Will Jayant Patil favor Anil Babar? 
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील करतील का अनिल बाबर यांची मनधरणी ?

सकाळ वृत्तसेवा

सांगली - एकेकाळी राज्यात राष्ट्रवादी वाढत असताना जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री जयंत पाटील यांनी वेगळा राजकीय पॅटर्न राबवला होता. त्यात त्यांच्याच राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे हात पोळले होते. तोच पॅटर्न आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीत अडचणीचा ठरण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्यभर महाविकास आघाडी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, मात्र त्याला पहिला सुरुंग सांगली जिल्हा परिषदेत लागेल, असे संकेत मिळत आहेत. 

जिल्हा परिषद सत्ता पेच ; शिवसेनेला स्थानिक राजकारणात भाजपच जवळची

सन २०१४ ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आणि सेनेच्या चिन्हावर दोनवेळा आमदार झालेल्या अनिल बाबर यांनी ‘राष्ट्रवादीवर भरवसा ठेवायचा कसा?’, असा सवाल उपस्थित केला आहे. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट आदेश दिले तरच बाबर यांच्या भूमिकेत बदल होऊ शकतो मात्र त्यासाठी जयंत पाटील यांना बाबरांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. अर्थात हे जमले तरी खानापुरात बाबर यांच्या मार्गात राष्ट्रवादीचे संभाव्य अडथळे कसे दूर करणार, हा प्रश्‍न आहेच! हे सारे होईल का, यावरच जिल्हा परिषदेतील नव्या सत्ता समीकरणांची बांधणी होईल.

२०१४ ला बाबर यांनी का सोडली राष्ट्रवादी ?

अनिल बाबर यांची जयंत पाटील यांच्याविषयी आणि खानापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी नाराजी लपून राहिलेली नाही. त्याला इतिहासातील काही घटना आणि सध्याच्या राष्ट्रवादीच्या चाली कारणीभूत आहेत. बाबर यांचा सन २००४ आणि २००९ असा सलग दोनदा विधानसभेला पराभव झाला. तेव्हा ते राष्ट्रवादीत होते. बाबर संपले, असेही बोलले गेले. ते आर. आर. पाटील यांचे बंधुतुल्य मित्र. दोघांचे राजकारण समांतर चालले आणि फुलले, मात्र बाबर यांना संकटकाळी राष्ट्रवादीने हात दिला नाही. त्यातही जयंत पाटील यांनी म्हणावे तसे सहकार्य केले नाही, असे सतत बोलले गेले. २०१४ ला बाबर यांनी पक्ष सोडला, त्यावेळीही राष्ट्रवादीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट बाबर संपले आहेत, त्यांना जावू द्या, अशीच भूमिका स्थानिक पातळीवर घेतली गेल्याचा आरोप त्यांचे समर्थक करतात. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांत बाबर यांनी बाजी मारली. त्यावेळी राष्ट्रवादीने माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी  केली होती.या काळात भाजप नेत्यांनी मात्र बाबर यांना मदत केली. २०१९ ला खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी संपूर्ण ताकद मागे लावली. खानापूर काँग्रेसनेही हात दिला.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला कोणती अडचण ?

आता बाबर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला मदत करावी, असा प्रस्ताव आहे. जिल्हा परिषद सदस्य त्यांना भेटले आहेत, मात्र बाबर यांनी दहा प्रश्‍न उपस्थित करत राष्ट्रवादीच्या राजकीय कुरघोड्यांचा पाढा वाचला आहे. त्यात जयंत पाटील यांचा थेट उल्लेख नसला तरी राष्ट्रवादीच्या चालींनी बाबर नेहमी घायाळ होत राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा ती चूक नको, अशी त्यांच्या गटाची भूमिका आहे. तीच जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला अडचणीची ठरण्याची शक्‍यता आहे. दरम्यान भाजप नेत्यांशी बाबरांचे संबंध चांगले असल्याने बाबर पुन्हा नवी सोयरिक करताना विचार करतील आणि भाजप नेतेही सत्ता जावू नये यासाठी बाबरांना साकडे घालण्याचीही प्रयत्न करणारच!

सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीत आले तर..?

खानापूरचे माजी आमदार सदाशिवराव पाटील कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा आहे. शरद पवार यांच्याशी त्यांचा सतत संपर्क आहे. राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आहे. विटा नगरपालिकेच्या दृष्टीने ते हा निर्णय घेऊ शकतील. अशावेळी राष्ट्रवादीला मदत करून आपले नुकसानच होईल, अशी बाबर गटाची भूमिका दिसते आहे. दुसरीकडे भाजपच्या मदतीने आमदार झालोय, त्यांना कसे डावलायचे, असा यक्षप्रश्‍न त्यांच्यापुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय: अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक वर्ष

Latest Marathi News Live Update: वंदे मातरम ला दीडशे वर्षे पूर्ण पारोळा येथे सामूहिक वंदे मातरम गायन

Money Vastu Tips : खिशात एक रुपयाही टिकत नाही ? वास्तूचे हे उपाय करा आणि पैशांची होईल भरभराट

Indapur Crime: कळंबमध्ये १०० किलो गांजा जप्त; गांजा तस्करी करणाऱ्या टोळीवर वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई!

SCROLL FOR NEXT