ऊर्से, ता. ५ : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके कार्यक्रमाच्या २०२५-२६ रब्बी हंगामासाठी ज्वारी पीक प्रकल्प शिवणे व सडवली गावात राबविण्यात येत आहे.
ज्वारी पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत शेतकरी गटांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत दहा हेक्टर क्षेत्रावर २५ शेतकऱ्यांकडे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. हा उपक्रम साहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी खंडागळे, प्रमिला भोसले तसेच उपकृषी अधिकारी मिनाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान एक एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेतले जात आहे.
पीक प्रात्यक्षिकासाठी मागील दहा वर्षांत विकसित व विद्यापीठांनी शिफारस केलेल्या ‘फुले यशोमती’ या ज्वारीच्या वाणाचे बियाणे वापरण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत प्रति एकर चार किलो बियाणे, बीजप्रक्रियेसाठी आझेटोबॅक्टर व पीएसबी जैविक खते देण्यात आली. तसेच कीड नियंत्रणासाठी प्रति एकर दोन फेरोमन सापळे, पीक संरक्षणासाठी आझेडिरीकटिन १५०० पीपीएम औषध आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सूक्ष्म मूलद्रव्य (ग्रेड-१) देण्यात आले आहे.
या प्रात्यक्षिक प्लॉटला कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
मावळात रब्बी हंगामात एकूण दहा प्रकल्पात ज्वारी व हरभरा पीक राबविण्यात येत आहे. ज्वारी पीक प्रात्यक्षिक राबविण्याचा उद्देश पिकाचे उत्पादन वाढविणे, नवनवीन तंत्रज्ञान चा प्रचार व प्रसार करणे, तज्ञ शेतकरी निर्माण करणे हा आहे.
- मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी, मावळ