पिंपरी - दारू पीत असताना झालेल्या वादातून तरुणाने गोल्ड मॅनच्या मुलाच्या (Gold man Son) कानाखाली मारली. याचा राग आल्याने 'तू आमच्या भाईला का मारलें' असे म्हणत तिघांनी मिळून तरुणाचा निर्घृण खून (Murder) केला. याप्रकरणी भोसरीतील गोल्ड मॅन दत्ता फुगे याचा मुलगा शुभम याच्यासह तिघांना भोसरी पोलिसांनी (Police) काही तासातच जेरबंद केले. (Goldmans Son Killed the Young Man in a Beating Angry)
शुभम दत्ता फुगे (वय २५), प्रथमेश वायकर (वय १९, दोघेही रा. भोसरी) व एक अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. तर अमन सुरेश डांगळे (वय २७, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सोमवारी (ता. २६) सकाळी सातच्या सुमारास भोसरीतील लांडगे आली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ डांगळे यांचा मृतदेह आढळला. डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रुप करण्यासह ओळपत्रही काढून घेतले होते. दरम्यान, परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तसेच काही पुरावाही नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचणायचे आव्हान पोलिसांपुढे होते. मृताच्या जखमा पाहता हा खून सराईत गुन्हेगाराने केल्याचा संशय बळावला. त्यानुसार सराईत गुन्हेगाराचा शोध सुरु केला. दरम्यान, सराईत गुन्हेगार शुभम हा पसार होण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. मात्र, तो काहीही सांगत नव्हता.
दरम्यान, मृताच्या पत्नीकडे चौकशी केली असता रविवारी रात्री त्यांना पती अमन यांचा फोन आल्याचे व त्यावर आपण मित्रांसोबत दारू पिण्यास बसलो असल्याचे सांगितल्याचे अमन यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी फोन लोकेशन व शात्रोक्त पद्धतीने तपास केला असता शुभम व मृत अमन हे रात्री शुभमच्या घरी सोबत असल्याचे समोर आले. त्या आधारावर शुभमकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अमन व आरोपी हे जुने मित्र असून रविवारी (ता. २५) रात्री हे चौघेही शुभमच्या घरी टेरेसवर एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, त्यांच्यात दारूच्या नशेत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी मृत अमन याने शुभमच्या कानाखाली मारली असता इतर आरोपींनी 'आमच्या भाईला का मारले' असे म्हणत अमनला टेरेसवरून विठ्ठल-रुक्मिणी मन्दिराजवळ घेऊन गेले. तेथे सुरुवातीला शुभमने अमनच्या डोक्यात कोयत्याने वार करून खाली पडले. यानंतर इतर दोन आरोपींनीही त्याच्या डोक्यात वार करून निर्घृण खून केला.
शुभमवर यापूर्वी तीन गुन्हे तर अल्पवयीन आरोपीवर दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच मृत अमन याच्यावरही एक गुन्हा दाखल आहे. या आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक गायकवाड, घाडगे, उपनिरीक्षक साबळे, भंवरी, मिथके, पवार, पोलिस अंमलदार राकेश बोयने, राजेंद्र राठोड, राजू जाधव, सन्तोष महाजन, अजय डगळे, गणेश हिंगे, बाळासाहेब विधाते, समीर रासकर, आशिष गोपी, सुमित देवकर, गणेश सावन्त, सागर जाधव, सन्तोष महाडिक, विनोद वीर यांनी केली.
कोण होते दत्ता फुगे
भोसरी परिसरातील रहिवासी असलेले दत्ता फुगे यांना अंगभर सोन्याचे दागिने परिधान करण्याची आवड होती. त्यांनी चक्क सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. यामुळे त्यांची गोल्डमन म्हणून ओळख निर्माण झाली. ते एक चिटफंड चालविण्यासह जमीन खरेदी-विक्रीचाही व्यवसाय करायचे. दरम्यान, एका आर्थिक व्यवहारातून जुलै २०१६ ला दिघी परिसरातील भारतमातानगर येथे गोल्डमॅन फुगे यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यांच्या पत्नी या पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका आहेत. तर आताच्या खून प्रकरणातील आरोपी शुभम त्यांचा मुलगा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.