भोसरी, ता. १६ ः भोसरी गावाप्रमाणेच दिघीमध्येही पिढ्या न पिढ्यांपासून वैष्णव विचार फुलत असून वारकरी परंपरा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जपण्याचे काम होत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीमधील दिंडी क्रमांक आठमध्ये दिघी ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग असतो. दिघीतील बहुतांश ग्रामस्थ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्यात दंग असतात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वसलेल्या दिघी गावाला वारीची जुनीच परंपरा आहे. दिघीतील विठ्ठल मंदिर, मारुती-भैरवनाथ मंदिर, दत्तगडावरील दत्त मंदिर आदी ठिकाणी काकडा आरती, हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन आदी कार्यक्रम नित्यनियमाने घेतले जातात. विठ्ठल मंदिरातील काकडा आरतीचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्याचप्रमाणे मंदिरांत शनिवार, रविवार आणि गुरुवारी नित्यनियमाने भजनाचे कार्यक्रम होतात. गावच्या जत्रेत चक्रीभजनाचे आयोजन करत तरुणांना संधी देण्याचे कामही होत आहे. दिघीत सुमारे २५ महिला आणि १० तरुणांच्या भजनी मंडळांची संख्या आहे. तर वादकांची संख्या साठहून अधिक आहे.
दिघीतील कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान, कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान, अमर मित्र मंडळ, शिवाई नागरी पतसंस्था, सुयोग संयुक्त नवभारत तरुण मंडळ, आदर्श मित्र मंडळ, संकल्पना प्रतिष्ठान, माऊली मित्र मंडळ, दत्त सेवा मित्र मंडळ, संघर्ष स्पोर्ट्स क्लब आदींसह इतरही सामाजिक संस्था आणि सर्वच राजकीय पक्षांद्वारे वारीत पालखी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत असतात.
पूर्वी अडीचशे ते तीनशे वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघत होती. त्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय गायकवाड वाड्यात माझे आजोबा मारुती रामजी गायकवाड, पणजोबा रामजी नारायण गायकवाड करत. भोसरीकर माऊलींच्या माध्यमातून डांगे पंच मंडळीद्वारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीमधील दिंडी क्रमांक आठमध्ये दिघी ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग आहे. त्यामुळेच दिघीतील वारकरी परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे सुरूच आहे.
- दत्तात्रय महाराज गायकवाड, खजिनदार, डांगे पंच मंडळ
दिघी गावातील विठ्ठल मंदिर उभारणीसाठी माझ्यासह दत्तात्रेय गायकवाड, राघोबा परांडे, निवृत्ती रसाळ, वामनराव वाळके आदींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेत विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार केला. विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायाकडे घेऊन जाणारे विविध कार्यक्रम वर्षभर होतात.
- साहेबराव वाळके, माजी सरपंच, दिघी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.