पिंपरी : "सतत ग्लोव्हज घालून हातांचा रंग बदलत आहे. दोन-अडीच महिने झाले. जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे. हॉस्पिटलमध्ये, राहण्याच्या ठिकाणी, फोनवर फक्त एकच शब्द कानावर पडतोय कोरोना. एक वर्तुळ बनले आहे, त्याच्या बाहेरचं जग विसरूनच गेलं आहे. चुकून जरी अंग गरम वाटलं, तरी भीती वाटतेय. मी एकटाच नाही, कोरोनाची ड्युटी करणारा प्रत्येक डॉक्टर याच अवस्थेतून जात आहे.'' पिंपरीतील डॉ. प्रकाश कोयाडे यांचा हा अनुभव.
लॉकडाउन अंशत: शिथिल केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. याच त्राग्यातून लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. समाजाला भानावर आणण्याचे काम ही पोस्ट करतेच शिवाय कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी कृतज्ञताही आहे. कोयाडे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आहेत. गेले तीन महिने कोरोनाबाधितांच्या अतिदक्षता विभागात काम करत आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या
या कोरोना योद्ध्याची पोस्टमागील भावना आणि रुग्णांसमवेतचे दिवस याविषयी ते म्हणाले, "केवळ मीच नव्हे, देशभरात असंख्य डॉक्टर कोरोना विरोधात लढताहेत. प्रत्यक्ष रुग्णाच्या सानिध्यात राहत असल्याने स्वत:ची प्रचंड काळजी घ्यावी लागते. सात दिवस काम आणि सात दिवस क्वॉरंटाइन असे कामाचे स्वरूप आहे. 15 खाटांचे दोन अतिदक्षता विभाग आहेत. अंगावर पीपीई कीट (वैयक्तिक सुरक्षा साधना संच) घालून एकदा आत गेले, की ड्युटी संपल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. शिवाय या काळात पाणी पिता येत नाही, की स्वच्छतागृहात जाता येत नाही. इतका बंदिस्त हा पोषाख आहे. खोलीतील एसी बंद असते. रुग्णाच्या प्रकृतीतील चढउतारावर लक्ष, त्याच्याशी संवाद, उपचारात बदल, परिचारिकांना सूचना हे सतत सुरू राहते. या विभागातील सुन्न वातावरणात काम करताना आमच्यावर प्रचंड ताण असतो. शिवाय ग्लोव्हज घालून हाताचा रंग उडतो, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, श्वास घेताना त्रास होतो. उन्हाळ्यात तर प्रचंड त्रास झाला. सतत कोरोना शब्द कानावर पडूनही स्वास्थ बिघडते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
...म्हणून लिहिली पोस्ट
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीची छायाचित्रे मी वर्तमानपत्रांत बघितली. कोणालाही गांभीर्य दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. मग आम्ही जे काही काम करतोय, याला काही अर्थच राहिलेला नाही. कशासाठी आणि कोणासाठी आम्ही जीव धोक्यात घालतोय, असा विचार मनात आला. यातूनच एक पोस्ट लिहिली. त्याला चांगला प्रतिक्रिया आल्या. यामुळे पुन्हा उभारी आली आहे.
सात दिवस घरात क्वारंटाइन
कोयाडे यांचे गेल्याच वर्षी लग्न झाले आहे. सध्याचे काम जोखमीचे आहे, यावर घरातल्यांची काय भावना आहे, याविषयी ते म्हणाले, "आमचे कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात आहेत. पत्नी शिल्पा दंतवैद्यक आहेत. सात दिवस रुग्णालयात काम केल्यावर सात दिवस घरी क्वारंटाइन करून घेतो. घरातल्या खोलीसह वैयक्तिक खूप काळजी घेतो.
डॉ. प्रकाश कोयाडे यांची हीच ती व्हायरल झालेली पोस्ट...
सतत ग्लोव्हज घालून हाताचा रंग बदलत आहे. दोन अडीच महिने झाले जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे. हॉस्पिटलमध्ये, राहण्याच्या ठिकाणी, फोनवर... फक्त एकच शब्द कानावर पडतोय...कोरोना! एक वर्तुळ बनले आहे, त्याच्याबाहेरचं जग विसरूनच गेलं आहे. बरं हे काम करण्यासाठी अंगावर काही कवचकुंडले नाहीत. एका सेकंदाची गफलत महागात पडू शकते. चुकून जरी अंग गरम वाटले तरी भीती वाटतेय. मी एकटाच नाही...कोरोना ड्युटी करणारा प्रत्येक डॉक्टर याच अवस्थेतून जात आहे. बरं हे करून आम्ही काही कोट्यवधी कमावत नाही आहोत. अर्थात हे कोणी पैशासाठी करतच नाही. प्रत्यक्ष रुग्णाला हात लावून काम करणाऱ्या एकाही डॉक्टरच्या मनात चुकूनही येत नाही की आपण हे कशासाठी करतोय; पण जेव्हा सुशिक्षित, सुसंस्कृत समजले जाणारे लोक जेव्हा असे जथ्थ्याने बाहेर पडतात तेव्हा प्रश्न पडतोच, कशासाठी करायचं? भारतात दिवसाला दहा हजारांहून अधिक लोक पॉझिटिव्ह येत आहेत.
मृत्यूदर दिवसाला तीनशेकडे जातोय. जूननंतर मुंबईत एकाही नवीन रुग्णाला बेड मिळणार नाही अशी अवस्था तयार होत असताना या उच्चभ्रू लोकांना अक्कल का येत नसावी. मुंबईत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या या लोकांचा फोटो लक्षपूर्वक पाहिला, तर दिसेल की यात अर्ध्याहून अधिक लोक साठीच्या पुढचे आहेत. आतापर्यंत झालेल्या सात हजार मृत्यूंपैकी सहा हजारांहून अधिक लोक साठीच्या पुढचे होते, हे एवढ्या लवकर विसरले लोक. मॉर्निंग वॉकसाठी आजोबा लोकांनी बाहेर पडणं हे निराशाजनक आणि अतिशय बेजबाबदार वागणं आहे. डायबिटीस आणि हायपरटेंशन असणारे कोरोनाच्या हिटलिस्टवर आहेत. मग मुद्दामहून या आजाराला का आमंत्रण द्यायचं? आमच्या आजोबा आजीच्या वयाच्या लोकांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून देताना काय यातना होतात ते शब्दात कसं सांगायचं?
कुठला तरी नेता येतो, पत्रकार येतो आणि हॉस्पिटलमधील फोटो, व्हिडीओ काढून व्यवस्थेच्या नावे खडे फोडतो. पण आम्हाला असे फोटो काढायची परवानगी नाही, अन्यथा दाखवलं असतं कोरोनाचा रुग्ण कसा मरतो ते.
गेल्या तीन महिन्यांत सर्वांत जास्त चुका मुंबईतील लोकांनी केलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट स्पष्ट दिसतोय. अजूनही त्याच चुका करणे हे संतापजनक आहे. एक सत्य गोष्ट सांगतो, आजघडीला मुंबई आणि पुण्यातील एकाही कोरोना हॉस्पिटलच्या आयसीयूमधील एकही बेड रिकामा नाही किंवा हॉस्पिटलमधील एकही व्हेंटिलेटर रिकामे नाही. कधी कधी व्हेंटिलेटर लवकर "रिकामे व्हावे' म्हणून वाट पाहावी लागते. कारण ते दुसऱ्या थोड्या चांगल्या पेशंटला लावणे आवश्यक असते. जेणेकरून तो तरी वाचला पाहिजे ही अपेक्षा असते.
एकाबाजूला ही क्षणोक्षणीची धडपड सुरू असताना तुम्ही काय करताय? मॉर्निंग वॉक शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगलेच असते पण त्यासाठी आधी जिवंत राहणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना असं वाटंत असेल की, आम्ही मास्क घालून आहोत तर तो गैरसमज आहे. उघडे असणारे हात सर्वांत जास्त घातक आहेत. मुंबईचं स्पिरीट असं मोक्याच्या वेळी मरिन ड्राईव्हवर फिरताना चांगलं वाटेल का? लॉकडाउन नकळत उठले असले तरी कोरोना मात्र, ठाण मांडून बसला आहे. दररोज क्षणोक्षणी त्याची तीव्रता वाढत आहे. मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी ऍम्बुलन्स वेटिंगवर आहेत. तुमचं एक थांबलेलं पाऊल या काम करणाऱ्यांच्या मनात "कशासाठी' हा प्रश्न उभा न राहू देण्याचं काम करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.