संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. १५ ः संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टमध्ये कबुतरांचा मुक्त संचार वाढला आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये कबुतरांच्या विष्ठेचा खच पडल्याने दुर्गंधी पसरली आहे. कबुतरांची विष्ठा आणि उडते पंख यामुळे खेळाडूंचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये चार कोर्ट आहेत. या ठिकाणी सरावासाठी भोसरी, इंद्रायणीनगर, मोशी, दिघी, चऱ्होली आदी भागांसह पिंपरी चिंचवड शहर परिसरातून मोठ्या संख्येने खेळाडू येतात. काही दिवसांपूर्वी हॉलमध्ये मृत कबुतरही काही दिवस तसेच पडून त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली होती.
काय आहे समस्या ?
- छताला लावलेल्या पत्र्याच्या फटीतून आणि प्रवेशद्वारातून कबुतरांचा शिरकाव
- छताच्या खोबणीत कबुतरांच्या वास्तव्यात वाढ
- प्रेक्षक गॅलरी, जिना, पायऱ्या, बॅडमिंटन कोर्ट यावर कबुतरांची विष्ठा पडून दुर्गंधी
- खिडक्यांना लावलेल्या पडद्यांचीही दुरवस्था
- खिडक्यांमधून कबूतरे येऊ नये यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळ्या
- सर्वच खिडक्यांच्या काचा बंद असल्याने हवा खेळती राहत नाही. वातावरण कुबट
- कबुतरांची विष्ठा, छोटी पिसे यामुळे खेळाडूंना आजार जडण्याची भीती
मी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टमध्ये नियमित सराव करण्यासाठी येतो. मात्र, येथे कबुतरांच्या विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. काही वेळेस उडणाऱ्या कबुतरांची विष्ठा प्रत्यक्ष कोर्टवर पडत असल्याने अडचण निर्माण झाली आहे.
- एक बॅडमिंटन खेळाडू
कबुतरांच्या विष्ठा, पिसांमुळे दमा होऊ शकतो. त्यांचे पंखातील हवेतील पिसे श्वासनलिकेत गेल्यास फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्याचा परिणाम खेळाडूंच्या क्षमतेवर होण्याची शक्यता असते. सतत अशा वातावरणात राहणाऱ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
- डॉ. शिवाजी ढगे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी नवीन रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिका
भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये कबुतर येऊ नयेत यासाठी उपाय योजना करण्याची मागणी स्थापत्य क्रीडा विभागाकडे केली आहे. त्याचप्रमाणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बॅडमिंटन हॉल दाखवून दुरुस्तीची मागणीही केली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलची पाहणी करण्यास संबंधितांना सांगण्यात येईल. हॉलमध्ये येणाऱ्या कबुतरांचे मार्ग शोधण्यात येतील. त्याचप्रमाणे ते मार्ग बंद करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
- मनोज सेठिया, सहशहर अभियंता, स्थापत्य क्रीडा व उद्यान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
BHS25B03112, BHS25B03113
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.