलींना ‘मी जे करतोय ते कुणाला सांगायचे नाही, अन्यथा मार दिला जाईल’, अशा शब्दात धमकावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

पवार याच्या या कारनाम्याबद्दल काही मुलींनी शिक्षकांनाही सांगितले होते; मात्र त्यांनीही त्याकडे कानाडोळा केला. पीडित अनेक मुलींना आई-वडील नाहीत. हतबल या मुलींनी अनेक महिन्यांपासून नराधमाचा अत्याचार सहन केला. उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी याबाबाबत फिर्याद दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे पोलिस उपाधीक्षक काळे यांनी सांगितले.

निनावी पत्राने वाचा
नराधम पवार याच्या निंद्य कृत्याला वाचा फुटली ती निनावी पत्राने. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतल्यावर उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी साध्या वेशात शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधून शहानिशा केली आणि आज शाळेवर छापा टाकत पवार याच्या गुन्हेगारी कृत्याचा पर्दाफाश केला. पवार याच्या निवासी खोलीत उत्तेजक औषधे, अश्‍लील सीडी सापडल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT