भोसरी, ता. १३ ः ‘कर्ज हवंय, मात्र ते रस्त्यावरील खड्डे बुजवायला !’ असे कोणी म्हटले; तर विश्वास बसणार नाही. मात्र, भोसरीतील एका अवलिया कामगाराने भोसरीतील चौकात उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवंय, असा पिंपरी चिंचवड महापालिकेला उपरोधिक टोला मारत खड्डे कायमस्वरुपी बुजविण्याची मागणी केली. त्यामुळे भोसरी परिसरात त्याचीच चर्चा दिवसभर सुरू होती.
पावसाळ्यामुळे शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना अशा रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याच्या कामात कुचराई केल्यामुळे महापालिका प्रशासनाने नुकतेच २६ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या पार्श्वभूमीवर, कामगार ऋषिकेश पाचणकर यांनी चक्क चौकात उभे राहून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे असल्याचा फलक अंगावर घालून महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. पाचणकर हे कामाला जाण्यापूर्वी आणि कामावरून घरी जाताना चौका-चौकात थांबून खड्डे बुजविण्यासाठी अनोख्या पद्धतीने महापालिकेकडे पाठपुरावा करताना दिसतात. गेल्या दोन महिन्यांपासून ते पुणे, भोसरी, चाकण, चऱ्होली आदी भागांतील रस्त्यावर थांबून जनजागृती करत आहेत. खड्ड्यांची दुरुस्ती तुम्ही तात्पुरती करता मग आम्ही कर कायमस्वरूपी का भरायचा ? असा रोकडा सवालही ते फलकाद्वारे करत आहेत. त्यांच्या या अनोख्या पद्धतीच्या मागणीला वाहन चालक आणि नागरिकांद्वारे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालक, नागरिक त्यांच्याबरोबर सेल्फीही काढत आहेत. चऱ्होलीतील अलंकापुरम ते खडी मशीन रस्त्यावर शुक्रवारी (ता. ११) रस्त्यावर विखुरलेल्या खडीवरून दुचाकी घसरल्याने पाचणकर यांना दुखापत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला.
आपण शासनाकडे मोठ्या प्रमाणात कर भरतो. कर भरूनही खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागतो. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघातही होतो. महापालिकेद्वारे रस्त्यावरील खड्डे भरले जातात. मात्र ते निकृष्ट पद्धतीने भरले जात असल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे नागरिकांच्या कररुपी पैशाचा हा अपव्यय होत आहे. महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता ते कायमस्वरुपी भरण्यासाठी मी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत आहे.
- ऋषीकेश पाचणकर, कामगार, भोसरी