सांगली : महापालिका प्रशासनाने मार्च अखेर डोळ्यासमोर ठेऊन पाणीपट्टी वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. सतत मागणी करुनही बिल न भरणाऱ्या आठ कुटुंबांचे कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तर तब्बल 1800 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पाणीपट्टी वसुलीसाठी चार पथके आणि चार वॉरंट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक काका हलवाई यांनी दिली. पाणीपुरवठा विभागाची थकबाकी तब्बल 39 कोटींवर गेली आहे. ही वसुली करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे. 2019 मध्ये महापूर आणि त्यानंतर सहा महिन्यांत 2020 मध्ये आलेले कोरोनाचे संकट यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.
पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली झाली नसल्यामुळे थकबाकी वाढली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाणीपट्टी आणि घरपट्टी विभागाने वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली आहे.
आठ कुटुंबाचे पाणी तोडले गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळातील पाणी बिले वाटप करण्यात आली आहेत. त्याच्या वसुलीसाठी पाणी पुरवठा विभागाने महापालिका क्षेत्रात चार पथके तसेच चार वॉरंट अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत वाघमोडेनगर येथील आठ कुटुंबाचे नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यांच्याकडे तब्बल एक लाख 82 हजार 398 रुपयांची पाणी बिले थकीत आहेत.
1800 थकबाकीदारांना नोटिसा
पाणी बिले थकबाकीदाराची संख्या मोठी आहे. त्यापैकी बड्या थकबाकीदारांवर पाणी पुरवठा विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. जवळपास थकबाकीदारांना पाणी बिले भरण्यासाठी अंतिम नोटीस काढण्यात आली आहेत. अनेक नागरिकाची पाणी मीटर बंद आहेत. त्यांनाही नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडण्यासह जप्तीचीही कारवाई करण्यात येत आहे.
पाणी बिलात सूट नाही
घरपट्टीसाठी शास्तीमध्ये 100 टक्के सूट दिली आहे. तशीच पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी ही योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे. मात्र पाणी बिलामध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्याची योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी बिले भरून कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.