पिंपरी - मातामृत्यूचे जगभरातील वाढते प्रमाण हा सध्या चिंतेचा विषय मानला जातो. मातामृत्यू होण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे ‘प्री-एक्लेम्पसिया’ हे आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर एक्लेम्पसिया उद्भवतो. त्यामुळे गर्भवतींना अथवा बाळंतिणीला अपस्मारासारखे झटके येतात. त्यातून मृत्यूही उद्भवू शकतो. मात्र, प्री-एक्लेम्पसियाकडे वेळीच लक्ष दिले तर तो बराही होऊ शकतो. त्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
गर्भारपणात होणारा उच्चरक्तदाब हे प्री-एक्लेम्पसिया होण्यामागील मुख्य कारण आहे. गर्भवतीच्या पायावर सूज येणे, सतत लघवीला जाणे, जास्त उलट्या होणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजार एक्लेम्पसियामध्ये परावर्तित होतो. त्यातून गर्भवती व तिचे बाळ यांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे गर्भारपणात उच्च रक्तदाब होऊ नये याकडे गर्भवतींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
आजाराची कारणे
गर्भवती महिलांमध्ये वाढलेला रक्तदाब
महिलांमध्ये वाढलेले मद्यपान व धूम्रपानाचे प्रमाण
नोकरी करणाऱ्या महिलांचे कामाचे वाढलेले तास
महिलांमध्ये वाढलेला लठ्ठपणा
काय करावे
उच्च रक्तदाब असल्यास मीठ खाणे बंद करावे
घरातील वातावरण तणावमुक्त ठेवावे
गर्भवती महिलेने टीव्ही अथवा मोबाईलवर भीतिदायक बाबी पाहू नये
गर्भवतीने आहार समतोल आहार ठेवावा
आजाराचा प्रवास खेड्याकडून शहराकडे
वैद्यकीय सुविधांचा अभाव, गरोदरपणातील आहाराबाबतचे अज्ञान यामुळे खेड्यातील महिलांमध्ये प्री-एक्लेम्पसिया हा आजार आढळून येत असे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा आजार शहरातील गर्भवतींमध्येही आढळून येत आहे.
गर्भवती असताना शरीरात तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे काही महिलांमध्ये रक्तदाब वाढतो. हा उच्चरक्तदाब वेळीच लक्षात आला तर योग्य उपचारांव्दारे प्री-एक्लेम्पसियामुळे होणारे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. काही महिलांना आधीच रक्तदाबाचा त्रास असतो. अशा महिलांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सोसायटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात ५५ हजार माता व पाच लाख बालके प्री-एक्लेम्पसियामुळे दगावतात. त्यामुळे गर्भवतींनी जागरूक राहणे आवश्यक आहे.
- डॉ. मंदार रानडे, स्त्रीरोगतज्ज्ञ व लेप्रोस्कोपिक सर्जन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.