मिरज : शहरातील नागरी समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांचे फोन डावल्याचा उद्रेक आज मिरजेत गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत झाला. बैठकीच्या प्रारंभी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी अधिकाऱ्यांना गणेशोत्सव संपेपर्यंत महापालिकेकडून मिळालेले फोन बंद ठेवाल तर निलंबनाचा प्रस्ताव पाठवू, असा इशारा दिला. उत्सवादरम्यान शहरातील रस्ते, स्वच्छता, विद्युत समस्या, वटलेली झाडे, गणेशोत्सव मंडळाचे परवाने, विसर्जन सोहळा या संदर्भात आयोजित बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. स्थायी सभापती निरंजन आवटी यांच्या अध्यक्षतेखाली मिरज महापालिकेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक झाली.
यावेळी महापालिका अधिकारी, पोलिस प्रशासन, महावितरण, आरोग्य यासह अन्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी शहरातील खड्डेमय रस्ते, भटकी कुत्री, वटलेली झाडे या सर्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले. विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी शहरातील रस्ते पॅचवर्क करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या, तर नगरसेवक करण जामदार यांनी गणेश मंडळांचा ऑनलाइन परवाना घेताना सिस्टिममध्ये असंख्य चुका निदर्शनास आणून दिल्या. विसर्जना- दरम्यान यंदा गणेश तलावामध्ये क्रेनची संख्या वाढविण्याची सूचना केली.
नगरसेविका संगीता हारगे यांनी शहरातील पार्किंगसह विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या संख्येने मिरवणूक पाहण्यास येणाऱ्या महिलांना फिरती स्वच्छतागृहे उभारण्याची सूचना केली. गजेंद्र कुल्लोळी यांनी शहरातील मिरवणूक मार्गातील वटलेली झाडे हटविण्याची मागणी केली. कुपवाडचे नगरसेवक विजय घाटगे यांनी रस्ते पॅचवर्कसह उत्सवकाळात कुपवाड मधील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेविका गायत्री कुल्लोळी, नगरसेवक पांडुरंग कोरे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहा.आयुक्त दत्तात्रय गायकवाड, दिलीप घोरपडे, आरोग्याधिकारी रवींद्र ताटे, ‘महावितरण’चे मुख्य अभियंते श्री. खांडेकर, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल माने, रविराज फडणीस, गिड्डे, गिरीश पाठक आदी प्रमुख उपस्थित होते.
पार्किंगकडे दुर्लक्ष...
बैठकीदरम्यान मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अनिल माने यांनी महापालिकेकडे १५ वेळा पत्रव्यवहार करूनही पार्किंगसाठी जागा अथवा दुचाकी पार्किंगचे साईडपट्टे मारण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवाय ते म्हणाले, मिरजेतील रस्ते ड्रेनेजसह अन्य कामांसाठी खोदले आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. शिवाय अतिक्रमणाची समस्या असल्याचे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.