BJP, Maharashtra
BJP, Maharashtra 
पिंपरी-चिंचवड

भाजपमध्ये पिंपरी-चिंचवडचा ठसा; सात शिलेदारांची नियुक्ती करून साधला समतोल

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांचा वेगळाच ठसा उमटला आहे. पुण्याचे जुळे शहर अशी ओळख निर्माण करणाऱ्या उद्योगनगरीतून आता तब्बल सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून प्रदेश व देश पातळीवरील नेतृत्वाचे विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अगदी माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहराकडे विशेष लक्ष दिल्याचेही दिसते आहे. विशेष म्हणजे शहरातील कार्यकर्त्यांची प्रदेश पातळीवर नियुक्ती करताना जुने-नवे, गडकरी-मुंडे या गटातटांसह सर्व समाज घटकांचा विचार केलेला दिसतो आहे. यातून शहराच्या राजकारणावरही एक वेगळीच छाप भाजपने पाडली आहे. याचा फायदा आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसह राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही करून घेण्याचा भाजपचा डाव दिसतो आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणी व विविध सेलच्या नियुक्‍त्या दोन दिवसांपूर्वी जाहीर झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या सात जणांची वर्णी लागली आहे.

आजपर्यंतच्या नियुक्तीत सर्वाधिक जणांना प्रथमच संधी मिळाली आहे. तीही वेगवेगळ्या सेलवर जबाबदारीची पदे देऊन पक्षाने कार्यकर्त्यांना न्याय दिलेला दिसतो आहे. यात प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी अमित गोरखे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे, कायदा सेलच्या सहसंयोजकपदी ऍड. सचिन पटवर्धन, प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी एकनाथ पवार व सदाशिव खाडे आणि विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये अमर साबळे व राजेश पिल्ले यांचा समावेश आहे. यावरून भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रदेश पातळीवर संधी दिल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. 128 सदस्यांच्या सभागृहात पक्षाचे 77 व चार अपक्ष समर्थक आहेत. महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे महापालिकेचा गाडा सहका-यांच्या साथीने हाकत आहेत. शहर भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कडे आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार लक्ष्मण जगताप करीत आहेत. त्यांना आता नवीन सात सहकाऱ्यांच्या प्रदेश पातळीवर नियुक्तीचे बळ मिळाले आहे. या सर्व बळाच्या जोरावर अवघ्या दीड वर्षावर आलेली अर्थात फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी महापालिका निवडणूक जिंकायची आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अमित गोरखे यांच्याकडे होती. त्यांची वर्णी आता भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सचिवपदी (मंत्री) लागली आहे. एक तरुण व उच्च शिक्षित चेहरा प्रकर्षाने निवडला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून गोरखे यांची ओळख आहे. नियुक्तीबाबत, ""एखाद्या सेलेचे पद मिळेल, असे अपेक्षित होते. पण, अनपेक्षितपणे इतक्‍या मोठ्या पदाची जबाबदारी मिळाली आहे,''असे मत त्यांनी व्यक्त केले. यानिमित्ताने प्रदेश पातळीवर काम करायला मिळणार आहे. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भाजप आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या संघटन बांधणीत मोलाची कामगिरी असलेल्या उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आली आहे. स्पष्ट वक्त्या, एक उत्कृष्ट संघटक, निष्ठावंत कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. "इतके वर्षे पक्ष संघटनेचे एकनिष्ठेने काम केले. त्याचा न्याय मिळाला आहे,'' असे मत व्यक्त करून त्या म्हणाल्या, ''पदाचा वापर पक्ष संघटना बांधणीसाठी करणार आहे. यापूर्वी राज्यात काम केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ओळखीचे झाले आहेत. त्याचा फायदा आता होणार आहे. जोमाने काम करता येणार आहे.''

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कायदा सेलच्या सहसंजोजकपदी ऍड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी झटणारा पण, प्रसिद्धीपासून दूर राहणारा कार्यकर्ता, अशी त्यांची प्रतिमा आहे. यापूर्वी त्यांनी एनजीओ, सहकार अशा सेलचे काम केले आहे. लोक लेखा समितीच्या कामाचा अनुभव आहे. पक्षाने आता कायदा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. ''पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने करणार. कारण, आधी मी एक स्वयंसेवक आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करत आलो आहे,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भाजपचे दिवंगत नेते व माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले एकनाथ पवार सध्या नगरसेवक आहेत. 2017 च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आल्यानंतर पक्ष नेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी यशस्वीरित्या सभागृह चालविले आहे. सभागृहात पहिल्यांदाच आलेले असले तरी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे त्यांची भूमिका राहिली आहे. एक हाडाचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
सतत हसतमुख चेहरा, एक प्राध्यापक व भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी सदाशिव खाडे यांची ओळख आहे. शहर भाजपच्या संघटन बांधणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जवळपास दीड वर्षे त्यांनी काम पाहिले. अमर साबळे शहराला अवघ्या दहा वर्षांपूर्वी ओळख झालेले व्यक्तीमत्व. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली. सहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली. नुकताच सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला.

राजेश पिल्ले लढवय्ये नेतृत्व  

काही वर्षांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेले व्यक्तीमत्व असलेल्या राजेश पिल्ले यांच्याकडे पक्षाने दक्षिण भारतीय सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. महापालिकेत नगरसेवक असताना क्रीडा समिती सभापतीपद त्यांच्याकडे होते. या कालावधीत कामचुकार क्रीडा शिक्षकांना त्यांनी चांगलेच वठणीवर आणले होते. ऑनड्युटी घरी जाऊन दुपारच्या झोपा काढणा-या अधिका-यांना त्यांनी पकडल्याचा किस्सा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT