PCMC Election 2022
PCMC Election 2022 Sakal
पिंपरी-चिंचवड

सर्वच पक्षांचे टार्गेट ‘इलेक्शन २०२२’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका निवडणूक (Municipal Election) अवघ्या सात महिन्यांवर आली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची (Corona Infection) टांगती तलवार कायम असल्याने निवडणूक वेळेत होण्याबाबत साशंकता आहे. असे असले तरी सर्वच राजकीय पक्षांनी (Political Party) निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ‘सत्ता कायम ठेवायची’ असा चंग भारतीय जनता पक्षाने (BJP) बांधला आहे. तर, ‘महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची’ व्यूहरचना विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आखली आहे.

महापालिकेत २००२ पासून २०१७ पर्यंत सलग तीन पंचवार्षिक राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. २०१७ मध्ये भाजपने ती खेचून आणली. त्यात कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शिवसेनेला दोन अंकी आकडा मिळवता आला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. गेल्या वेळेपेक्षा जागा वाढवायच्या तयारीत शिवसेना व मनसे आहे. ‘आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करायचे’ मनसुबे कॉंग्रेस बांधत असून ‘मोठ्या ताकदीने निवडणूक लढवून प्रस्थापितांना आपली ताकद दाखवून द्यायची’ असा विचार वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आप करीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे. कारण, हे सर्वच पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीपासून महपालिकेसाठी तयारी करीत आहेत.

शिवसेनेची कार्यकारिणी लवकरच

दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेने शहराध्यक्ष पदाची धुरा नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांच्याकडे सोपवली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख यांच्या माध्यमातून संघटन सुरू आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय बैठका सुरू आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघास्तरीय बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. पुढील आठवड्यात भोसरी व चिंचवड विधानसभा स्तरावरील बैठका होतील. त्यानंतर पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल. आगामी निवडणुकीत नगरसेवकांची दोन आकडी संख्या असेल, असा विश्‍वास भोसले यांनी व्यक्त केला.

आरपीआय चिन्हावर लढणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महिला प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, ‘‘आमची सभासद नोंदणी झालेली आहे. गेल्या वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता. त्या वेळी आमचे उमेदवार होते. आताही चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार उमेदवारांची यादी तयार आहे. प्रसंगी दोन सदस्यीय प्रभाग झाल्यास तीच यादी असेल. प्रभाग रचनेत वेगळे बदल झाल्यास संघटनेच्या कामाचे स्वरूप बदलेल. पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याचा विचार आहे. संघटनात्मक व वैयक्तिक पातळीवर कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाचे काम करीत आहेत.’’

‘वंचित’ सर्वांना सोबत घेणार

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सक्रीय होती. पिंपरी, भोसरी, चिंचवड तिन्ही मतदारसंघात त्यांचे उमेदवार होते. त्यांना काही भागात चांगली मते मिळाली आहेत. त्या अनुभवावर आता महापालिकेची आगामी निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, ‘‘शहर पातळीवर संघटनात्मक बांधणी सुरू आहे. सर्वजाती समूहांना बरोबर घेऊन महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी आहे. संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकी सुरू आहेत.’’

मनसेची उमेदवार यादी तयार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २०१२ च्या निवडणुकीत चार नगरसेवक होते. २०१७ ला केवळ सचिन चिखले निवडून आले आहेत. ते म्हणाले, ‘‘शहर पातळीवर संघटना बांधणीचे काम सुरूच आहे. आगामी निवडणुकीतील उमेदावारीबाबत चाचपणी झाली आहे. त्यानुसार, सध्याच्या ३२ प्रभागातील संभाव्य १२८ उमेदवारांची यादी आरक्षणानुसार तयार आहे. त्यासाठी २०१२ व २०१७ च्या निवडणुकीतील अनुभवानुसार तयारी सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकी सुरू आहेत. निवडणूक दरम्यान पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा, रोड-शोबाबत नियोजन सुरू आहे.’’

भाजपचे ३४५ शक्तीकेंद्र

भाजपने शहरस्तरावर कार्यकर्त्यांचे ३४५ शक्तीकेंद्र तयार केले आहेत. पूर्वी ही संख्या अवघी २२० होती. महापालिकेच्या ३२ प्रभागात एक हजार ५० बुथप्रमुख नियुक्त केले आहेत. शिक्षण, उद्योग, व्यापारी, विद्यार्थी, महिला अशा २१ आघाड्या आहेत. त्या माध्यमातून अठराशे कार्यकर्ते काम करीत आहेत. एक जुलैपासून नवीन मतदार याद्यांनुसार काम सुरू होईल. प्रभाग स्तरावर संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. आगामी निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला आहे, असे पक्षाचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या वॉर्डस्तरीय बैठका

गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्याच्या तयारीत राष्ट्रवादी कॉंग्रेस करीत आहे. महापालिका वॉर्डस्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठकी सुरू आहेत. वॉर्डनिहाय मतदार याद्यांनुसार नियोजन केले जात आहे. मतदार याद्यांमधील दुबार नावे, मयत झालेल्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पक्षाचे वेगवेगळे वीस सेल आहेत. यात युवक, युवती, महिला, कायदा, डॉक्टर, सामाजिक न्याय आदींचा समावेश आहे. वॉर्डस्तरीय समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. आजी, माजी नगरसेवक व इच्छुकांशी चर्चा सुरू असल्याने पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

कॉंग्रेसची पक्ष बांधणी

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी वैयक्तिक कारणास्तव सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाने अद्याप तो स्वीकारलेला नाही. ते म्हणाले, ‘‘शहरात पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. विविध प्रश्‍न व समस्यांना वाचा फोडण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आंदोलने सुरू केली जात आहेत. पिंपरी, भोसरी, चिंचवड अशी ब्लॉकनिहाय पक्षाच्या कार्याची आखणी केली आहे. ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व संघटनेचे काम सुरू आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहोत. पक्षाचे काम थांबलेले नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT