Pimpri Chinchwad Municipal Corporation sakal
पिंपरी-चिंचवड

...तरच लढत‘नॉकआउट’

मतदारसंघाच्या एखाद्या भागातील वीज समस्या सोडविली की सोशल मीडियाचे सर्व फ्लॅटफॉर्म माहितीने वाहत असतात.

अविनाश म्हाकवेकर

लाच घेताना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा नगरसेवक सापडला असता तर काय झाले असते? भाजपने इतका जोरदार हल्ला चढविला असता, की आगामी महापालिका निवडणूक लढविण्याचे धारिष्ट्यच या पक्षांना झाले नसते. आता एक पंच मारून लढत नॉकआउटच करण्याची संधी आहे. तरीही विरोधकांची भूमिका मिळमिळीत आहे, अगदी अळूच्या फदफद्यासारखी; ना चव, ना चोथा!

आमदार महेश लांडगे यांची जनसंपर्क यंत्रणा पारंपरिक पद्धतीची नाही. महाराष्ट्रातील फार कमी लोकप्रतिनिधींकडे असेल अशी त्यांची सोशल मीडियाची फौज आहे. तसेच, गाजावाजा करण्याची मुळातच हौस असल्याने त्यांचा प्रत्येक कार्यक्रम एक तगडा इव्हेंट असतो. मतदारसंघाच्या एखाद्या भागातील वीज समस्या सोडविली की सोशल मीडियाचे सर्व फ्लॅटफॉर्म माहितीने वाहत असतात. ते पाहताना असा समज होतो, की स्वातंत्र्यापासून तेथील लोक अंधारातच राहत होते. आपली इमेज महाराष्ट्रभर कशी पोहोचवाची हे त्यांना चांगलेच माहीत असल्याने प्रसिद्धीचा झोत सतत आपल्याकडे वळवून घेत असतात.

विधानसभा निवडणूक लढविणे, अपक्ष आमदार होणे, भाजपला खेळवत कारभार करणे, पुढील टर्ममध्ये भाजपचा आमदार होणे.... आपल्या कार्यकर्त्यांना महापौर करणे, त्यांच्या जल्लोषी मिरवणुका काढणे, महापौरपद स्वीकारायला जाताना वेगळी वेशभूषा करायला लावणे... मला कोरोना झाला, मी कोरोनामुक्त झालो, मी राजीनामा दिला, लोकहो आठवून बघा... सगळं कसं डामडौलात आणि जल्लोषात. त्यांना कुठे चमकवायचं हे टीम ठरवते आणि बरोबर तेवढा स्पेस मिळवून देते. राजकीय विरोधक नेमके इथेच मार खातात.

राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडे अशी टीमच नाही. देखावा, भपका राहू दे; पण एकसंधपणाही दिसत नाही. नेतेच भरपूर. नव्यांना वाव नाही. सगळी सूत्रे आपल्याच हातात हवीत या हव्यासापोटी कासरा आणि चाबूक कोणाकडेच नाही. मग पोकळ आंदोलनं केली जातात. महापालिकेत १५ वर्षे सत्ता असताना पदे भोगली आणि आंदोलनासाठी यायला त्यांना लाज वाटते. कार्यकर्त्यांना उत्साह येईल असा कोणताही कार्यक्रम आखला जात नाही, जनहितार्थ काही राबविले जात नाही. दुरावलेला मतदार किंवा नवा मतदार जोडण्यासाठी काय करता येईल याचा विचारही नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर एखादा मुद्दा उचलून धरत तो वाजवावा कसा हे ठरवायची यंत्रणाच नाही.

लांडगे यांनी हट्टाने पदावर बसविलेला, त्यांच्या मतदारसंघातील-भावकीतील स्थायी समितीचा अध्यक्ष लाच प्रकरणात अडकतो, ही लांडगे व भाजपची नाचक्की करणारी घटना. ‘ना भय, ना भ्रष्टाचार...’ ही घोषणा राज्यभरात चेष्टेचा विषय झाली आहे. तरीही विरोधी पक्ष शांतच. यांना कशाची भीती वाटतेय? आपल्या सत्ताकाळातील स्थायी समितीच्या कारभाराची, की आणखी कशाची धाकधूक आहे? राज्यपातळीवरील कोणीही नेता आलेला नाही. काळे झेंडे फडकविणे नाही की कसला इशारा देणे नाही.

बंबात लाकडे घालून पाणी तापणार नाही, त्यासाठी लाकडांना जाळ लावायला पाहिजे. राख झटकत राहून निखारे लाल ठेवले पाहिजेत. विरोधकांना सत्तेचा सर्वाधिक अनुभव आहे. स्वांतसुखाय असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचा महापालिकेतील पदाधिकारी सोडा, नगरसेवक जरी सापडला असता, तर फक्त कल्पना करून बघा; भाजपने अख्खा खाऊन टाकला असता. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील बाह्या सरसावत आले असते. महापालिकेचे कामकाज काही महिने चालू दिले नसते. काळे फासा, शाई फेको आंदोलनापासून सतत पत्रकार परिषदा घेत सुटले असते. आठवतो का मूर्ती घोटाळा? डोंगर पोखरून उंदीरही गवसला नाही; आणि विरोधक इकडे हत्ती सापडूनही सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखे वागताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT